रानच्या वाटा दूर करत आम्ही गावच्या वेशीला असलेल्या खोकल्या आईच्या देऊळा जवळ येऊन ठेपलो. भोळ्या राजूच्या बकऱ्या दूरवर रानातून येताना नजरी पडत होत्या. त्यांच्या खुरांची धूर आसमंतात अस्ताला जाणाऱ्या सूर्य किरणात मिसळून तांबूस तपकिरी रंगाची धूळ दिसू लागली होती. या धुळीत आसमंत अंधारून यावं असा दिसू लागला होता.
लोकांच्या वावरात रोजानं गेलेल्या बायका डोईवर सरपणाचा भारा घेऊन टोळकीनं गाव जवळ करीत होत्या. गडी माणसं कुणी बैलगाडीत, कुणी सायकलीवर दुधाची कॅटली अटकवून गप्पा झोडीत झोडीत गाव जवळ करत होते.
खोकल्याईचं दर्शन घेऊन मी सईद आणि अन्वर घराच्या वाटेला लागलो. घरं जवळ आली तशी सईद आणि अन्वर मुसलमान मोहल्यात असलेल्या त्यांच्या घराच्या दिशेनं निघून गेली. उद्या भेटूया म्हणून मी ही माझ्या घराच्या दिशेने आलो. भोळ्या राजूच्या बकऱ्या आता गावात शिरल्या होत्या. भोळा राजू त्या बकऱ्या ज्यांनी त्याच्याकडे राखायला म्हणून ठेवल्या होत्या, त्यांच्या दावणीला बांधून घराच्या दिशेनं जात होता.
मी ही आता घराजवळ पोहचलो होतो. दिवसभराच्या भटकंती नंतर आता खूप थकल्यासारखे झाले होते म्हणून मी घरापाशी येऊन मोहरल्या ओट्यावर बसून राहिलो. माय कधीच शेतातून आली होती.ती शेतातून आली अन् तिनं सांजेचा अंगणाला सारवून, ढवळ्या मातीचा चुल्हीला पोचारा घेऊन माय देव्हाऱ्यात दिवाबत्ती करत बसली होती.
दगडू आज्जा हळूवार बसल्याजागी खाटेवर तोंडातच पुटपुटत देवाचं नाव घेत असावा असं त्याच्या हातवारे करण्यावरून कळत होतं. गावातल्या म्हाताऱ्या बायकांचा सावत्या माळ्याच्या देवळात होत असलेला हरिपाठ संपला आणि त्याही मोठमोठ्याने गप्पा झोडीत मदरीच्या गल्लीतून त्यांच्या त्यांच्या घराला निघून गेल्या .
धोंडू नाना तेली आणि त्याची सवंगडी त्याच्या तेलाच्या दुकानावर सतरा गावच्या सतरा गप्पा करीत लोकांची धूनी काढीत होती. काही आठ दहा वर्षांची लहानगी सांजेला देवळात दिवा लावायला म्हणून हातपाय तोंड धुवून हातात तेलाची कुप्पी,काड्याची पेटी अन् अगरबत्ती असेल तर अगरबत्ती घेऊन शनिदेवाच्या देवळात दिवा लावायला जात होती.
मायची सांजेची दिवाबत्ती झाली अन् मायना चूल पेटवून रात्रीचं रांधायला घेतलं. मायचा भाकरी बडवण्याचा आवाज मी बसल्या जागे मोहरच्य खोलीपर्यंत येत होता. घरात तेवत्या दिव्याचा मंद प्रकाश अन् या प्रकाशाने सारं घर कसं खुलून दिसत होते.
भाकरी अन् पिठलं झालं तसं मायना मला हाक दिली अन् म्या अन् माय चुल्हीजवळ बसून चुल्हीवर आळणाऱ्या पिठल्याला ताटात घेऊन भाकरी संगतीने खात बसलो. तावदानाच्या बाहेरून येणाऱ्या हळूवार वाऱ्याच्या झुळकेसरशी पिठाच्या डब्यावर असलेला दिवा विझू की मिणमिनू करत होता.
जेवणं झाली तशी माय जेवणाची, स्वयंपाकाची बासणे घेऊन मोहरचा अंगणात चूल्हीतला राखुंडा काढून त्यानं भांडी घाशीत बसली. शांता नानीचं जेवण खावन झालं असावं म्हणून ती ही मायचा जवळ बसून गप्पा हाणू लागली होती. मी मोहरल्या खोलीच्या चौकटीवर बसून येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना न्याहाळत होतो.
दगडू आज्जा हळूवार उठून ढुंगण खरडीत खरडीत त्याच्या बाहेर असलेल्या खाटेवर येऊन निपचित अंगावर पांघरून घेऊन खुडमुंडी करून झोपून गेला. त्याची झालेली अवस्था विचार केला तर खूप वाईट झाली होती, म्हातारपणाला त्याला आलेलं दुखणे अन् यात त्याची होणारी आबळ बघितली की आता वाटायचं की दगडु आज्याचा हा भोग आता सरावा.
मी पुढच्या खेपेला गावी आलो दगडु आज्जा या जगाला सोडून गेलेला असावा, त्याच्या दुखण्यातून मुक्त झालेला असावा. इतकी बीचाऱ्याच्या जगण्याची आबळ चालू होती. तितकंच त्याच्या या दुखण्यातून तो मोकळा व्हावा असं मनोमन वाटत होतं.
कारण त्याच्या पिढीची गावात एखाद-दोन म्हातारे सोडली तर सारीच देव माणसं कधीच हे जग सोडून गेली होती. दगडू आज्जा आजचा दिवस उद्यावर ढकलित अजूनही जगत होता.
गावातल्या लोकांची जेवणं झाली तसे लोकं एक एक करून सावता माळ्याच्या देवळामोहरे असलेल्या पारावर गप्पा झोडायला म्हणून येऊ लागली होती. संतू नाना, तेल्याच्या मळ्यातला शिवा, धोंडू गोसव्याचा हरी, जगण्या यांच्या पारावर चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या.
काही म्हातारे जेवणं करून शनिदेवाच्या देवळात भजन करत बसली होती. त्यांच्या उंच गळ्याच्या आवाजाने अभंग ऐकायला इतकं सुंदर वाटायचं की त्यांच्या संगतीने बसून हे सर्व आपण म्हणावं,ऐकावं असं वाटायचं. आठ वाजले तसतसे गावच्या सगळ्याच पारावर गप्पाचे फड रंगत असत ते रात्री एक एक वाजेपर्यंत या गप्पा चालू असत.
बायकांचे कामं आवरली तसं बायकाही ओट्यावर बसून गप्पा मारत बसल्या, कोणी दिवसभराच्या कामातून जरासा जीवाला विसावा अन् देवाच्या नामस्मरणात वेळ द्यावा म्हणून काही बायका रंगी नानीच्या ओट्यावर हरिपाठ म्हणत बसल्या होत्या.
दहावी वेळ कलली तसं दिवभर भटकल्याने, थकव्याने माझेही डोळे नकळत लागू लागले अन् मग मी अंथरूण, पांघरूण घेऊन खाटेवर अंथरूण टाकून निपचित पडून राहिलो. पाय खूप दुखू लागले होते. डोंगरात अशी भटकंती करण्याची आता सवय राहिली नसल्यानं कदाचित हे झालं असावं असं वाटत होतं.
कारण, आता मी शहराचा झालो होतो,गाव कधीच माझ्यापासून दुरावला होता. घरात जळणारी चिमणी माल्हवून मी निवांत झोपी गेलो होतो..!
क्रमशः
लेखक: भारत लक्ष्मण सोनवणे.