जागतिक कुटुंब दिनाच्या निमित्ताने...

19 May 2023 12:46:10


जागतिक कुटुंब दिनाच्या निमित्ताने...

गेल्या काही वर्षांत तरुणांनी, किशोरवयीन मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना फार वेळा ऐकू येत आहेत. मी राहते त्या भागातच गेल्या दोन-तीन वर्षांत अशा घटना घडलेल्या आहेत. अत्यंत शांत आणि सुशिक्षित मध्यमवर्गीय समाजाची वस्ती असणारा हा भाग आहे. तरीही अशा घटना या भागात घडल्या. अशा घटनांची सामाजिक, मानसिक कारणं अनेक असतील. तरी याचं मूळ काही प्रमाणात हरवलेल्या संवादात, माणसांमाणसांतील पातळ होत चाललेल्या स्नेहबंधात आणि लोप पावत चाललेल्या एकत्र कुटुंबपद्धतीत आहे याचा वेळोवेळी पुनरुच्चार केला जातो.

माणूस समाजशील प्राणी आहे हे वाक्य शालेय जीवनात आपण असंख्य वेळा वाचलं असेल, उत्तरांतून लिहिलंही असेल. पण समाजशील म्हणजे नेमकं काय? केवळ कळपाने तर प्राणीही राहतात. पण तेही काही काळ आपल्या सहचरांच्या, पालकांच्या सहवासात राहतात. कळपात राहून स्वतःचं रक्षण करतात. आपण तर विचार करू शकणारी, विवेक असणारी माणसं आहोत. आपल्याकडे संस्कृती नामक व्यवस्था आहे आणि कुटुंबव्यवस्था या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. माणसाला सहअस्तित्वाची आवश्यकता भासते. म्हणूनच नात्यांसोबतच कुटुंबव्यवस्थादेखील अस्तित्वात आली असावी. या कुटुंबव्यवस्थेचा गौरव करणारा दिन म्हणजे १५ मे. हा दिन अस्तित्वात का बरं आला असेल? काय असेल या मागची प्रेरणा? चला शोधू या.

वसुधैव कुटुंबकम् हा भारतीय संस्कृतीतील अत्यंत अद्वितीय असं तत्व आहे. संपूर्ण वसुंधरा म्हणजेच जग हेच एक कुटुंब आहे असं आपण मानतो. आपण, आपला परिवार, आपले शेजारी, आपला परिसर, आपलं गाव, आपलं राज्य, आपला देश असे वेगवेगळे परीघ मानवी जीवनाला असतात. त्यातलं कुटुंब हे अगदी जवळचं वर्तुळ. आई वडील, भावंडं, आजी आजोबा, या पलिकडे चुलते-मामे-मावश्या असा हा मर्यादित परीघ असतो. पूर्वीच्या काळी आपण एकत्र कुटुंबात राहात होतो. पण काळाच्या प्रभावात आणि वाढत्या जबाबदाऱ्यांतून कुटुंब विभक्त होत गेली, हळूहळू हा ट्रेण्डच सेट होत गेला, त्याचे परिणामही जाणवू लागले आणि या कुटुंबव्यवस्थेची गरज अधिकच अधोरेखित होत गेली. आज, विशेषतः कोविड काळापासून याचं महत्त्व अधिक जाणवलं सगळ्यांना. १५ मे १९९४ रोजी युनायटेड नेशन्समध्ये सर्वप्रथम जागतिक कुटुंब दिन साजरा करण्यात आला. शांतता, विचारांची आणि भावनांची देवाणघेवाण करणारा नेमका दिवस असावा, म्हणून संयुक्त राष्ट्रांनी 'जागतिक कुटुंब' दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन केलं. लिंडा ग्रोवर या अमेरिकन सामाजिक करणाऱ्या महिलेने 'सिटीजन्स फॉर ग्लोबल सोल्युशन' या चळवळीद्वारे सलग १० वर्षं या दिनाचा जगभर प्रसार केला. या जागतिक कुटुंबदिनासाठी दरवर्षी एक वेगळी संकल्पना निवडली जाते व त्या आधारावर हा दिवस साजरा केला जातो. २०२२ साली कुटुंब आणि शहरीकरण, २०२० साली कुटुंब आणि विकास, २०१२ साली कुटुंब आणि श्रमविभाजन अशा वेगवेगळ्या संकल्पना आजवर निवडल्या गेल्या आहेत. इथे लक्षात घेतलं पाहिजे की परदेशात विभक्त कुटुंबाचे दुष्परिणाम जाणवू लागल्यामुळे चळवळीच्या माध्यमातून जागतिक कुटुंब दिन साजरा करावा लागला. दुसरीकडे भारतात मात्र शतकानुशतकांची एकत्र कुटुंबाची परंपरा राहिली आहे आणि त्याचं महत्त्वही आपल्याला माहीत आहे.

पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंबातच सगळ्यांचा एकत्रित विकास होत असे. जबाबदाऱ्यांची वाटणी होत असे. कोणी आर्थिक बाजू पाहात असे तर कोणी घरावर लक्ष ठेवत असे. एकाच घरात शेतीसह विविध कार्यक्षेत्रात माणसं काम करत होती. घरातील जाणकार लहान मुलांवर संस्कार करत असत. घरात परस्परांत संवाद होत असे. ऍडजस्ट करण्याची वृत्ती होती माणसांत. जे असेल ते सगळ्यांत वाटून घेण्याची पद्धत होती. माणसामाणसांत समन्वय होता. एकाच व्यक्तीवर सगळ्या जबाबदाऱ्या पडत नव्हत्या. तसेच स्त्रीवर्गही सगळ्या जबाबदाऱ्या वाटून घेत असल्यामुळे आजच्यासारखं सुपरवुमनच्या भूमिकेत स्त्रीला शिरावं लागत नव्हतं. सगळ्याच आघाड्यांवर लढावं लागत नव्हतं. अर्थात सगळं छान छान, गुडी गुडी होतं असं नाही, हे मान्य. पण समजून घेण्याची वृत्ती होती.

आज विभक्त कुटुंब पद्धतीत माणसामाणसांतील संवाद कमी होत चालला आहे. रोजचं एका वेळचं जेवण एकत्र घेण्यालाही माणसं मुकत आहेत. ‘जो तो अपुल्या जागी जखडे’ अशी आपली स्थिती आहे. घरातील प्रत्येकजण आपल्याच विश्वात आणि वेळापत्रकात अडकला आहे. यामुळे अनेक घरांत संवादाच्या जागाच उपलब्ध नाहीत. घरच्या जबाबदाऱ्यांचं ओझच इतकं प्रबळ आहे की त्या पलिकडे सार्वजनिक जीवनात सक्रिय असणंही आपण जणू विसरून गेलो आहोत. बरीच माणसं घरात असल्याने लहान वयातच ऍडजस्टमेण्ट करण्याची जी वृत्ती तयार होत असे ती मागे पडत चालली आहे. घरात एक किंवा फार तर दोन लहान मुलं त्यामुळे मुलांचं सहअस्तित्व हा मुद्दाच अनेकांच्या आकलनात येत नाही.

कुटुंबव्यवस्था, नातेसंबंध आणि सुसंवाद टिकून राहण्यासाठी व त्याचं महत्त्व अबाधित राहण्यासाठी पुढे सुचवलेल्यांपैकी काही गोष्टी आपण करू शकतो का? तीन प्रमुख जेवणांपैकी एक वेळचं तरी जेवण एकत्र घेणं. जेवताना गॅजेट्स, टीव्ही बंद ठेवणं, सणांना किंवा वाढदिवसाला एकत्र देवळात जाणं, या खास दिवशी घरात, कुटुंबियांसोबत राहण्याला प्राधान्य देणं, वर्षातून एकदा तरी एकत्र गावी जाणं, पर्यटनस्थळी ट्रीपला गेल्यावर फोनसारख्या वस्तू लांब ठेवून सहअस्तित्वाचा आनंद घेणं, तीन चार महिन्यांतून एकदा कौटुंबिक स्नेहमीलन कोणाच्या तरी घरी आयोजित करणं, बागकाम-साफसफाई-स्वयंपाक-खरेदी अशा गोष्टी सगळ्यांनी मिळून करणं, लग्नसमारंभासारख्या कार्यक्रमांना सर्वांनी एकत्र जाणं, बॅडमिंटनसारखे खेळ एकत्र खेळणं, एकत्र पेपर, पुस्तक वाचणं, एखाद्या विषयावर सर्वांनी चर्चा करणं, दैनंदिन प्रार्थना एकत्र बसून करणं... ही यादी खूप वाढवता येईल. अगदी सगळं नाही पण यातलं बरचसं आपण करू शकतो असं मला वाटतं. दिसायला या कृती जरी खूप साध्यासोप्या असल्या तरी याचं महत्त्व कमी होत नाही. कौटुंबिक स्नेहबंध वृद्धिंगत करण्यात महत्त्वाची भूमिका ठरतील. कुटुंबव्यवस्था हे भारतीय संस्कृतीचं अविभाज्य अंग आहे, ते तसंच राहील. फक्त खुंटा हलवून बळकट करण्याची गरज आहे. त्यासाठी या कृती नक्कीच उपयोगी ठरतील. आणि मग असे दिवस सेलिब्रेट करण्याची गरज भासणार नाही.

 
- मृदुला राजवाडे  
Powered By Sangraha 9.0