झांबेरी..!

21 Jun 2023 10:47:56
झांबेरी..!

सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या एका झांबेरी नावाच्या गावात भटकंती करत भटकतो आहे. तो कुठला तांडा, वस्ती, पाडा आहे हे कळायला मार्ग नाहीये. ठरवून असं सह्याद्रीच्या कुशीत आठ दहा कि.मी पायी भटकंती केली की मग मला अशी माझ्या ओळखीची माणसं भेटायला लागतात.

पहाटे आठ पासून या डोंगरदर्यात भटकतो आहे. का भटकतो याला कारण नाहीये. पण; मनाला क्षणिक सुखाचा आनंद या अश्या भटकण्यातून भेटत असतो. म्हणून; हे असं भटकणं होत असतं अधूनमधून.

झांबेरी तांडा, वस्ती, पाडा बघून आता या भर उन्हात माळावर येऊन बसलोय. इथे आलं की माझ्या डोळ्यांना गावच्या,गावातल्या कथा दिसू लागतात अन् मी त्यांना वाचू लागतो.

दूरवर वाऱ्याची झुळूक तुटत असताना दिसत आहे, दूरवर जिथवर नजर जाईल तिथवर लाल माती, मुरूम, दगडामातीचं हे रान डोळ्यांना नजरी पडत आहे.

डोंगरात हिरवं गवत म्हणून जनावरांना चारायला काहीही नसल्यानं माळावर माझ्याखेरीच दुसरं कुणी नाहीये. दूरवर डोळ्यांना ओसाड दिसणारं माळरान, अंगाची लाहीलाही होऊन निघावी असा गरम शुष्क वारा अंगाला झोंबत आहे. वाळलेलं गवत, मोहरच्या तोंडाला काटा असलेला भासावा असं कुसळ या रानात आहे. ते अगदी सोक्सच्या आत जाऊन पायांना टोचत आहे, पण ते ही काढावं वाटत नाहीये.

घटकाभरापुर्वी वस्तीला गेलो तेव्हा वस्तीला भटकणं झालं, वस्तीला पंधरा-वीस घरं आहे. माणसांचा कल्लोळ व्हावा इतकी माणसांची संख्या वस्तीला नाहीये. त्यामुळं बरं वाटत होतं. माणसं रानात असलेल्या जडी-बुटी, रान हळकुंड, कंदमुळे, विविध मुळ्या आणायला व पारवं, या मुरमट रानात दिसणाऱ्या घोरपडीची शिकार करायला भेटल म्हणून केव्हाच भटकंतीला निघून गेले आहे.

वस्तीवरल्या बायका मजल दरमजल करून माळाच्या कुशीत असलेल्या जिवंत झऱ्याचे पाणी हंड्यात भरून आणायला म्हणून कोसो दूर माळावर भटकत आहे. डोक्यावर हंडे अन् कड्यावर सोनेरी, भुर्या केसांची लेकरं घेऊन ती पाण्याच्या शोधार्थ भटकंती करत आहे.

वस्तीतले बहुतांश घरे पहाटेच कडी-कोंड्यात बंद झाली अन् वस्तीला खाटेवर बसलेल्या म्हाताऱ्या माणसांचा पहारा आहे. मानेवर केसं वाढेलेले भुरे कंबराइतके कुत्रे गावात वस्तीच्या लोकांमागे भटकत आहे.

वाऱ्याच्या झोताने कुडाची ही घरं एखाद्या वाहटुळीत उडून न जावो हे डोक्यात येऊन क्षणीक भीतीही वाटून गेली.

आता या भर उन्हात माळावर येऊन काय करावं हा विचार करत लिंभाऱ्याच्या सावलीत निपचित पडून आहे. पानगळ सुरू असल्याने वाऱ्याच्या झुळकेसरशी पानांचा येणारा आवाज अजून जवळचा वाटत आहे.

तर सांगायचं काय, भर दुपारची वेळ उन्हं अंगावर येतात अश्यावेळी गावाची ओढ लागते अन् गावाकडच्या आठवणी जाग्या होतात.

त्यामुळं अश्या सुट्टीच्या दिवशी गावाला येऊन जातो अन् दिवसभर गाव भटकून मनात खूप आतपर्यंत गावाला सामावून घेतो. जेव्हा पुन्हा शहराला जाईल तेव्हा या गावाकडल्या आठवणींवर मग काही दिवस या गाव रहाटीच्या जगण्याचं सुख विचारांनी की होईना अनुभवता येतं.

तर भर दुपारची वेळ,गावातले गडी लोकं या दुपारच्या वेळेला रानात गेलेली असतात. परंतु अश्यावेळी गावात जे कुणी असतं तेच आपल्याला हे गावपण जगण्याचं अन् ते अनुभवण्याचं सुख काय असतं ते सांगत असतात. त्यामुळे मी ही बहुतेकदा दुपारच्या या वेळेलाच गावात जात असतो.

पिंपळाच्या झाडाला चहूकडे बांधलेल्या पारावर अनुभवाची शिदोरी घेऊन बसलेली असतात गावातील वयस्कर मायबाप. त्यांना बघून असं वाटतं की, दुपारचा गावाला पहारा म्हणून ही बसलेली असावी. प्रत्येकाची एक आठवण अन् त्यांच्या आयुष्यात सध्या आलेला निवांतपणा मग पारावर बसून ही प्रत्येकाच्या आयुष्याची कथा सगळ्यांच्या समवेत वाचली जाते, ऐकली जाते. त्या आठवणींना उजाळा देतांना आपल्या जोडीदाराच्या सोनेरी आठवणी ते सोनेरी दिवस.

कुणी ऐकत असतो, कुणी दुजोरा देत असतो, कुणी आपल्या फेट्याचा शेला डोक्यावरून काढून त्याची उशी करून निपचित पडलेला असतो आसमंताकडे बघत, त्या आसमंताला डोळ्यात भरून घेत. कुणी देउळाच्या पायरीवर झोपलेला असतो, कुणी हितगुज घालत असतो, कुणी पंढरीच्या वारीची आठवण काढीत असतो. तर कुणी विठू माउलीच्या नावाचे नामस्मरण करत डोळे लावून भिंतीला पाठ लावून बसलेला असतो.

क्रमशः

भारत लक्ष्मण सोनवणे.

Powered By Sangraha 9.0