अस्ताला जाणारा सूर्य ढगांच्या आडून डोंगरांच्या रांगेपल्याड कलला. तसं संतू अन् गोंडाजी यांनी आपली वऱ्हाटे, पाटे बनवायला लागणारी जी दिवसभर घाम गाळून फोडलेली दगडं होती ती त्यांच्या खेचराच्या पाठीवर लादली. उन्हाळा सरला अन् बरसदीचा पहिला पाऊस येऊन गेला असल्यानं आता खदानीत येऊन दगुड फोडायचं त्यांचं काम आजपासून पुढे चार महिने बंद झालं होतं.
दगुड खेचरावर लादली, मोठा घन, छनी, एक हातोडी, अन् पाण्याची कॅन त्यांनी लादलेल्या दगडाच्या बाजूला झुलीला एका पिशवीत टाकली. दोघांनी खदानमायचे गुडघ्यावर बसून हात जोडून पाया पडले. आणि दोघेही कोसभर दूर असलेल्या आपल्या झोपडीच्या दिशेनं खेचरं घेऊन निघाले.
इकडे रानुबाई, सुमनबाई अन् संतूची बाई दिवसभर वऱ्हाटे, पाटे विकून दमल्या होत्या. काहीवेळापूर्वी महामंडळाच्या बसमध्ये बसलेल्या त्या त्यांची झोपडी असलेल्या गावाच्या फाट्यावर उतरल्या. फाट्यावर असणाऱ्या भिवसन आबाच्या किराणा दुकानातून त्यांनी हळद, तिखट, मिठाच्या पुड्या अन् अर्धा अर्धा किलो तांदूळ घेऊन त्यांनी झोपड्या जवळ केल्या. आज खिचडीचा बेत ठरला असावा, हे त्यांच्या या घेतलेल्या जिनसीतून अंदाज येत होता.
इकडे दिवसभर छनी, हातोडीने वऱ्हाटे, पाटे यांना टाके पाडून थकलेला नागू, जमिनीला हात टेकवत धोतराचा पांगलेला सोंगा बांधत उभा राहिला. त्यानं सर्व अवजारे, टाके देऊन तयारी झालेली सर्व वऱ्हाटे, पाटे अन् इतर साहित्य झोपडीच्या एक अंगाला असलेल्या मोकळ्या जागेत पसरवून लावली.
जेणेकरून गावातले कुणी गिऱ्हाईक आलं तर बघून त्याला हवा तो माल तो घेईन, फार उचलपटक होणार नाही.
सर्व सोयीनं लाऊन झालं आणि फडतळात पडलेल्या, कुच्ची झालेल्या केरसुणीने झोपडी मोहरले अंगण नागू झाडू लागला होता. झाडून झालं तसं सांज सरली, सरत्या सांजेला त्यानं एका पाटावर ठेवलेल्या देव्हाऱ्यातील देवांना अगरबत्ती अन् दिवा लावला.
बाहेर अस्ताला जाणाऱ्या सूर्याकडे बघून अगरबत्ती उजव्या हाताने दोनदा गोल हलवून एकदा उलटी हलवली अन् तुळशीच्या बादलीत ती खचकन खोचून देत तो मनोमन हात जोडून देवाशी काहीतरी बोलला. सूर्याला हात जोडून त्यानं जवळच असलेल्या खाटेवर आंग टाकले.
तितक्यात दूरवरून गोंडाजी अन् संतू आपली खेचरं झोपडीच्या दिशेनं घेऊन येताना त्याच्या नजरी पडली. फाट्याच्या एका अंगाने येणाऱ्या सडकीला त्याला डोक्यावर पिशी घेतलेली रानूबाई दिसली, तिच्यापुढे संतुची बाई. नव्यानं लग्न झालेली अन् संसाराला लागलेली लाडाकोडात वाढलेली, वेंधळी, बिनफिकीर गोंडाजीची बायको सुमनबाई दिसली. ती रस्त्यानं दुतर्फा बघत चालत होती.
गावच्या हद्दीत आले तसे तिघींनी डोक्यावरचा पदर सावरलेला होताच अन् यामुळे त्या अजूनच खांदानी घराण्यातल्या, खांदानी बायका वाटत होत्या. तिघी झोपडीजवळ आल्या तसं संतूच्या बाईने उद्याच्या पहाटच्याला कोणत्या गावाला जायचं, कधी निघायचं ही विचारपूस केली व ती तिच्या झोपडीच्या दिशेनं निघून गेली.
नागूने इस्नाला ठेवलेल्या पाण्याने रानूबाई, सुमनबाईने हातपाय धुवून वेणीफणी केली. कपाळावर आडवे कुंकू फासले अन् दोघींनी देव्हाऱ्यात पाय पडून नागूचे पाय पडले. तितक्यात गोंडाजी अन् संतू खेचर घेऊन झोपडीमोहरे आली, संतूने येतुया म्हणून हात हलवला अन् तो त्याच्या झोपडीच्या दिशेनं निघून गेला.
नागूने गोंडाजीला हातपाय धुवून यायला सांगून न्हानी घरात पाठवलं अन् त्याने खेचरावर असलेल्या दगडांना एका अंगाला लाऊन दिले. खेचराच्या अंगावर असलेली संगाची पिशवी, गोणपाटाची झुल काढून त्याला झोपडीच्या एका अंगाला बांधून दिलं. त्याला पाणी दाखवून तो खाटेवर बसून राहिला.
गोंडाजी हातपाय धुवून देव्हाऱ्यामोहरे हात जोडून पाय पडला अन् नागुचे पाय पडून तोही खाटेवर बसून दिवसभर केलेलं काम अन् उद्याचं शहर जवळ करायचं नियोजन नागूशी बोलत करु लागला होता.
उद्यापासून दगुड फोडायचं काम बरसदीच्या दिवसांत चार महिने थांबले होते. शहराला सडकीच्या बाजूने गोंडाजी अन् संतू दोघे दुकाने थाटनार होती उद्यापासून.
या विषयाला घेऊन दोघांच्या गप्पा चालू होत्या, तितक्यात सुमनबाईने दोन परातीत कोरा चहा त्यांना आणून दिला. दोघीजणी त्यांच्या पायथ्याला बसून त्यांच्या गप्पात सामील झाल्या व उद्याचं नियोजन लावायला म्हणून हातभार लाऊ लागल्या.
क्रमशः
- भारत सोनावणे