नव्यानं शिकावू तलाठी म्हणून सरकारी नोकरीत रुजू झालेला तिशीतला संतू आण्णा मोठ्या साहेबानं ड्युटी दिलेल्या वाभळेवाडी या डोंगराआड असलेल्या, गावात नोकरीला रुजू व्हायला म्हणून आधल्या दिवशी खुदच्या गावातून दोन घटकांचा महामंडळाच्या गाडीतून प्रवास करीत निघाला होता.
वाभळेवाडी नजदीक गावालगत गाडी जात नसल्यानं, गावच्या सहा कोस दूर असलेल्या फाट्यावरून डांबरी सडकीनं तो पायातल्या वाहना सरकीत सरकीत सांजेच्या अस्ताला जाणाऱ्या सूर्याचा कल घेत झपाझप पावलं टाकीत चालत होता.
गावाकडे जाणारी डांबरी सडक मागे पडली अन् डोंगरा-खोंगरात हरवलेल्या पायवाटेनं संतू आण्णा चालू लागला. ऐरवी सूर्य अस्ताला गेला होता अन् दूरवर गावातले दिवे चमकतांना काजव्यासम लुकलुकताना दिसत होते.
झाडंझुडपे असलेली रानाची वाट मागे पडली अन् लाल मातीच्या अन् चहूकडे बोडक्या असलेल्या बाभळीच्या रानात संतू आण्णा गावाचा अंदाज घेत चालू लागला.
चहूकडे पसरलेला काळाकुट्ट अंधार, माळावर मोठ्या आवाजात इवळणारी कुत्रे, गावातल्या सावत्या माळ्याच्या मंदिरातून हरिपाठाचा येणारा आवाज अन् हरीपाठाची दर दुसरी ओळ म्हणत संतू आण्णा गावच्या येशीला आला होता.
तितक्यात पस्तिशीतला रामा कुंडुर अन् त्याचा दोस्त जगण्या बोडक्या बाभळीच्या रानातून आपल्या चड्ड्या सावरत लांब-लांब फलंगा टाकत वाटेनं टरमळे हलवीत हलवीत गप्पा हानित चालले होते.
दूरवरून येणारा संतू आण्णा त्यांच्या नजरेस पडला अन् ते वेशीच्या अंगाला असलेल्या दगडी चबुतऱ्यावर उकीडवे बसून तंबाखू चोळीत चोळीत गप्पा झोडू लागले. इतक्या वेळात संतू आण्णा त्यांच्याजवळ येऊन त्यांना वाट पुसू लागला.
तितक्यात पस्तिशीतला रामा कुंडुर हातातली तंबाखू तोंडात टाकीत, एक कडक पीक हनीत बचकभर थुंकला अन् संतू आण्णाला बोलू लागला..!
‘कोण, कुठल्या गावचं म्हणावं पाहूनं..?’
‘बराच वखत केलासा गावू जवळ कराया..!’
संतू आण्णा हातातलं पेंडक चबुतऱ्यावर ठेवत सुटकेस सावरत त्याची कहाणी सांगू लागला..!
म्या "संतू आण्णा मावळजे" मौजे "ढोर पिंपळगांव"चा हायसा नव्यानं सरकारात तलाठी म्हणून रुजू झालो हायसा. पहिल्याच वख्ताला तुमच्या गावाला नव्यानं शिकावू तलाठी म्हणून वाभळेवाडीस रुजू झालू हायसा.
हे ऐकल्यावर जगण्या त्याचं टमरेल रामा कुंडुरच्या हातात देत, संतू आण्णाने चबुतऱ्यावर ठेवलेलं पेंडकं खांद्यांवर उचलून घेत बोलू लागला. तलाठी आप्पा सरपंचास्नी सांगावा तरी धाडायचा की फाट्यावर कुणी घ्यायला आलं असता. उगाच जीवाची आबाळ केलीसा तुम्ही..!
तितक्यात संतू आण्णा बोलता झाला,
‘कसली आबाळ जगण्या दादा, नव्यानं नोकरीला रुजू झालु म्हंजी चालायचंच थोडं बहुत..!’
असं म्हणत ते तिघे गावच्या वाटेनं वेशीच्या महुरे चालू लागले.
तितक्यात रामा कुंडुर बोलू लागला,
‘तलाठी आप्पा तुमचं सबुत खरं हायसा पण तुम्ही आल्यात सरकारी जावई सरकारचे जावई तुमचा मान राखला गेला पाहिजे.’
जगण्या बोलू लागला, ‘हे कसं बोलला बघ रामा तू मायचास्नी सरकारी नोकरी म्हणजे थाट अस्तूया तलाठी आप्पा..!’
‘आपल्या गावचं पहिलं तलाठी लई बारा भोड्याचं हाय, सरकारी जावई असल्यानं हुकूम गाजीवतय बारबापं..!’
सांज केव्हाच सरली होती, सूर्य कधीच अस्ताला गेला होता; अन् आता मावळतीच्या बरोबर एका अंगाला चंद्र आपलं दर्शन वाभळेवाडीच्या लोकांस्नी देऊ लागला होता.
नदीच्या थडीला पाण्याचा जोर वाढला होता. नदीच्या वाहत्या पाण्याचा आवाज, नदी थडीला असलेल्या पिवळ्या बेंडक्यांचा आवाज रामा कुंडूर, जगण्या, तलाठी आण्णा यांच्या बसल्या लिंबाच्या पारा पहूरतक येत होता. नदीच्या अंगाला काळाकुट्ट अंधार माजला होता.
याला भरीस भर की काय म्हणून समशानातील कुत्री त्या काल गावच्या जुन्या पिढीतल्या नव्वदीच्या पाटलीनबाईंच्या जळत्या मड्या मोहरं उंचं आवाजात इवळू लागली होती. नदीच्या दुसऱ्या अंगाला झाडांवर काजवे चमकू लागली होती, व्होलगे मोठ्यानं आवाज करत ओरडू लागली होती. गावच्या जवळ असलेल्या डोंगर रानातून कोल्हे एक सुरात मोठ्यानं कोल्हेकुई हानीत बरतळल्यागत, इवळल्यागत ओरडत होती.
क्रमशः