यशस्वी होण्यासाठी ढोर मेहनत करावी लागेल, जेणेकरून यश आपल्या पायाशी लोळण घेईल अन्; त्यासाठी मग अनेक चैनीच्या गोष्टींचा त्याग आपल्याला करावा लागतो. असं संतू अण्णा तलाठी रामाला सांगत होते.
रामा उक्खड बसून संतू अण्णा तलाठी यांचा जगण्याचा संघर्षरत जीवन प्रवास त्यांच्या तोंडून ऐकत होता. एका हाताने त्यांची सवय झालेली इस्माईल बिडी तर्जनीत धरून तिचा धूर मोठ्या श्वासाबरोबर आत घेत खोकडी झालेली छाती अजून खोकडी करून घेत होता.
त्याच्या जवळ गेलं की, त्यांच्या अंगातून येणाऱ्या घामातसुद्धा बिडीचा दर्प यायचा. त्याच्या श्वासात त्याला बिडीमुळे होणाऱ्या रोगाची लागण झाल्यावर जशी घश्यातून खरखर ऐकू येत असते तशी येत होती. तो तरीही खोकलत, खाकरत शिलगवलेली बिडी पिऊन तिच्या धुराचा लोट ओठांचा चंबू करून वर आकाशात सोडवत होता.
अंधारून आल्यानं ही वलये भर अंधारात गगनाशी भिडायला जात असावी अन् त्यांच्यात कुणी घनघोर युद्ध होईल असं वाटून जात होतं.
संतू अण्णा आपले गरिबीचे दिवस आठवून भावूक झाला होता. पोटाला वेळेवर भाकर मिळत असल्यानं लग्नसराईत आमंत्रण नसून एक वेळची पोटाची खळगी भरेल अन् आजचा दिवस उद्यावर ढकलल्या जाईल; या कारणाने संतू अण्णा तलाठी गावातली सगळी लग्न साजरी करायचे.
यामुळे गावकऱ्यांनी त्यांचं "पिठमांग्या" ठेवलेलं नाव अन् आजही गावात जेव्हा संतू अण्णा तलाठी झाले, तेव्हा गावच्या सरपंचांनी तरुणांना संतू अण्णा तलाठी यांच्याकडून प्रेरणा मिळावी म्हणून काढलेल्या मिरवणुकीत संतू अण्णा तलाठी यांना "पिठमांग्या" म्हणत होती.
आज खऱ्या अर्थानं गावचा हा "पिठमांग्या" साऱ्या गावाचा भूषण ठरला होता. "पिठमांग्या" चा "संतू अण्णा तलाठी" झाला होता. हे सगळं सांगत असतांना, संतू अण्णांना गहिवरून आलं अन् संतू अण्णा रामाच्या गळ्यात पडून रडू लागले.
संतू अण्णांचं हे संघर्षरत जीवन अन् यशाचं उंच शिखर गाठल्यावर गावातील तरुणांसाठी आपण झालेलो एक उदाहरण यामुळं संतू अण्णा खुश होते. संतू अण्णा यांनी तलाठी झाल्यावरच एक गोष्ट ठरवली की, या पुढे आपलं जीवन गावातील गरीब पोरांच्या शिक्षणासाठी अन् त्यांची नेमणूक ज्या गावी होईल तेथील गरीब मुलांच्या शिक्षणासाठी होईल ती मदत करायची. शिक्षण संदर्भात असलेल्या योजना गावात आणून गावचा विकास करायचा, असं मनाशी ठरवून संतू अण्णा वाभळेवाडीमध्ये शिकाऊ तलाठी म्हणून झालेल्या नेमणुकीनंतर आले होते.
हे सगळं ऐकून रामा हक्काबक्का झाला होता अन् आता त्याला आपण जगलेले जीवन अन् त्याचा भूतकाळ आठवू लागला होता. तो आता या आपल्या अर्थहीन जगण्याला आठवत संतू अण्णा यांचा हातात हात घेऊन रडू लागला होता.
ऐन तारुण्य अन् आता संपूर्ण जीवन कसं व्यसनाच्या आहारी जाऊन व्यर्थ घालवलं, हे तो रडत रडत सांगू लागला होता. त्याला त्याची चुकी कळली होती, त्याला या चुकीचं मूळ खोडून टाकण्यासाठी त्याने हे सगळं व्यसन सोडून संतू अण्णा तलाठी यांच्या सोबतीने काम करण्याचं संतू अण्णा तलाठी यांना सांगितले.
संतू अण्णा तलाठी यांनी रामूच्या या निर्णयाचं स्वागत केलं. ‘गावात पुढील काही दिवसात आपल्याला काही योजना राबवायच्या आहे, तुझं राहणीमान जर सुधारलं, तू सर्व तुला असलेली व्यसनं जर सोडली तर तुला या योजनेत सामील करून घेईल.’, असं सांगत रामाला संतू अण्णा तलाठी धीर देऊ लागले होते.
पुढे आपल्याला वाभळेवाडीसाठी काय करायचं हे सांगू लागले होते. रामू हे सगळं ऐकून घेत होता, अधूनमधून मी योजनेमध्ये काय काम करू शकतो हे ही तो सांगत होता. या अशा जगण्यात एक अनामिक सुख आहे, गावात चार लोकं तुझ्या शब्दाला मान देतील, असं संतू अण्णा तलाठी रामाला सांगू लागले. रामाला संतू अण्णा तलाठी यांचं म्हणे पटले अन् तोही हे सगळं ऐकून खुश झाला होता.
या सगळ्या त्यांच्या गप्पांच्या ओघात रात्रीचे नऊ कसे वाजले त्यांना कळले नाही अन् आता मात्र दोघांना कडकडून भूक लागली होती. सायंकाळच्या वेळी रामाने आणलेल्या भाकरी अन् कोड्यास ताटलीत घेऊन रामाने संतू अण्णा तलाठी यांना वाढून दिले अन् तोही धुडक्यात भाकर ठेऊन भाकर खाण्यास बसला होता. आज दिवसभर संतू अण्णा तलाठी आपल्यासोबत होते अन् आता रात्रीच्या जेवणालासुद्धा आपण संतू अण्णा तलाठी यांच्या खोलीवर आहोत हे रामाला सुखावणारं अन् खूप काही देऊ करणारं होतं.
क्रमशः
- भारत लक्ष्मण सोनवणे.