वाभळेवाडीचा तलाठी अण्णा..! भाग: ८

31 May 2023 14:19:49


वाभळेवाडीचा तलाठी अण्णा..! भाग-तीन

रामा कुंडूर गावात तलाठी अण्णा बरोबर फिरल्यावर मिळणारा मान बघून दिवसभर त्याच झोकात होता. त्यालाही हे सगळं हवंहवंसं झालं होतं. अन् तो आनंदाने उक्खड बसून डाव्या हाताच्या बोटात बिडी शिलगवुन तिला पीत वाऱ्याच्या दिशेनं तिचा धूर सोडवत संतू अण्णा तलाठी यांच्याशी उद्याच्या कामाबद्दल बोलत होता.

संतू अण्णा तलाठी यांच्या आजच्या जेवणाचं काय हा विचार त्याच्या मनात एकाकी येताच तो तटदिशी उठून संतू अण्णा तलाठी येतूया म्हणून निघून गेला..!

संतू अण्णाला त्याचं हे वागणं काही कळलं नाही अन् ते ही पारावरून उठून आपल्या खोलीच्या दिशेनं निघाले. सोसाट्याचा गार वारा, पानांची सळसळ ऐकू येत होती अन् कसं प्रसन्न वाटत होते. संतू अण्णा आपल्या खोलीवर येऊन आपल्या लोखंडी पलंगावर पाय लांबून डोळे बंद करून पडले होते.तितक्यात रामा एका ताटलीत बेसन अन् धुडक्यात भाकरी घेऊन आला.

रामा एका ताटलीत बेसन अन् धुडक्यात भाकरी घेऊन आला तेव्हा सायंकाळ ढळून गेली होती. संतू अण्णा तलाठी आपल्या नव्या नोकरीची ख्यालीखुशाली आपल्या घरच्यांना कळावी म्हणून पत्र लिहत बसले होते. रामाला बघून त्यांनी त्याला आत बोलावले अन् ते लिहलेले पत्र एका लिफाफ्यात पॅक करत त्याच्याशी बोलू लागले..!

कारे रामा मगाशी कुठे निघून गेलेला एकाकी..!

मी मागे आवाज देतूया तर तू तर माझ्या शब्दांस्नी वय पण देईनासा झालास. अन् एकदम निघून गेलास..!

संतू अण्णा तलाठी यांच्याकडे बघत रामा बोलू लागला,

कुठे नाही ओ अण्णा..!

बोलता बोलता एकाकीच मनात विचार येऊन गेला की, अण्णाला सायंकाळचा डब्बा आज आपून द्यावा तितकेच गरीबाचे हात आमच्या गावच्या तलाठी अण्णाच्या पोटात पडतील.

हे ऐकून संतू अण्णा तलाठी मोठ्यानं रामाकडे बघून हसू लागले. त्याला म्हणाले आम्ही कसले शिरीमंत बाबा, आम्हीपण गरीबच रे बाबा..!

बस रात्रंदिवस अभ्यास करून केलेल्या मेहनतीला देवानं फळ दिलं अन् आता तलाठी झालूया. तलाठी झालो म्हणजे म्या काय खूप मोठ्ठा नाय झालो, तुमच्यापेक्षा तुमच्या गावचा तलाठी झालो म्हणजे तुमच्या कष्टाला माझ्यापरीने फळ देण्याचं, तुमच्या गावातल्या गरिबांच्या लेकरांना, व्यक्तींना प्रवाहात आणण्याचं काम मला करायचं आहे अन् त्या कामासाठी म्या सरकारी प्रतिनिधी म्हणून म्या तुमच्या गावात नेमलो गेलो आहे..!

कारण इतकंच म्या अभ्यास केला अन् सरकारी जावई झालो पण मला गरिबीची जाणीव हाईसा. गरिबीची झळ म्या बी सोसली हाय. शिळ्या भाकरीच्या कुटक्यावर म्या भी दिवस काढले हायसा अन् देवानं माझ्या या कष्टाचं फळ म्हणून मला या गावातल्या गरीब दीन दुबळ्यांचावाली म्हणून निवडलं अन् म्या आता उभा जन्म लोकांच्या सेवेत वाहिला हायसा रामा.

या सारखं सुख नाय बघ..!

संतू अण्णा तलाठी यांचे हे अनुकरण करण्यासारखे विचार ऐकून रामाला गहिवरून आलं.

रामा संतू अण्णा तलाठी यांच्याकडे बघत म्हणू लागला.

खरं हाय अण्णा तुमचं, सबूत खरं हाय..!

नाय तर आजकाल सरकारी नोकरीला लागलेली लोकं बघा सरकारी जावई असल्यागत गावच्या गरीब लोकांवर हुकूम गाजिवता हायसा, इतका पैकापाणी असून गरिबांच्या ओठातोंडाचा घास हिराऊन घेत, त्यातील पैकं खाऊन घेत असता.

या कारणाने शिरीमंत लोकं अजून शिरीमंत होऊन राहिला हायसा अन् गरीब त्यो अजून गरीब राहून जातू हायसा. गरिबाचं अठरा विश्व दारिद्र्य काही केल्या सरना झालं हायसा, गरीब तो पिढीदर पिढी गरीब होतो हायसा अन् शिरीमंत तो आधिकच शिरीमंत होतो हायसा.

रामाचं हे बोलणं ऐकून संतू अण्णा तलाठी त्याला ओसरीत असलेल्या माठातून गार पाण्याचा गिल्लास भरून देत बोलू लागले..!

कसं असतं रामा तुला सांगू गरीब माणूसच गरीबाला अजून गरीब करत असतोया अन् शिरीमंताला अजून शिरीमंत. कारण एकच तो काही थोड्या गोष्टीसाठी आपला स्वाभिमान विकतो अन् श्रीमंताला शरण जातो. मान्य ती त्याची गरज असते पण; इतकंही झूकायला नको हवं की आपली पुढची पिढीसुद्धा आपण उभे आयुष्य सोसलेलं दारिद्रय सोसत राहील..!

क्रमशः

- भारत लक्ष्मण सोनवणे

Powered By Sangraha 9.0