काय वाणूं आतां पायाचा महिमा...

07 Sep 2023 13:06:25

काय वाणूं आतां पायाचा महिमा...

भक्तीचा महिमा संतांनी गायला आहे तो मोठ्या कौतुकाने. विट्ठलाचं माहात्म्य मांडलं आहे शब्दांत इतक्या सहजतेने की, सामान्य माणसालही समजेल सहज... संत नामदेव महाराज एका अभंगात सांगतात ते पांडुरंगाच्या चरणांचं महत्त्व,

काय वाणूं आतां पायाचा महिमा। जेथें झाली सीमा बोलायाची॥१॥

विठोबाचे पाय आठवितां मनीं। गेलें हरपोनी भवभय॥२॥

वारकरी मोठ्या कौतुकाने, भक्तीने विट्ठलाचं दर्शन घ्यायला जातात, ते दर्शन घ्यायला जातात आणि 'त्या'च्या पायांवर श्रद्धेने डोकं ठेवतात. संत नामदेव महाराज इथे पांडुरंगाच्या चरणांचा महिमा सांगत आहेत. सुरूवातीलाच ते सांगतात की, पांडुरंगाच्या चरणांचा महिमा इतका आहे की, जणू त्यांचं वर्णन करायला शब्द कुठेतरी कमी पडतात, बोलायलासुद्धा सीमा येते. ते म्हणतात की, फक्त विट्ठलाच्या चरणांचं स्मरण करताच भवभय हरपून जातं, अनुभव येतो तो त्याच्या कृपेचा...

पाय नारदानें ह्लदयीं धरितां। ब्रम्हांडीं मान्यता झाली त्याची॥३॥

सनकादिकांलागीं पाय वज्र कवच। ब्रह्मादि-देवांस पद जेणें॥४॥

विट्ठल हा विष्णुचाच अवतार असल्याने ते 'त्या'च्या चरणांचं माहात्म्य सांगताना अभंगात उदाहरणंही देतात. संत नामदेव महाराज म्हणतात की, विष्णूचे म्हणजेच पांडुरंगाचे पाय ह्रदयी धरताच नारद मुनींना ब्रम्हांडात मान्यता मिळाली, सनकादिकांसाठी 'त्या'चे चरण हे वज्र कवचासारखे झाले, ब्रह्मादि-देवांसाठी ते पद झालं.

लागतांचि पाय शिळा दिव्य झाली। पाषाण तारिले उदकावरी॥५॥

पाय ते रमेचे सौभाग्य साजिरें। योगि ऋषीश्वर थोर जेणें॥६॥

नामा म्हणे मनीं पाय सर्वकाळ। म्हणोनि सुकाळ आनंदाचा॥७॥

संत नामदेव महाराज इथे उदाहरण म्हणून रामायणातली एक गोष्ट सांगतात. साक्षात रामाच्या चरणांचा स्पर्श शिळेला होताच अहिल्येचा ऊद्धार झाला, जणू त्याच्या चरणांच्या स्पर्शाने जलावर पाषाण तरंगले. ते इथे सांगतात की, 'त्या'च्या प्रमाणेच रमेचे चरणही साजिरे आहेत. ते म्हणतात की, अंतरंगात सर्वकाळ 'त्या'चे चरण ठेवताच आनंदाचा सुकाळ प्रगटून येतो.

- अनीश जोशी

Powered By Sangraha 9.0