दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - २

02 Aug 2023 10:00:00

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगण…

संतूच्या बाईच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी नागू तिच्याकडे बघत बोलू लागला: राणू ठीक हायसा..! दगड फोडायचं काम झालं हायसा आता ती दोन दिवसा महुरं येईल तुझ्या संगतीनं डोईवर वऱ्हाटे, पाटे इकाया.

बोलणं ऐकून संतूची बायको बोलती झाली: ठीक हायसा अण्णा मला बी अक्काच्या संगतीने ई- जा करायला बराबरी होईल. चहा घेतलासा का अण्णा असं संतूच्या बायकोनं विचारलं..!

नागू नकारार्थी मान हलवत म्हंटला नगूया आता गोंडाजी यायला असल सडकी तो आला की जेवण-खावान होतीया मग..!

नागू धोतर सावरत संतूला म्हणतो: येतूया संतू लका, झगडा नग करुस भाडीच्या काम भी कर जरासा..!

संतूनं मुकाट्यानं मान हलवली अन् हु हु करू लागला अन् नागू तिथून झोपडीच्या वाटेनं निघाला.

नागू काही वेळात पाय आपटीत झोपडी लोंग आला अन् त्याच्या झोपडीसमोर असलेल्या बाजीवर बसून वाटेला नजर लाऊन बसला होता.

इतक्यात त्याला दूरवरून शिंगराना हाकरत येणारा गोंडाजी दिसला अन् पाठीशी त्याची बायको सुमन दिसली दिसताच त्यानं रानूबाईला हाक मारली.

राणे अय राणे..!

धाकली जोडी येऊन राहिलीया चुल्हांगणावर पाणी तापाया ठेव. दमली अस्तीला इळभर दगड फोडूनसनी..!

रानुबाई उठली भाकरीचं टोपलं महूरं घेऊन तिनं चुल्हांगणावर डेचकीत पाणी तापाया ठेवलं. तितक्यात गोंडाजी अन् सुमन शिंगरांना हाकरत हाकरत झोपडी पहूर आली. सुमन डोईवरचा पदर सावरत न्हाणीघरात गेली राणूबाईनं तिला बादलीत पाणी काढून दिलं अन् ती हातपाय धुवू लागली.

नागू बाजीवरून उठून गोंडाजीच्या हातून शिंगरं घेऊन त्यांच्या अंगावर आणलेल्या वऱ्हाटे, पाट्यासाठी आणलेला दगड निरखून टाके द्यायचं राहिलेल्या दगडात ती दगड रचू लागला. सोबतच गोंडाजीसोबत गाव महूरच्या खदानीबद्दल बोलू लागला. हातपाय धुवून गोंडाजी अन् नागू बाजीवर बसले अन् राणूबाई, सुमन चहा कपात ओतत त्यांच्याकडे देत त्यांच्या मोहरे अंगणात बसले.

इकडच्या तिकडच्या गप्पा होऊ लागल्या राणूबाईनं चुल्हीवर कढईत टाकलेलं पिठलं रटारट आळत होतं काही अवधीनं नागू अन् गोंडाजी झोपडीत आले अन् सुमनबाईनं ताट वाढाया घेतले चौघ जमली अन् सुमनबाईने सर्वांना वाढून दिले. जेवणाबरोबर संसाराच्या अनेक गोष्टी चालू होत्या.

आयुष्यात इतके सर्व कष्ट सहूनसुद्धा ते सर्व सुखी समाधानी होते. पिठाच्या डब्ब्यावर ठेवलेली घासलेटाची चिमणी विझायला करत सर्वांची जेवण झाली राणूबाईनं भांड्याचा गराडा महूरच्या अंगणात घेतला अन् दोन्ही मिळून कुणी भांडे घासू लागले कुणी हिसळू लागले. भांडे आटोपून दोघीही काम आवरून झोपडीत आल्या सुमनबाई अन् धोंडाजी परसदारच्या अंगणाला आडोसा केलेल्या वळकटीत झोपी गेले अन् राणूबाई झोपली अन् नागू आपलं पांघरून घेऊन बाहेरच्या खाटेवर पडून राहिला.

काळ्याभोर आकाशात चांदनं लकलकत होती. नागू त्याच्या ह्या संसाराची चमक अन् उद्याची स्वप्ने त्या चांदण्यात विहार करत बघत बसला. जसजशी रात्र सरायला लागली तसे नागूचे डोळे जड पडायला लागली अन् नागू बाहेरच्या खाटेवर झोपी गेला.

पहाट झाली तांबडं फुटलं, कोंबड्यानं बांग दिली तसे राणूबाई उठल्या अंगण झाडून झुडून घेतलं अन् चूल शिलगवून राणूबाईनं पाणी तपाया ठेवलं. एका मागोमाग सर्वांच्या अंघोळी झाल्या सकाळची काम आवरली अन् सकाळची न्याहारी करून दुपारच्या भाकरीचं पेंडकं पोत्यात ठेऊन गोंडाजी अन् सुमन खदानीच्या वाटेनं दगड आणाया निघाली.

टाके द्यायच्या कामाचा उरक आवरता बघून वऱ्हाटे, पाटे घेऊन संतुच्या बायको संगतीने तालुक्याच्या गावाला वऱ्हाटे,पाटे घेऊन राणूबाई निघाली. नागू आपल्या बायकोला नजरेआड जास्तोवर बघत राहिला. इतके वर्ष काहीही तक्रार न करता राणूबाईचं चालू असलेलं काम हे सगळं नागू संतूला सांगू लागला. संतूलासुद्धा आता हे सर्व पटलं होतं, दोघेही एकमेकांच्या नजरा चुकवत आपापल्या झोपडीकडे निघून गेली अन् उरलेल्या दगडांना टाके देऊ लागले, घाव देऊ लागले.

सांज ढळली तसं राणूबाई अन् संतूची बायको माळावरून येताना नागूला दिसली जशीजशी सांज सरत होती तशी राणूबाई आपल्या आयुष्यात तिच्या संसारासाठी झुरत असताना नागुला दिसू लागली होती.

क्रमशः

भारत लक्ष्मण सोनवणे.

Powered By Sangraha 9.0