''येवा कोकण आपलाच असा'' असं म्हणत प्रत्येक कोकणी माणूस आपल्या पाहुण्यांचे मनापासून आदरातिथ्य करतो. या आदरातिथ्य आणि कोकणातल्या निसर्गामुळे इथे आलेल्या कोणाचेच इथून पाऊल निघत नाही.
म्हणुनच की काय वर्षातील चार महिने आपल्या भारतामध्ये हजेरी लावणारा पाऊस कोकणात अगदी मनापासून राहतो, फिरतो आणि मौज करून जातो. कोकण पावसाळ्यात अधिक सुंदर दिसते. सारीकडे हिरवळ, मधूनच पांढरे शुभ्र धबधबे यांमुळे मनमोहक बनते हे सारे आलेच. परंतु अजून काही गोष्टींमुळे पाऊस कोकणवासीयांसाठी हवाहवासा ठरतो. पहिला पाऊस आल्या नंतर येणाऱ्या रानभाज्या, शेत लावणीची लगबग या गोष्टींसाठी अस्सल कोकणी पावसाची मनापासून वाट बघत असतो. या वाट पाहण्यामुळे की काय पाऊस खरोखरीच माहेरवाशिणी सारखा हक्काने इथे बरसतो. होय बरसतोच! रिमझिम पावसाची कोकणाला सवय नाहीच मुळी. एखाद दिवशी प्रचंड उकडू लागावं, गावातील बहाव्याचे झाड अगदी बहरून जावे आणि मग अगदी भर दुपारी घरातील सारे दिवे लावावे इतका अंधार होऊन पुढल्या क्षणी पावसाच्या पहिल्या सरील्या सुरूवात व्हावी.. आणि कोकण सज्ज व्हावं!
सज्ज यासाठी कारण पावसाळा, निसर्ग या साऱ्यामुळे कोकण कितीही सुंदर, मनमोहक दिसत असेल तरी या चित्रामागे कोकणवासीय अनेक गोष्टीना सामोरे जात असतात. कोकणातील ज्या झाडांमुळे कोकणाचे निसर्गसौंदर्य आहे त्या झाडांच्या छोट्याश्या फांद्या, माडाचे झाप वाऱ्यामुळे अनेकदा विजेच्या तारांवर पाडतात आणि मग पुढचे किमान चार तास ते गाव विजेविना जगात राहतं. कधी अचानक वादळीवारे सुटतात आणि लहानपणापासून आपण ज्या झाडांच्या सावलीत खेळलेले असतो ती झाडे डोळ्यांदेखत जमीनदोस्त होतात. कोकणातल्या ज्या रस्त्यांवरून लाल मातीचे व्हिडियो काढत आपण फिरतो त्याच रस्त्यावर गुडघाभर पाणी अगदी सहज भरतं. मधूनच कधी दाराच्या फटीतून एखादं कीडं निघतं. नद्या तुडुंब भरून वाहू लागल्या तर कधी कधी इतर गावांसोबतचा संबंध तुटतो. पाऊस लांबला तर पीक वाहून जातं. कोकणात पाऊस एकदा सुरू झाला की तो किमान एक तास सुरूच राहतो. अनेकदा सातिरं लागल्याचं म्हणजे सात दिवस संततधारे सारखा तो सुरू राहिल्याचे किस्से गावागावत सांगितले जातात. कोकणात आलेल्या अशा अडचणींवर लगेच उपाय शोधले जात नाहीत. वीज गेली तरी ती लगेच येईल असा सकारात्मक विचार कोकणी माणूस करत नाही याचं कारण म्हणजे वर्षानुवर्ष हेच चालत आलं आहे. माणसांची कमतरता आणि इतर काही तांत्रिक बाबींमुळे कदाचित पण कोणतीच सोय कोकणवासियांना सहजासहजी मिळत नाही. याचा अर्थ कोकणी लोक नकारात्मक आहेत असा नाही कारण अशा गोष्टी कितीही अन् कशाही घडल्या तरी कोकणी माणूस पावसावर मनापासून प्रेम करत राहतो. तो उगाच साऱ्या गोष्टींचा आळ निसर्गावर काय कोणावरही घेत नाही. कोकणात पावसाळ्यात येणारे सारे सण- उत्सव मोठ्या आनंदाने साजरे केले जातात. पाव्हण इलय असं म्हणत खरंच सकारात्मक राहणं काय असतं याची झलक साऱ्यांना दाखवत कोकण तिन्ही ऋतुंमध्ये साऱ्यांच आदरातिथ्य करण्यासाठी तयार असतं. आणि म्हणूनच मला वाटतं की एरवी कोकणाचं गुणगान गाणाऱ्या साऱ्यांनीच एकदा तरी पावसाळयात कोकणी माणसासारखं जगून पाहायला हवं.
- मैत्रेयी सुंकले