पर्सनालिटी आणि कॅरॅक्टर...

09 Dec 2023 13:17:33


पर्सनालिटी आणि कॅरॅक्टर...

गेल्या महिन्यात २५ आणि २६ तारखेला काव्यशिल्प आणि युवाविवेक यांचे काव्यसंमेलन झाले. २६ तारखेला युवाकवींसाठी युवाकविसंमेलनाचे एक सत्र होते. त्याला अध्यक्ष म्हणून श्री. सोनावणे सर लाभले. सोनावणे सरांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणात पर्सनालिटी आणि कॅरॅक्टर यातील फरक त्यांनी चार पाच वाक्यात समजावून सांगितला. पर्सनॅलिटी अर्थातच महत्वाची आहे पण त्याहूनही कॅरॅक्टरला महत्व अधिक असतं, असा त्यांच्या सांगण्याचा आशय होता. त्या दिवसापासूनच पर्सनॅलिटी आणि कॅरॅक्टर म्हणजे व्यक्तिमत्व आणि चारित्र्य हे शब्द मनात सतत येत होते. त्यातला फरक खरोखरच तुम्ही आणि मी जाणून घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

यापैकी व्यक्तिमत्व हा शब्द ऐकला किंवा लिहिला की मला पाडगावकरांची 'सलाम' कविता आठवते. दरवाजाजवळ बसलेला वाॅचमन किंवा गुरखा जाता येता आपल्याला सलाम करत असतो. आपण ज्याला सलाम करतोय तो माणूस नेमका कसा आहे हे त्या वाॅचमनला माहित नसतं. तसं हल्ली आपलं होत चाललंय. एखादं व्यक्तिमत्व बघताच ते आपल्याला भावतं आणि आपण मनातल्या मनात त्याला सलाम करत सुटलो आहोत. ही सलाम करण्याची आपल्या मनाला इतकी सवय झाली आहे की , त्या व्यक्तीचं एक कॅरॅक्टर म्हणजे चारित्र्य असतं आणि त्याकडे देखील व्यक्तिमत्वाइतकंच लक्ष द्यायचं असतं हेच आपण विसरत चाललो आहोत. या सलाम करण्याला लगाम घातला पाहिजे असंच नाही ; पण त्यावर नियंत्रण आपल्याला ठेवता यायला हवं. यासाठी आपण एखाद्याकडे पाहताना आपला विवेक जागृत ठेवणं महत्वाचं आहे. व्यक्तिमत्व चांगलं ठेवण्यासाठी आपण झटत असतो. अर्थातच ती चांगली गोष्ट आहे. शरीराचा नीटनेटकेपणा प्रत्येकाने जपला पाहिजे. आपण परिधान करत असलेली वस्त्रे आपल्या व्यक्तिमत्वाला शोभणारी आणि मुख्य म्हणजे व्यवस्थित असावीत. केस विंचरलेले असतील तर व्यक्तिमत्व आणखी खुलून दिसतं. हे सगळं व्यक्तिमत्व आपण घडवलं तरी एक गोष्ट बरेचदा अपूर्ण राहते. ती अपूर्ण राहणारी गोष्ट म्हणजे चारित्र्य ! चारित्र्य हे व्यक्तिमत्वाला पूर्णत्वाला नेतं. त्यामुळे व्यक्तिमत्वाइतकंच चारित्र्य महत्वाचं आहे.

कळकट - मळकट कपडे घातलेल्या माणसाला त्याच्या अवतारावरुनच आपण ओळखतो. पण अशी बरीच माणसं सफाईदार मराठी आणि इंग्रजी भाषेत बोलू शकतात. दुस-यांना मदत करण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. अशाच सतत मदत करण्याच्या वृत्तीमुळे , गरीबी किंवा बेरोजगारीमुळे त्यांच्यावर असं राहण्याची पाळी येते. अशावेळी कळकट - मळकट कपड्यांकडे बघायचं का त्यांना मदत करायची यावरुन आपलंही चारित्र्य ठरत असतं. आज सुंदर दिसण्यासाठी आपण नाना त-हेची उत्पादने वापरतो. पण चांगलं असण्यासाठी 'मनातले विचार' नावाचं सर्वोत्तम उत्पादन आपण वापरत नाही. चारित्र्यसंपन्न माणसाचं आणखी एक उदाहरण म्हणजे त्याला त्याच्या चारित्र्याची जाहिरात करावी लागत नाही. दुसरा माणूस त्याच्या वागण्या-बोलण्यातून ते ओळखत असतो. व्यक्तिमत्व काहीवेळा खुलतंही पण काहीवेळा त्याची थोडीशी जाहिरात करावी लागते. जाहिरात करायला आपण एखादी वस्तू आहोत का जिताजागता माणूस आहोत , हे अर्थातच ज्याचं त्यानं ओळखावं.. व्यक्तिमत्व आणि चारित्र्य या शब्दांचा नेमका अर्थ सांगता येणार नाही. पण आपल्यालाच साधारणपणे तो ओळखावा लागतो. ज्याला समाजाला मनापासून काही देऊ करण्याची इच्छा आहे त्याचं व्यक्तिमत्व चांगलं असतं आणि आपल्याकडे जसं काही देण्यासारखं आहे तसंच आपल्याला समाजाकडून काही नवनवीन शिकायचं देखील आहे आणि कुठलीही लाज न बाळगता आपण ते शिकलं पाहिजे अशी मनोमन इच्छा बाळगणा-या माणसाचं चारित्र्यही चांगलं असतं.

एखाद्या व्यक्तीचा एखाद्या ठिकाणचा वावर हा त्याचं व्यक्तिमत्व प्रतिबिंबित करतो. त्या ठिकाणी वावरताना कुणाशीही त्याचा व्यावहारिक संबंध आला म्हणजे चारित्र्याचाही उलगडा होतो. आपल्याला समोरच्या माणसाच्या केवळ रंग आणि रुपाशीच नातं जोडायचं नाही तर त्याच्या मनाशी देखील एकरुप व्हायचं असतं तेव्हा त्या माणसाच्या फक्त व्यक्तिमत्वाशी किंवा फक्त चारित्र्याशी मैत्री करुन उपयोग नाही , तर त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्व आणि चारित्र्य अशा देखील मनापासून मैत्री करावी. ही मैत्री करण्यासाठी आपलं व्यक्तिमत्व आणि चारित्र्य यांचा सुवर्णमध्य आपल्याला साधायचा असतो. तेव्हाच त्या नात्याला श्वासापर्यंत जगण्याचं वरदान लाभतं. व्यक्तिमत्व म्हणजे आपलं शरीर आणि चारित्र्य म्हणजे मन.. मन आणि शरीर जसं वेगळं करता येत नाही तसंच व्यक्तिमत्व आणि चारित्र्य यांच्यात कधी अंतर निर्माण होऊ नये.. आपल्या व्यक्तिमत्वाच्या ओठी असणारं सुंदर हास्य हे मनातल्या चारित्र्य्याच्या ओंजळीतलं असावं..
व्यक्तिमत्व निरागस असावं आणि त्या निरागसतेचा चारित्र्याला स्पर्श होऊन क्षण अन् क्षण निरागस व्हावा...

-
गौरव भिडे ,
पुणे.

Powered By Sangraha 9.0