सांज सरली भाकर खाऊन झाली तसं मी अंगावर रग घेऊन खाटेवर पडलो होतो अंगणात न्याहाळत ये-जा करणाऱ्या वाटसरूंना. आज शेतात जरा जास्तच काम झालं असल्याने पाय खूप दुखायला लागले होते. इतक्यात मागे भेटलेल विष्णू म्हातारं बाबा मला पुन्हा दिसलं. मी राहूनच त्याला आवाज दिला ये बाबा कुट निघालासा थंडीवाऱ्यात..?
त्यानं हातानं खूनवलं सावत्या माळ्याच्या देवळात जातोय असं..!
झोप काय येत नव्हती, कितीवेळ आकाशात तार्यांना पाहत बसलो, अंगात हुडहुडी भरून आली. तसं अंगात सुटर घालून गल्लीत पोरांनी शेकोटी पेटीली हुती तिथं मी जाऊन बसलो. गावकुसाच्या सतरा लोकांच्या, सतरा विषयांच्या सतरा गोष्टी तिथं चालू होत्या. मी काहीवेळ थांबलो अन् पुन्हा झोपेने डोळे लागायला लागले तसे घराच्या दिशेने आलो.
सारी मुलं घराच्या वाटा जवळ करून घरी झोपायला निघून गेली होती. ज्या तरण्या पोरांची आज मंदिर राखायची पाळी होती, ती पोरं मंदीर राखायला म्हणून मंदिराच्या चहूबाजूंनी असलेल्या ओट्यावर बसून हातात तंबाखू घेऊन तिला चोळीत गप्पा झोडीत बसली होती. संत्या, रामू, जगण्या यांच्या गप्पा तर विझून गेलेल्या शेकोटी पुढे फतकल मारून बसून निवांत चालू होत्या. मस्त मफलरने मुंडासे बांधून अन् अंगात विनीचं स्वेटर घालून ती सगळी निवांत बसली होती.
त्यांना नव्हते सतावत भविष्य की त्यासाठी नव्हती त्यांना कुठली चिंता जे आहे ते छान आयुष्य ती सगळीच मुलं जगत होती अन् मी अजूनही जगण्यासाठी आयुष्याची गणितं जुळवत बसलो होतो. जी इतक्या लहान वयातच मला जुळवायला लागत होती.हा सगळा विचार करत थंडीत अंगावर रग घेऊन बाहेर अंथरलेल्या खाटेवरच झोपून होतो.
आभाळ भरले आकाश काही वेळापूर्वी निवांत मोकळं झालं होतं अन् आता आकाशात टिपूर चांदण्यानी गर्दी केली होती. चंद्राची कोर तिचं काम करत होती अन् काळोखातही तिचा प्रकाश देऊन जंगलातील प्राण्यांना रातीच्या मुक्त भटकंतीसाठी मदत करत होती. मी हा विचार करत करत डोळा लागला म्हणून झोपी गेलो. तितक्यात काठीच्या ठोक्याचा आवाज आला अन् मी अंगावर असलेली चादर घेऊन चहूकडे बघू लागलो.
बघतोय तर घटकाभरानं विष्णू म्हातारं बाबा पुन्हा देवळातून निघालं होतं. थरथत्या हातानं डाव्या हातातील काठी उजव्या अंगाला टेकवत टेकवत विष्णू म्हातारं बाबा त्याच्या घरच्या रस्त्याला चालत गेलं. अधून मधून थंडीचे दिस असल्यानं अन् विष्णू म्हातारं बाबाला भोमारा आला असल्यानं ते रस्त्यानं खोकरत खाकरत चालत होतं.
अन् रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोकल्याच्या एखाद्-दुसऱ्या उबाळे सरशी तोंडात येणारा बेडका जोरात खोकरून तोंडात जमा करायचं अन् नियम लाऊन पाण्याची पिचकारी फेकावी तसं तो विष्णू म्हातारं बाबा तो तोंडातील बेडका फेकायचा. कधीतरी त्याचं हे असं वागणं बघुन त्याला हे नवीन खूळ तर सुचले नसल असं वाटून जायचं.
विष्णू म्हातारं बाबा रस्त्यानं चालत होतं तेव्हा मध्यरात्र उलटून गेली होती, सारं गाव शांत निद्रेत पहुडले होते अन् देवळात सुरू असलेला देवाच्या नावाचा धावा हळूहळू आवाजातून ओसरला होता. गावाच्या उत्तरेला असलेल्या स्मशानातून कोल्ह्याची अन् कुत्र्याची झुंज झुंपावी इतका मोठ्यानं भुंकल्याचा आवाज कानावर पडत होता अन् यातील बहुतांश कुत्रे आता पंधरा वीस मिनिटांच्या झटपटीनंतर मोठ्यानं आकाशाकडे तोंड करून इवळत असल्याचा आवाज येत होता.
कदाचित एखाद दोन कुत्र्यांची नरडी कोल्ह्याच्या टोळीने फोडली असतील. आता त्यांच्या झटापटीने आकाशात उधळलेली धूळ मला बसल्या खाटेवरून दिसून आली. गाव जसं एखाद्या दुष्काळात ओसाड पडावं असं वाटू लागलं होतं. गावाच्या रस्त्यानं धुकं चौफेर साऱ्यागावात शिवाशिवीचा खेळ खेळत असावी असं वाटून गेलं.
मी पुन्हा पाहिलं तेव्हा विष्णू म्हातारं बाबा घरी पोहचले होते अन् कव्हरभर त्याच्या घरच्या ओट्यावर त्या लेकाने दिलेल्या चष्म्याला बघत बसल होत. अन् मनातच काहीतरी बडबड करत हातवारे करत होतं. मी त्याला न्याहाळत बसलो तेव्हा त्यानं एकवार उठून त्याच्या खाटेजवळ असलेल्या केळीतून पेलाभर पाणी वरून तोंडात पिण्यासाठी धरलं होतं पेल्यातील अर्धे अधिक पाणी ओघळत त्याच्या ढेरीपर्यंत आलं होतं.अन् असं दोन पेले पाणी पिऊन विष्णू म्हातारं बाबा खाटेवर जाऊन विसावले.
मी ही उठून सिलपर पायात घालून घराच्या मांगच्या भिंतीवर धार मारून काही आकृत्या काढून चड्डी कर्धुड्यात गुंतवून पुन्हा खाटेवर येऊन झोपलो.मी अंगावर रग घेऊन डोळे बंद केले, पण विष्णू म्हातारं बाबा अजून चष्म्याकडेच पाहत होतं. कधी आकाशाकडं पाहत होते, त्याला नव्हती वाजत थंडी की नव्हते दुखत त्याचे पाय दिवसभर काम करूनही. मी मात्र फार दमलो होतो आता त्या कारणानं मला झोप आवरत नव्हती, मी डोळे बंद करून त्या विष्णू म्हातारं बाबाबद्दल विचार करत झोपी गेलो.
क्रमशः
-भारत लक्ष्मण सोनवणे.