मधूनच त्यानं सुमन बाईला भाकरी बांधायला अन् बिगीने आवरायला सांगितले. आपल्याला पावसाचा अंदाज बघून लवकर निघायला हवं, असं म्हणून तो तिच्या भवती गरबड करू लागला होता. बरसदीचे दिवस जवळ येत होते अन् आता कामाचा उरक वाढवायला हवा म्हणून गोंडाजीसुद्धा गरबड करू लागला होता.
तितक्यात संतूचा आवाज आला, “अय लेका मला बी येऊ दे रे, बरसदीच्या आदी म्या बी दगुड घेऊन येतो. म्हंजी मग बरसाद सुरू झाली की, आपलं टिकी टिकी टाके द्यायचं काम चालू राहील नाय का...”
नागू त्याला बघून हसू लागला अन् बोलता झाला, “हाव रे लेका, तुझ खरं हाय बघ, वजीस आवर अजून वाहतूळ आहे त्यांना आवराया, सुमनबाई न्याहारी बांधायली चौघ संगीतनं अन् सांच्याला संगतीनेच घर जवळ करा.”
संतू हे बोलणं ऐकत त्यांच्या शिंगराला पाणी पाजत होता. पाणी पाजून झालं तसं त्यानं त्याच्यावर पोत्याची झूल टाकली अन् तो त्यात त्याचं दगुड फोडायच साहित्य टाकू लागला. त्याला काह ध्यान आलं एकाकी समजलं नाही त्यानं त्याची बंडी चपापली; पण त्याला काही गवसत नसल्याचा उधार भाव तो चेहऱ्यावर आणून झोपडी आता गेला अन् आवजाराच्या जागी असलेल्या वळकटीत ठेवलेली छटाक किंवा पावशेराची देशीची एक चपटी त्यानं बंडीच्या आत असलेल्या चोर खिशात टाकली अन् तो काहीही न केल्याचं उसनं आवसान आणून त्याच्या बायकोची नजर चुकवित शिंगरा मोहरं येऊन उभा राहीला अन् त्याच्या घरदनीला मोठ्यानं आवाज देऊ लागला.
संतू बोलू लागला, “म्या काय म्हणतो आवरतया का आजच्या दिस का दिवस इथंच मावळतीला घालायाचा इच्चार हायसा?
त्याची बायको बोलू लागली, “नाय वं जी निघालू की, आता न्याहारी बांधायली, तुम्ही वजेस एका काम करा तू पर, झोपडीच्या मागल्या अंगाला पोत्याची कॅन हायसा तितकी भरून झूलीला बांधा...
संतू बोलू लागला, “मायला हा काय तमाश्या बा. गडी असून बायकांच्या कामाला जुंपायली तू त मला.”
दूरवरून नागू त्यांचं बोलणं ऐकत असल्याचं संतूच्या लक्षात आलं.
तसं तो गुमान जाऊन कॅन भरून घेऊन आला अन् शिंगराच्या अंगावर असलेल्या झुलीला पक्की बांधून तो निघाला. मागून डोक्यावर पदर अन् पाटी घेऊन अन् कपाळावर आडवे कुंकू लावलेली त्याची बायकोही त्याच्या मागे निघाली.
दोघेही नागूच्या घराजवळ आली अन् संतू गोंडाजीला हाळी देऊ लागला, “अय गोंडाजी आवरलं का लेका, सुटतू या का बायकोचा पदर आजच्या दिस?” अन् नागूकडे बघून तो हसायला लागला, एकाकी सगळे हसायला लागले.
लाजतच गोंडाजी झोपडीतून बाहेर आला, रानूबाईने ठेवलेल्या कोऱ्या चहाचा कप तो थाळणीत घेऊन आला. त्यानं सगळ्यांना चहा दिला, तितक्यात सुमनबाई डोक्यावरचा पदर सावरत पाटी घेऊन समोर आली. तिला लाजायला झालं अन् ती खाली नजर घालून संतूच्या बाई संगतीने चालायला लागली. संतू नागूची राम-श्याम झाली. गोंडाजी संगतीने संतू आपआपली शिंगरू घेऊन गावाच्या सडकीनं निघाली.
गावच्या चौफेर रानाला येड्या बाभळीचे वने असल्यानं गाव चहूकडून बंदिस्त होता. गावच्या एका अंगाला मुसलमान बांधवांचा मोहल्ला अन् एका अंगाला महार, मांग बांधवांची वस्ती होती. एका अंगाला घिसाडी लोकांची झोपडी वजा घरं बरसदीच्या सुरुवातीला तीन महिने असायची अन् मग एखादा गावचा पाटील असावा तसा गावचा घिसाडी गावची सर्व कामं बारा महिने करायचा. अशानं त्याची गावात वट होती, गावात पाटलांच्या मांडीला मांडी लावून तो बसायचा.
घिसाडी लोकांचा काफिला त्यांच्या गावाला गेला की, मग संतू अन् नागू यांच्या झोपड्या गावच्या एका अंगाला असलेल्या बाभळीच्या वनात पडायच्या; पण गेले दोन-तीन साल त्यांची इथे त्यांचं ठाण मांडून ठेवलं होतं. गावच्या मोहरे असलेल्या मोकळतीच्या रानाला तीन-चार खदानी होत्या, दगुड जीव घ्यायचा. खूप मेहनतीने आचारी जेव्हा खव्याची बर्फी करतो अन् ती जशी रवेदार होऊन छान आकारात कापली जाते. तसा इथला दगुड आकाराला व्हायला फार त्रास देत नव्हता. अर्धा अधिक टाके देऊन झालं की, फुटत नव्हता.
क्रमशः
- भारत लक्ष्मण सोनवणे