तुळशीचे बनी

24 Sep 2023 10:00:00

तुळशीचे बनी

तुळशीचे बनी जनी उकलते वेणी...

एका चैतन्यमयी प्रभाती, कोवळ्या रवीकिरणांसोबतच आली होती ती, त्या वनामध्ये. या वनामध्ये ना होती भिती वन्य पशूंची ना वन्य वृत्तींची. अथांग अशा समुद्रातील लाटेला यावसं वाटावं किनाऱ्यावर आणि त्यासाठी तिनं उसळावं, शून्यावस्थेप्रत पोहोचण्यासाठीचं चांचल्य दाखवावं आणि धावत, स्वभान हरपून तो पैलतीर गाठावा, अगदी तशीच, तशीच आली होती ती. उत्कटतेने, उत्साहाने, किंबहुना उत्साहाच्याही पकडलं होतं काही. ती आली, शुचिर्भूत होऊन. कदाचित तिच्या शुचिर्भूततेची तिलाही जाणीव नसेल; पण तरीही एका विलक्षण ओढीने ती आली. हे वन होतं तुळशीचं, म्हणजे 'त्याचं' पण खरतर, फक्त तिचचं! तिची ओढ इतकी की, त्या भेटीच्या इच्छेने ती तुळशीसाठी पाणीही आणायला विसरली होती. इथे आल्यावर स्वतःच्या असण्याचचं भान जिला नव्हतं, जी स्वतःलाच विसरली होती, तिला पाणी विसरल्याची जाणीव होणार तरी कशी! ती तिथे एकटीच होती पण तिच्यासोबत होत्या अनेकानेक निळ्यासावळ्या कृष्णरंगात रंगलेल्या तुळशी! पण कोण कृष्णप्रिया आणि कोण कृष्ण? सागराच्या मध्यात उभं रहावं आणि अष्टदिशांना, सर्वेंद्रियांना फक्त निळंशार पाणी दिसावं अशी तिची अवस्था होती. लौकिक अर्थानं ती त्या वनात असली, तरी तीही उभी होती सागरातच! प्रेमाच्या सागरात, भक्तीत भिजून गेली होती, सर्वांगाने. दृष्टी जाईल तिथ पावतो दिसत होतं फक्त एकच, कृष्णात भिजून गेलेलं विठूतत्व! सारं काही श्यामल रंगात सजलं होतं, अगदी तीही! या खोल हिरण्यगर्भाविषयी बोलणं, त्याचं चिंतन करणं एवढंच काय समुद्राच्या तळाशी जाणंही एकवेळ सोपं; पण तिच्यासारखं त्या स्वरुपात राहाणं, त्याला सर्वार्थाने अनुभवणं केवळ अशक्य! अर्थात, ते तिच्या भक्तीचं सामर्थ्य, तिच्याही नकळत असलेलं.

ओल्या मातीतून चालताना, तिला ना होतं ओल्या-कोरड्याचं भान, ना होती चालण्याची शुद्ध. अशा भावविभोर अवस्थेत, ती उकलत होती तिची वेणी. कदाचित भक्तीच्या नऊ पाकळ्या उलगडत ती चालली होती पुढे, पाऊलही पुढे न टाकता किंवा पोहोचली होती ती अशा स्तरावर की, तिच्याही नकळत तोच सोडवून घेत होता तिच्याकडून सारी बंधनं, आताच्या, कालच्या आणि कदाचित अकल्पीत काळातही कळत नकळत बांधल्या गेलेल्या एकनेक गाठी. त्या तर अदृश्य होत्या; पण तिच्या प्रेमाच्या सामर्थ्यापुढे काहीच अशक्य नव्हतं! ही वेणी उकलली गेली, सारे गुंते सुटले, बंधनं तुटली आणि त्या मोकळेपणाच्या अलौकिक चैतन्यात, क्षणात दिसले, ते. ते आकार धरलेले निराकार धाराधर. त्यांचा तो श्यामल रंग तिच्या डोईवर वर्षाव करु लागला. धाराधर कसले, तो तर पांडूरंगच! तोच तो, सावळा पीतांबरधारी! त्याचं ते रुप, त्याचा रंग, आकार, सारं काही बघून तिच्या मनात श्रीरंगाच्या लाटा उसळत होत्या. त्या भावविभोरावस्थेत, पडणारे ते श्यामलथेंब म्हणजे होती, कृष्णकृपा, फक्त कृष्णकृपा! त्या थेंबांचा तिच्या सर्वांगाला स्पर्श होत होता; पण त्या श्यामल रंगाने भिजून गेलं होतं तिचं हृदय, तिचं अंतरंग, सर्वांगाने, सर्वार्थाने. ती त्या श्रीरंगात अंतर्बाह्य भिजून गेली होती. जनी, सारं वन, वातावरण, सारं काही भिजून निघत होतं कृष्णकृपेने, विठ्ठलकृपेने. तिथे ना होते गुलाब, ना चाफ्याचे गुच्छ; पण, अथांग अशा जलाशयात, सहस्त्र कमळे उमलावीत, त्यांच्या पराग कणांचा सडा पाण्यावर तरंगावा आणि त्यावरचे भ्रमरकूजन हे जेवढं विहंगम दृश्य आहे, त्याहीपेक्षा अलौकिक असं सुख मिळत होतं साऱ्यांनाच, त्या धम्मधारांमध्ये, तिच्या असण्याने. लक्षावधी मोगरे फुलावेत असा सुगंध दरवळत होता. कारण तिच्यामध्ये जाणीव उमलली होती, तिथे त्याच्या असण्याची, तिच्या सर्वस्वाच्या असण्याची.

या कृष्णोदकांत सारेच भिजत होते, पण तुळशीचे मात्र अहोभाग्य! कारण, तिच्यावर होत होता अभिषेक, कृष्णकृपेहूनही बहुमोल अशा तिर्थाचा. तिच्यावर बरसत होती, अनंतशा उत्कट विठ्ठलभक्तीची उष्णोदकं! ती बरसत होती तुळशीच्या मुळाशी, किंबहुना, साऱ्या विश्वाच्याच मुळाशी!

ती निसर्गात रममाण झाली नव्हती, तर निसर्गाचाही सर्ग जिथून होतो त्याच्याशीच तदृप झाली होती.

त्या तुळशीच्या मुळाशी असलेलं एक श्यामल तुलसीपत्र सजलं होतं या अतिपवीत्र तीर्थात. तिच्याही नकळत, ते पत्र अलगदपणे विलग झालं रोपापासून. ते धारण केलं त्या तुलसीप्रियाने, त्या आनंदकंदाने, आनंदाने, स्वतःच्या मस्तिश्कावर. स्वतःच्या कपाळावर एक तुलसीपत्र प्रकट झाल्याचं भानही जनीला राहिलं नव्हतं. हीच सायुज्यता, नाही का?

- पार्थ जोशी

Powered By Sangraha 9.0