वाभळेवाडीचा तलाठी अण्णा..! भाग - ५

10 May 2023 10:00:00


वाभळेवाडीचा तलाठी अण्णा..! भाग-तीन

हे सगळं संतू अण्णा तलाठी ऐकत आपल्याला गावासाठी असलेल्या नवीन योजना अन् त्यासंबंधी माहिती सोबत असलेल्या गावच्या नागरिकांना सांगत होता. गावातली मंडळी हे सगळं ऐकत होते. हळूहळू संतू अण्णा तलाठीचं बोलणं गावाला पटू लागलं होतं.

उद्यापासून संतू अण्णा तलाठी आपल्या गावाच्या जुन्या इमारतीमध्ये शिकाऊ तलाठी म्हणून रुजू होणार, गावासाठी काम करणार यामुळं गावकरी खुश होते. एक तरुण मुलगा आपल्या गावचा तलाठी झाला, या कारणाने गावातली तरुण पोरंही खुश होती.

त्यांनी संतू अण्णा तलाठी यांना संध्याकाळी गावच्या तालमीत बैठकीला येण्यास सांगितले होते. सगळ्या गावातल्या नागरिकांची भेट घेऊन पहाटेच्या न्याहारीला म्हणून संतू अण्णा तलाठी गावचे सरपंच दिलवर आबा यांच्या घरी गेले. सरपंचांनी संतू अण्णा तलाठी यांच्यासाठी मस्त बेत आखला होता.

संतू अण्णा तलाठी सरपंचांच्या घरी पोहचले, तेव्हा सरपंचांनी त्यांचं स्वागत केलं. अन् त्यांच्या आलिशान बैठकीच्या खोलीत संतू अण्णा तलाठी, आबा, आबांचे धाकले बंधू मंजित आप्पा बसले. संतू अण्णांना हे गाव नवं असल्यानं अन् गावातला त्यांचा पहिला दोस्त रामा कुंडुर झाला असल्यानं, सोबतीला बोलायला म्हणून संतू अण्णांनी त्यालाही सोबत आणलं होतं.

बैठकीत बसल्यावर गावकुसाच्या अनेक विषयांना सरपंचांनी हात घातला. गेली वीस वर्ष कसं एकाकी आपल्या हातात सत्ता आहे अन् गाव कसं आपल्या शब्दांच्या बाहेर नाही हे सगळं सरपंच दिलवर आबा संतू अण्णा तलाठी यांना सांगत होते‌.

त्यांच्या हो ला हो मिळवत रामा कुंडुरही सरपंचांचा गावातला दबदबा, गावातले राजकरण अन् सरपंचाना गावातली काही पाटील मंडळी खाली बघतात पण; सरपंच नेहमीच नवीन डावपेच रचून त्यांचे डाव पाडत असतात.

सरपंच्यांनी गावात गावातल्या मुलांसाठी बांधलेली शाळेची इमारत, सरपंचाच्या वडीलांच्या नावे गावात त्यांनी नव्यानं चालू केलेलं कॉलेज, गावात राबवलेल्या योजना अशा सगळ्या गोष्टी दिलवर आबा, मंजीत आप्पा, रामा कुंडुर संतू अण्णा तलाठी यांना सांगत होते.

तितक्यात रांदन्याच्या घरातून बोलावा आला, पानं तयार आहे असं सांगितलं. तसं संतू अण्णा तलाठी, रामा कुंडुर यांनी सरपंचांच्या संगतीने मस्त जेवणावर ताव हाणला अन् संतू अण्णा तलाठी यांनी उद्या पहाटे तलाठी कार्यालयात भेटू, असं म्हणून सरपंच्यांचा निरोप घेतला.

दुपार भरून आली होती. रणरणत्या उन्हात जरासा आराम करावा म्हणून संतू अण्णा तलाठी तात्पुरत्या स्वरूपात रहायला सरपंचांनी दिलेल्या खोलीत आराम करायला निघून गेले. सोबतीने रामा कुंडुर होताच.

तेव्हा संतू अण्णा तलाठी त्याला म्हणाले:

“मग रामा कसं वाटलं सरपंचांच्या घरचं जेवण..?

रामा कुंडुर बोलू लागला:

“तलाठी अण्णा सरपंचाचा काय नाद करायचा, त्यांचं सगळं एक नंबरच असतं. पण तुमच्या संगतीने मला त्यांच्या घरात जेवणाचा मान मिळाला. हे खूप ब्येस झालं. कुणाच्या नशिबात आलं बाबा तलाठी संगतीने जेवण..!”

अन् त्याच्या या बोलण्यावर संतू अण्णा तलाठी हसू लागले व बोलू लागले:

“असं काही नाही रे! तू पण माझ्यासारखा माणूस हाईस अन् म्या नोकरीला हाय म्हणजे काय मी खूप मोठा नाही रे रामा. उलट छोटा भावासारखा आहे म्या तुला, त्यामुळं मला तर काही एक बी नाय वाटलं बा तुझ्या संगतीने जेवण कराया..!”

गावातल्या बऱ्याच गप्पा निघाल्या अन् दोघांमध्ये हश्या पिकला. गप्पांच्या ओघात बराच वेळ निघून गेला. रामा कुंडुरने संतू अण्णा तलाठी यांना आराम करायला सांगितलं अन् तो घरी कालपासून मायला भेटलो नाही म्हणून घरी चक्कर टाकायला निघून गेला.

संतू अण्णा आपली सुटकेस काढून त्यातले कपडे, इतर सामान नीटनेटके टाकून खाली एक गोधडी टाकून, दुमत्या हाताची उशी करून खोलीत आराम करत बसले. खोलीच्या चहूबाजूंनी असलेला परिसर खूप सुंदर असा होता. एकांगाला संथपणे वाहणारी शिवनामाय, एकांगाला दूरवर दिसणारी डोंगररांग अन् एकांगाला सरपंचांचा मोसंबीचा बगीचा.

त्यामुळं सर्व कसं सुंदर अन् गारवा अनुभवायला देणारे असे होते. संतू अण्णा तलाठी अंथरुणावर पडल्या पडल्या त्यांचा डोळा कसा लागला त्यांना कळले नाही अन् संतू अण्णा तलाठी दुपारच्या रणरणत्या उन्हात झोपी गेले.

क्रमशः

- - भारत लक्ष्मण सोनवणे.

Powered By Sangraha 9.0