आज तुमच्यासमोर मी एक असा विषय घेऊन आले आहे, ज्याबद्दल आपल्याला फार माहीत नाही. फारसा अनुभव नाही, परंतु तरीही हा विषय महत्त्वाचा आहे.
आपल्यापैकी अनेकांना कधी न कधी स्किन ॲलर्जी चा त्रास झालाच असेल. कधी एखादे क्रीम वापरल्यावर चेहऱ्यावर अचानक खूप पुरळ येणं, कधी एखाद्या साबणाने पूर्ण शरीराला खाज येणं, कधी एखाद्या कपड्याच्या वापराने त्वचेवर लाल चट्टे येणं तर कधी काहीतरी खाल्ल्यावर अंगावर डाग येणं हे सर्व प्रकार स्किन ॲलर्जीचे आहेत. या प्रत्येक प्रकारात होणारी ॲलर्जी काहीतरी विशिष्ट कारणाने होते. ती सतत न होता कधीतरी होते आणि चटकन बरी सुद्धा होते.
मात्र कधीकधी काही लोकांना सतत स्किन ॲलर्जी होत राहते. काहीही बाहेरचं किंवा वेगळं खाल्लं की अंगावर चट्टे उठतात. काय खाल्ल्यावर हे घडतं याची यादी खूप मोठी असते. कधीकधी तर काहीही वेगळं न खाता किंवा वेगळं काहीही न वापरता सुद्धा अशी ॲलर्जी होते. हे सतत घडत राहते. व्यक्ती कंटाळून जाते. औषधाने तात्पुरता फायदा होतो, परत औषध घेणं थांबवलं की, पुन्हा ॲलर्जी सुरू...
या ॲलर्जीच्या प्रकाराला auto immune type म्हणतात. यात कोणत्याही विशिष्ट कारणाशिवाय तुमची immunity स्वतः तुमच्याच शरीरावर हल्ला करते आणि त्याचे परिणाम स्किनवर दिसतात. अशा स्वरूपाच्या ॲलर्जीचे नेमके कारण अजूनही समजलेले नाही. म्हणजे काय घडते हे माहीत असले तरीही हे का घडते याचे कारण किंवा सबळ पुरावा उपलब्ध नाही.
तरीही काही अंशी असे आढळून आले आहे की, मानसिक तणावाचा अतिरेक अशा पद्धतीच्या ॲलर्जीला कारणीभूत ठरू शकतो. म्हणूनच अशी लक्षणे दिसत असतील तर मानसिक तणाव कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे.
याशिवाय, आहारात व्हिटॅमिन सी ची मात्रा असावी. हे अनेक वेळा अभ्यासातून सिद्ध झाले आहे की, immunity बळकट आणि immunity चे असे विचित्र वागणे कमी करण्यासाठी व्हिटॅमिन सी मदत करते. काही जणांना लिंबाने ॲलर्जी वाढते, अशांनी लिंबाऐवजी इतर घटक जसे की, आवळा, संत्री यांचा उपयोग करावा. व्हिटॅमिन सी च्या नियमित सेवनाने स्किनच्या सर्वच आजारांमध्ये खूप चांगले रिझल्ट मिळतात. ज्यांना व्हिटॅमिन सी असणारे कोणतेच पदार्थ खाण्यात चालत नाहीत, अशांनी व्हिटॅमिन सी च्या supplement घेणे योग्य राहील. परंतु कोणत्या ना कोणत्या रूपात व्हिटॅमिन सी शरीरात नियमितपणे जाईल याची काळजी घ्यावी.
खाण्यात acidity निर्माण करणारे पदार्थ टाळावेत. जास्त प्रमाणात टोमॅटो असणारे पदार्थ, तळलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ, क्रिस्पी पदार्थ म्हणजेच टोस्ट, बटर, खारी, चिप्स असे पदार्थ खाणे टाळावे. शक्यतो बाहेरचे पदार्थ कमीतकमी खावेत. भरपूर पाणी प्यावे, नियमितपणे व्यायाम करावा, ऊन्हात बाहेर पडताना नेहमी sunscreen वापरावे. शक्यतो sunscreen निवडताना वास नसणारे, रंग नसणारे, इसेन्स नसणारे निवडावे. कारण या घटकांनी सुद्धा काहींना ॲलर्जी होऊ शकते.
शेवटी एक महत्त्वाची गोष्ट सांगते, कोणत्याही प्रकारच्या auto immune type आजारांना पूर्णपणे बरं करता येत नाही. फक्त नियंत्रणात ठेवता येते. म्हणूनच लक्षणे दिसल्यावर वेळ न वाया घालवता ताबडतोब उपचार सुरू करावेत आणि उपचारांमध्ये सातत्य नक्की ठेवावे.
कसा वाटला आजचा विषय? मला खात्री आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. पुन्हा भेटू पुढच्या भागात एका नव्या विषयासह.
Till then stay healthy be happy
- दीप्ती काबाडे, अजार्तज्ञा