खंबीर आणि टिंगमो - लडाखी ब्रेड्स

22 Sep 2023 12:19:00

खंबीर आणि टिंगमो - लडाखी ब्रेड्स

खंबीरराव आणि टिंगमोराव ही दोन कुस्तीवीरांची नावे वाटतात ना? पण हे ब्रेड आणि बन आहेत. खंबीर बनवतांना त्यात यीस्ट टाकतात. मीठ, यीस्ट आणि गव्हाचे पीठ पाण्यात भिजवतात. दुसऱ्या एका प्रकारात ताकत कणिक भिजवतात. हे पीठ फर्मेंट करण्यासाठी काही तास ठेवले जाते. मग हातावर जाडसर गोल भाकरीसारखा ब्रेड थापून तो भाजला जातो. पूर्णपणे गव्हाच्या पिठापासून बनवलेले खंबीर आणि बटर चहा तिथला प्रसिद्ध नाश्ता आहे. आपल्याकडे पूर्वी काही लोक चहा चपाती सोबत खायचे त्याची आठवण झाली. फर्मेंट केलेले पीठ पचायला हलके तर असतेच; पण त्यात प्रोबायोटिकही असतात. यावर कधीकधी काळे तीळही लावले जातात. खंबीरला तागी म्हणजेच ब्रेड असंही म्हणतात. बटर चहासोबतच नव्हे तर भाजीसोबतही तागी खातात.

टिंगमो हा मऊ बनचा प्रकार आहे. बन असला तरी काही फिलिंग/सारण नसते. गव्हापासून बनवलेला टिंगमो मुख्यतः मांसासोबत खातात. ब्रेकफास्टपासून डिनरपर्यंत केव्हाही खाता येतो. तिबेटमध्ये जास्त खाल्ला जातो. वाफवलेले मोमोज असतात तसा हा वाफवलेला बन. टिंगमोची कृतीही सारखीच आहे. मैदा किंवा गव्हाचे पीठ, मीठ, साखर तेल, यीस्ट याचे पीठ भिजवायचे. स्ट्रेच, फोल्ड आणि रोटेट ही पद्धत वापरून पीठ मळले जाते. (बेकिंग करणाऱ्या लोकांना माहीत असेल) त्यानंतर एक तासासाठी पीठ फर्मेंट करायला ठेवतात. तोपर्यंत पीठ दुप्पट झालेले असते. या पिठाच्या लांबलांब पट्या कापून त्यांना छान फुलाच्या आकारात गुंडाळतात. सिनमन रोल्स असतात ना तोही आकार असतो याचा. मग हे गोंडस टिंगमो वाफवले जातात. वाफवल्यावर गरमागरम भाजी किंवा चहासोबत खातात.

हे दोन्ही पदार्थ तिबेटमधून भारतात आले असं म्हणतात. याचा इतिहास फारसा माहीत नसला तरी खंबीरवर एक रिसर्च पेपर मिळाला. लच्छा आणि मलबार पराठा बाजारात पॅकेटमध्ये मिळू शकतो मग हे दोन ब्रेड का नाही? हा प्रश्नही मनात आला आणि यावर लोक रिसर्च करताय हे पाहून बरं वाटले. आतापर्यंत मी जवळपास सर्व पदार्थांचे कौतुक केले असेल; पण टिंगमो प्रकार मला तरी फारसा आवडला नाही. मी खाल्ला नसला तरीही वाफवलेले ब्रेड आपल्याला पचायला आणि चवीला चांगले असतील असं मला वाटत नाही. हे पूर्वग्रहदूषित मत बदलण्यासाठी मला लवकरात लवकर लडाखला फिरायला जावे लागणार हे मात्र खरे!

- सावनी

Powered By Sangraha 9.0