गुलजारजी म्हणतात तशी वेळ खरंच आलेय ना तुमच्यावर? बंद कपाटात बसण्याची, महिनोन् महिने कोणाची भेट होत नसण्याची, कम्प्युटरमुळे तुमच्याकडे दुर्लक्ष होण्याची…. आपल्यालाही कोणाचा तरी स्पर्श व्हावा, कोणी आपल्यावर जीवापाड प्रेम करावं असं वाटत असेल ना तुम्हालाही? मध्यंतरी शांताबाई शेळके यांच्या एका लेखात वाचलं होतं… आई-वडिलांविना मुलं जशी पोरकी होतात, तशी पुस्तकं ही त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या मालकानंतर पोरकी होऊन जातात, जर तसं प्रेम करणारं पुढं कोणी मिळालं नाही तर. हे वाचून एकदम गलबलून आलं मला. पूर्वी मी जेव्हा तुमची खरेदी करायचे तेव्हा हा विचार अगदी हलकासा स्पर्शून जायचा मनाला. पण मी आणि माझ्या कपाटातले तुम्ही सगळे एकदम लकी आहोत. कारण तुमच्यावर अतोनात प्रेम करणारी पुढची पिढी माझ्या घरात वाढतेय. हा पोरकेपणाचा विषय जेव्हा वाचला तेव्हा असंही मनात आलं की, पुढं या सगळ्या पुस्तकांचं काय होईल या विचाराने पुस्तकं घेतली नसती तर? छे.. छे.. ते शक्यच झालं नसतं. भविष्यातला विचार करून वर्तमानातला आनंद का गमावून बसायचं ना!
मला आठवतंय… पूर्वी तुमची खरेदी करायची म्हणजे थोडी तयारी करावी लागायची. लिस्ट तयार करायची, त्यातली आधी कोणती खरेदी करायची हे ठरवून ठेवायचं आणि मुख्य म्हणजे तुमच्यासाठी वेगळे ठेवलेल्या पैशात हे सगळं जमवायचं. तेव्हा माहितेय, पाच रुपयांचं नाणं नवीन आलं होतं. मग आम्ही काय करायचो ते नाणं मिळालं की वेगळं ठेऊन द्यायचं. असं पाच रुपये साठवत साठवत बऱ्यापैकी जमले की त्यातून तुमची खरेदी व्हायची. एखाद्या लहान मुलाला त्याच्या पिगीतून आईसाठी छोटसं का होईना पण गिफ्ट आणलं की किती आनंद होत असेल हे त्यावेळी समजायचं. आता मनात आलं की ऑनलाईन खरेदी करू शकतोच, पण तो तेव्हाचा नाणी गोळा करण्याचा, त्याचे बंदे करून आणण्याचा आणि मग स्वत:च्या हाताने तुम्हाला घरी घेऊन यायचा आनंद वेगळाच होता. घरी आल्या आल्या तुमच्या पानांचा वास आधी साठवून घ्यायचा, पहिल्या पावसाने मातीचा येणारा जो सुगंध आपण उरात साठवून घेतो तसा तुमचाही घ्यायचा आणि मग वाचून फडशा पाडायचा हे ठरलेलं. पण आता लगेच फडशा पाडला जात नाही हे तुम्हालाही जाणवलं असेल ना?
तुम्हाला गुरु म्हणू, मित्र म्हणू, मार्गदर्शक म्हणू की आणखी काही… पण अशा सगळ्याच रोलमधून तुम्ही कायमच मला सोबत करत आला आहात. पण एक गोष्ट आज तुमच्यापाशी कबूल करते. तुमच्यातल्या सगळ्यांशीच काही माझी जिवाभावाची मैत्री नाहीये हा. पानांचा वास जरी अगदी सारखा असला तरी काहीजणांशी पक्की मैत्री काही होणार नाही. नाराज तर होत नाहीत ना ती? पण काही मात्र इतके जीवलग झाले आहेत की, त्यांच्यावर फारच हक्क गाजवतेय की काय वाटतं कधी कधी. मला हवं तेव्हा त्यांना कपाटातून काढायचं, हवं ते पान उघडून वाचायला सुरुवात करायची… त्यांची बिचाऱ्यांची काही तक्रार नसते. एखादा जिवाभावाचा मित्रही कधी काही कारणाने मैत्री तोडू शकतो, पण तुमच्याकडून ती शक्यता कधीच नाही. मी तुमच्याशी मैत्री केली म्हणजे तुम्ही ती चांगली निभावणारच. फार आवडतं हे मला.
एखाद्या कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांना निरोप देताना यजमान म्हणतात ना, 'तुम्ही आलात म्हणून कार्यक्रमाला शोभा आली.' आता हे म्हणणं प्रत्येकवेळी मनापासून असेल की नाही माहीत नाही. पण तुम्हाला मात्र मी अगदी मनापासून म्हणतेय, "तुम्ही आहात म्हणून आमच्या घराला शोभा आहे." घरात टीव्ही नसला तर माझं काहीच बिघडत नाही, पण तुम्ही मात्र हवेतच. लहान बाळाला कसं डोळ्यासमोर आई वावरताना दिसली तरी ते खुश होतं, तसं तुम्हीही मला समोर दिसायला हवे वाटतं. अगदी रोज तुमच्याबरोबर वेळ घालवेन असं नाही, पण समोर मात्र हवेतच. आणि काय माहित पण लायब्ररीतून तुम्हाला घेऊन येऊन तुमच्याशी ओळख करून घेणं फारसं कधी जमलं नाही मला. तुम्हाला कायमसाठी माझंच करुन घ्यायचं हाच एक विचार डोक्यात त्यामुळं तुम्हाला दुकानातूनच तर घेऊन येते. कारण कोणी तुमचा वेडावाकडा वापर केला, नीट निगा राखली नाही तर चिडचिड होते माझी. खूण म्हणून तुमच्या पानांचे कोपरे दुमडून ठेवणं, उघडं पुस्तक उपडं ठेवणं, खाता खाता तुम्हाला वाचणं आणि त्यावर अन्न सांडल्यावर पानांवर डाग पडणं या लोकांच्या सवयी डोक्यात जातात अगदी. त्यामुळेच तर वाटतं तुम्ही फक्त माझेच असावेत.
आता वेग महत्त्वाचा झालाय. घरातल्या लोकांशी बोलायला वेळ नाही तर त्यात तुमच्याशी कोण संवाद साधणार. तुमच्याकडून जे जे मिळतं ते आता एका क्लिकवर सहज उपलब्ध होतंय. पण गुलजारजी म्हणतात तसं होणं मात्र या लोकांच्या नशिबात नाही.
"मगर वो जो किताबों में मिला करते थे सूखे फूल
और महके हुए रुक्के
किताबें मँगाने, गिरने उठाने के बहाने रिश्ते बनते थे
उनका क्या होगा
वो शायद अब नही होंगे!!"
तर असं आहे सगळं. इतरांचं माहीत नाही पण मी मात्र खात्री देते की, आपल्यात कधीच दुरावा येणार नाही. चला…आता पत्र बास करते आणि बंद अलमारी के शिशोंसे तुमच्यातलाच एकजण वाकून बघतोय त्याच्यासोबत मस्त वेळ घालवते.
मनाच्या अर्पण पत्रिकेवर तुमचंच नाव कोरलेली तुमचीच मी…….
जस्मिन जोगळेकर