प्रियदर्शन पर्व

04 May 2023 10:00:00


प्रियदर्शन पर्व

सन २००० हे हिंदी सिनेसृष्टीतील उल्लेखनीय वर्ष म्हणता येईल, कारण विसावं शतक संपत असताना अमिताभ बच्चनचा मुलगा अभिषेक बच्चन, रणधीर कपूरची मुलगी करीना कपूर, राकेश रोशनचा मुलगा हृतिक रोशन अशी अभिनय क्षेत्रात नवी फळी उभी राहत होती. या सर्वांमध्ये विशेषत: हृतिकची शरीरयष्टी, त्याचे नृत्यकौशल्य, देखणेपण ह्यांची तोंडफाटेस्तोवर चर्चा होत होती. मात्र या सगळ्या कल्लोळात एका चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर हास्याची सुनामी आणत लक्ष्य वेधून घेतलं होतं. तो चित्रपट होता प्रियदर्शन दिग्दर्शितहेराफेरी

खरं तर प्रियदर्शनचा सिनेमा म्हणजे काहीतरी गंभीर असेल अशी धारणा होती, कारण त्याआधीचे त्याचे सजा - - कालापाणी, गर्दिश , विरासत हे अत्यंत वेगळ्या धाटणीचे सिनेमे होते. नाही म्हणायला त्याचा पहिला हिंदी सिनेमा मुस्कुराहट हा विनोदी अंगाचाच होता; पण खरा प्रियदर्शन टच अनुभवता आला तो हेराफेरीमधून! घायल, दामिनीसारखे सिनेमे देणाऱ्या राजकुमार संतोषीनेअंदाज अपना अपनाकाढावा किंवाखिलाडी, बाजीगरदेणाऱ्या अब्बास - मस्तान द्वयीनेबादशाहकाढावा, तसाच हा मॅडछाप कॉमेडी सिनेमा होता.

प्रियदर्शनची बॉलीवूडमधील एन्ट्री तशी उशिरानेच झाली, त्याआधी केरळमधील मल्याळम फिल्म इंडस्ट्रीत त्याने लेखक - दिग्दर्शक म्हणून चांगले बस्तान बसवले होते. गंभीर, विनोदी, सामाजिक असे अनेक विषय त्याने हाताळले होते; पण नव्या शतकाच्या आरंभी त्याने विनोदी सिनेमांची जी लाट हिंदी सिनेमात आणली त्यालाप्रियदर्शन पर्वम्हणणेच योग्य राहील.

एकेकाळी हृषीकेश मुखर्जी, बासू चटर्जी वगैरे दिग्दर्शक जसे हलकेफुलके विनोदी चित्रपट देत असत तसाच ट्रेंड प्रियदर्शनने आणला. डेव्हिड धवन - कादर खान - गोविंदाच्या सिनेमांना आलेल्या साचेबद्धपणाला प्रेक्षकवर्ग कंटाळला होता. गोविंदाची कारकीर्ददेखील दोलायमान झाली होती, तर कादर खान प्रकृतीच्या कारणास्तव बॉलीवूडपासून दूर गेला होता. प्रियदर्शन - अक्षयकुमार - परेश रावलने ती पोकळी भरून काढली.

आधीच्या दशकात परेश रावलवर बसलेला खलनायकी रोल्सचा शिक्का हेराफेरीने पुसून काढला. एवढेच नाहीतर अॅक्शनकुमार म्हणून ओळखल्या जाऊ लागलेल्या अक्षयकुमारला, पण त्याचा खिलाडी अवतार सोडून काहीतरी नवीन दाखवण्याची संधी मिळाली. सुनिल शेट्टीला अभिनयाच्या मर्यादा असतानादेखील त्याने हेराफेरीमध्ये दोघानाही चांगली साथ दिली.

हेराफेरी हा दक्षिणेकडच्याचरामजीराव स्पिकिंगह्या सुपरहिट मल्याळम सिनेमाचा रिमेक होता. हा रिमेकचा फॉर्म्युला यशस्वी झाल्याचे लक्षात येताच प्रियदर्शनने आपला मोर्चा दक्षिणेकडच्या इतर सिनेमांकडे वळवला. तिथल्या गाजलेल्या सिनेमाना उत्तर भारतीय ग्रामीण संस्कृतीची फोडणी देत एकापेक्षा एक हिट सिनेमे दिले.

नुसती यादीच चाळली तरी गालावर हसू येईल इतके धमाल सिनेमे प्रियदर्शनने दिले आहेत.

हंगामा, हलचल, गरम मसाला, भागम भाग, मालामाल विकली, चूप चूप के, ढोल, भूलभुलैय्या, मेरे बाप पहले आप, बिल्लू, दे दणा दाणा’, खट्टामिठा.’

नमुनेदार पात्र, हास्याचा स्फोट घडवतील असे संवाद, धमाल कथासंकल्पना…. ही प्रियदर्शनच्या सिनेमांची खास वैशिष्ट्ये म्हणता येतील.हेराफेरीमधील बाबुराव गणपतराव आपटे, राजू आणि घनश्याम ही त्रयी जेवढी लोकप्रिय झाली, तेवढेच कबीरा, देवीप्रसाद, खड्गसिंग, अनुराधा ही पात्रेदेखील लक्षात राहिली. एवढेच काय पण स्टार गराज, स्टार फिशरीजसारखी नावे पण लोकांच्या स्मरणात आहेत.

जाने भि दो यारोसारख्या कल्ट कॉमेडी मानल्या जाणाऱ्या सिनेमातील कमिशनर डिमेलोच्या शवाची पळवापळवी जेवढी हसवून जाते. तेवढीच धमालमालामाल विकलीमधल्या एन्थनीच्या शवाच्या लपवाछपवीच्या सिनमध्ये अनुभवता येईल.

भुलभुलैय्यामध्ये मंजुलीकाच्या आवाजाने उडणारी तारांबळ, हंगामामध्ये करंट लागून एका पाठोपाठ एक लागत जाणारी साऱ्यांची रांग, हलचलमध्ये सातत्याने अर्शद वारसीला उद्देशून मेंढक जैसी आंखवाला संबोधणे, चूप चूप केमध्ये मूकबधीर असल्याचं सोंग आणणाऱ्या नायकाला गावाची नावे अभिनय करून सांगणे किंवा खट्टामिठामध्ये रोड रोलर उतारावरून घसरल्यानंतर तो थांबविण्यासाठी नायकाने केलेला जीवाचा आटापिटाअसे एकेक प्रसंग आठवले तरी हसू येत. सध्याच्या सोशल मिडियावर MEME बनवण्यासाठी खाद्य पुरणाऱ्यांत प्रियदर्शनचे नाव अग्रभागी असेल इतका ऐवज त्याने गेल्या दोन दशकात पुरवला आहे.

मंजुलिका, बांके, ठकुरायन, बिल्लू, अंगारचंद, जितु फ्रॉम व्हिडीओकॉन, राधेश्याम तिवारी, अंजली तिवारी, पोपटसेठ मारवाडी, जब्ब्बा, लॉटरी इंस्पेक्टर, खुफिया पोलीस, तुलसीदास खान, अशी शेकडो पात्रे आज स्मृतींच्या कोपऱ्यात ठाण मांडून बसली आहेत.

हम ना समझे थे बात इतनीसी ख्वाब शिशेके दुनिया पत्थरकीकिंवाएक था गाव जहाका एक ऐसा था राजासारखी डोळ्यांच्या कडा ओलावणारी गाणी ज्याच्या सिनेमात होती, त्याने इतके धमाल क्षण आपल्याला दिलेले आहेत ह्यावर कधी कधी विश्वास बसत नाही.

कदाचित इतरांच्या मूळ सिनेमांच्या कथा संकल्पना आणि दिग्दर्शन ह्याचं सरसकट श्रेय प्रियदर्शनला देणे योग्य होणार नाही, पण एक स्वतंत्र दिग्दर्शक म्हणूनदेखील त्याने हिंदी सिनेमात स्वतःच स्वतंत्र दालन तयार केल आहे, ह्याबद्दल दुमत असण्याच कारण नाही. आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा कधी मित्रांसोबत सुख दुःखाच्या गप्पा मारू, तेव्हा एका गोष्टीवर नक्की एकमत होईल की आमच्या कॉलेज जीवनाला निखळ आनंदाचे क्षण ज्यांनी ज्यांनी दिले त्यात प्रियदर्शनचे सिनेमे हि बाब नक्की सांगण्यासारखी असेल.

- सौरभ रत्नपारखी


Powered By Sangraha 9.0