दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं...! भाग – ४

16 Aug 2023 11:21:31

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगण…

अस्ताला गेलेल्या सूर्याला निरोप देऊन रानूबाई आणि सुमनबाई सायंकाळच्या रांधायच्या कामाला लागल्या अन् नागू सायंकाळचे थोडंफार फिरायला म्हणून गाव भटकंतीला निघाला. संतूच्या झोपडी मोहरे गेला. तसं त्याने संतूला आवाज दिला.

“अय संतू चलतूया का लका गाव मोहरच्या देऊळातल्या खंडूबा पाय पडून याऊया... अन् शनिदेवाला तेल आणि खंडोबाच्या देऊळात भंडारा वाहून येऊ या...”

संतू खदानितून नुकताच दगड फोडून आला होता अन् हातपाय धुवून पडवीत पडून बाहेर बघत होता. त्यानं नागूचा आवाज ऐकला अन् तो धोतराचा सोगा सावरीत उठला, देव्हाऱ्यात असलेल्या देवाच्या तेलाच्या शिशितून त्यानं एका पंत्तीत थोडं तेल घेतलं अन् दोन अगरबत्या हाताला घेऊन तो पण नागूच्या संगतीने गावाच्या वाटेनं लागला.

नागू अन् संतूच्या दिवसभराच्या खंडलेल्या गप्पा सुरू झाल्या.

नागू बोलता झाला, “मग लेका कितीक खडूक फोडलासा आज अन् बेस हाय का खडक की भुगा हुतूया?”

संतू बोलता झाला, “खडुक फोडलासा रं अण्णा सात आठ पाट होतीला अन् दोन चार वऱ्हाटं, खडूक बेस हाय कुठं कपरीला झालं हाय थोडू हलकू भुगा होई राहीला पण ब्येस हायसा काम पुरी खायला करायला.

त्याच्या या बोलण्याला ऐकत नागू बोलू लागला, मग ठीक हायसा निस्त अबदायला काय पुरी खातं घामाचा पैका पण व्हायला हवासा. बाकी आमची लेक गेली हुतीया वाटतं आज रानुबाईच्या संगतीने वऱ्हाटे पाटे इकाया का रं लेका..?

संतू बोलता झाला,

तुमचं सबुत खरं हाय अण्णा निस्तू आबदून काय फायदा नाय पैका पण मोकळा व्हायला हवा अन् हाऊ गेली होती तुमची लेकी तिच्या माय संगतीने शहराला आज वऱ्हाटे पाटे विकाया. ती हायसा म्हणून बरं चालू हायसा नायतर एकट्याच्याना काय होतंया हे काम अण्णा पहाटेला उठून न्हाऊन धुवून मी शिंगराला घेऊन खदानीला जातू, मग दिवसभर खडक फोडतू. ती घरचं आवरून जातीया शहराला दोन पैक करून आणीतीया दगुडाचे.

हे ऐकून नागू संतुकडे बघत त्याच्या खांद्यावर हात ठेवत बोलू लागला,

तेच तर म्हणतू लेका काल तुला हेच सांगत हुतो पण तू प्यायला अन् त्या नशेत माझ्यावरच डाफ्रायला लागला नाही ते आरोप करायला लागला. अरे लेका ती माझी लेक सरीक हाय, मला तिचं चांगलं झालं तिनं कामधंदा करून दोन पैक घराला लावले तर मला काही वाईट थोडी वाटायचं रे संतू..!

अन् एक सांगू तुला आपला काम असा हाय की एकाच्या भरोश्यावर नाही चालायचा तू मी दगड फोडू, त्याला टाके देऊ पण इकायाची वेळ येते तेव्हा आपल्या कारभारणीच लागतीया. ती कसं शहरात बया माणसांना दोन शबुद बोलतीया ती आपल्याला जमल का सांग बरं.

असं भांडल्यानं होत असतूया का संसार, हा थोडं भांड्याला भांडं लागायचं पण असं एकाने नमते घेऊन करायचा अस्तू नाही का संसार.

संतूला नागूचं हे बोलणं पटलं अन् तो चुकी कबूल करून बोलू लागला, होरे अण्णा आता नाय वागायचो असा, नाय द्यायचो तुझ्या लेकीला त्रास. मला तरी तिच्या बिगर कोण हायसा, ती पण थोडी तापड हाय पण तू म्हणतू ते पण खरं हाय, आता नाय रे भांडायचो.

नागू त्याचा हातात हात घेऊन हसत हसत बोलू लागला,

ठीक हाय लेका तुझ्यावर हाय माझा भरुसा, होतंया थोडफार इकडे तिकडे अन् तेव्हढे चालायचं संसार म्हंटले की..!

आता दोघे गावात पोहचले होते. गावात सांज सरली तशी जगंनाडे महाराजांच्या मंदिरात हरिपाठ घेणारं भजनी मंडळ हरिपाठ म्हणू लागलं होतं, अन् त्या हरीपाठचा आवाज दोघांच्या पहूर येत होता. गावाच्या येशीला असलेल्या लाल पथदिव्यांच्या सभोवताली पावसाळी पंख आलेल्या पावसाळी माश्या भिरकावत होत्या.याचा अंदाज घेत दोघांनी पावले उचलले कारण पाऊस येण्याची ही चिन्ह होती दिसून येत होती. काळोखात भरकटणार आभाळ अन् ढगांचा गडगडाट ऐकू येताच दोघे पावले उचलत उचलत खंडूबाच्या देऊळात आले.

वाहना काढून खंडोबाच्या मूर्तीवर भंडारा फेकून बाहेर पटांगणमध्ये डाव्या पायावर उभा राहून संतूने पूर्वेला भंडारा उधळला.अन् यळकोट यळकोट जय मल्हारची घोषणा देत त्यानं मंदिरात लोटांगण घातलं. नागुपण तसंच काही करत देऊळातून बाहेर पडला. दोघांनी वाहना घातल्या अन् शेजारी असलेल्या शनिदेवाच्या देउळकडे निघाले आता पाऊस सुरू झाला होता.

देऊळाची पत्र वाजू लागली होती अन् अंदाज बघता चांगलाच पाऊस पडेल असं वाटत होतं. सांजेचा पाऊस म्हंटले की तो काही रातभर सरत नसतो या विचारांनी संतू अन् नागूच्या मनात धडकी भरली अन् ते बिगिनेच शनिदेवाचे पाय पडून देवाला तेल वाहून दिव्यात असलेली वात दिव्याशी नीट करत अगरबत्ती लाऊन सभामंडपात येऊन बसत पाऊस कमी होण्याची वाट बघत बसले.

क्रमशः

भारत लक्ष्मण सोनवणे.

Powered By Sangraha 9.0