पायाशी विखुरलेला प्राजक्त काही वेगळंच सांगतोय...

24 Jul 2023 13:06:08

पायाशी विखुरलेला प्राजक्त काही वेगळंच सांगतोय...

आकाशी झेप घेण्याची इच्छा आहे तशी

विहंगाच्या सोबतीची स्पृहा सुद्धा

स्वतःच्या आनंदाची ग्वाही मिळवून देणारी मृगजळे

पाहताना त्या शेवटाचा थांगपत्ता नसणाऱ्या आकाशात

झेप घेण फार हवंहवंस वाटणारं आहे...

आयुष्याभर पुरून राहिलं अशा आभासी गोष्टींना

आपलसं करणं कठीण कितीही असलं तरी

वेड्या आशांसाठी तरी झेप घेणं भाग आहे

पण...

पण आकाशाकडे लक्ष असताना

पायाशी विखुरलेला प्राजक्त काही वेगळंच सांगतोय.

अब्दांचा तो प्रवास आणि सारं काही

त्यालाही खुणावतंय

तरी याहूनही त्याला रूचतंय ते

हेच

त्याच्या भूमीसोबत एकरूप होणं...

चिंता साऱ्या विसरून जणू

आभासी नव्हे तर खरं आभाळ

निवांत न्याहाळत बसणं...

त्याच्याकडे पाहून मनोमन खुळणाऱ्यांना

असाच कायम आनंद देणं...

जे आपलं आहे

त्यालाच सर्वस्व देऊन टाकणं...

पायाशी विखुरलेला असला तरी

कोणासाठी तो आनंद आहे

धरतीसाठी हसत येऊन बिलगणारा

तो जणू वात्सल्याचे प्रतिक आहे

वेचण्या त्यास आतूर असल्या मनांसाठी

तो अनमोल असा ठेवा आहे...

क्षणिक जीवनसुद्धा सुंदर असू शकते

हे सांगणारा तो

त्याच्या विश्वाचा राजा आहे

आभाळ अजूनही खुणावतंय

वेड्या आशा अजूनही तशाच आहेत

विचारचक्रात झेपेसाठीची तयारीच आहे

पण...

पायाशी विखुरलेला प्राजक्त काही वेगळंच सांगतोयl

- मैत्रेयी सुंकले

Powered By Sangraha 9.0