सुगीचे दिस..!

13 Dec 2023 10:12:06

सुगीचे दिस..!
सूर्य अस्ताला गेला तसे गाव, रानात दिवस मावळतीला आला. अंधार पडायच्या आत शेतातून घराकडे जायची ओढ लागली. ढोरांना हौदावर पाणी पाजून, वैरण टाकून, गोठ्यात बांधली. गायीचे दूध वासराला पाजून,काही सांच्या चहाला म्हणून केटलीत काढून घेतलं. हातपाय धुवून वावरातले कापडंबदलून तो विष्णू म्हातार बाबा घराच्या दिशेनं निघाला होता.
अंगात इरलेला सदरा, चार ठीकाणी ठीगळं दिलेल धोतर घालून तो उरे दिवस पुरे करत होता. वाहनाला चिंदकाने बांधुन एकएक दिवस काढत होता, त्याला नको होत सुटर अंगाला की नाही वाजली त्याला कधी थंडी. हा पण हल्ली दिसायला कमी झालं होतं विष्णू म्हातार बाबाला की काय म्हणुन लेकानं शहरातल्या सरकारी दावखण्यातून त्याला एक चष्मा आणला होता.
विष्णू म्हातार बाबा त्याला जीवापाड जपत होते, गळ्यात तुळशी माळ अन् आता उतारवयात त्या तुळशी माळेच्या सोबत ही या चष्म्याची सुतळी होती. विष्णू म्हातार बाबा त्याचा तो निघला होता सावकाश केटलीला हातात घेऊन, मी न्याहाळत राहिलो दूरपर्यंत जास्तोवर त्याला. मी पण निघणारच होतो आता इतक्यात पण; आता कुठं बोर पिकली होती, मग गेलो बोरं खायला. अजून म्हणा तशी बोरं पिकली नव्हती पण खालीच कच्ची पची, हातात बोरटीचा काटा घालून घेतला.
दिवस मावळतीला आल्यानं थंडी सुटली होती, दिवसभर मक्काची कंस भरून, वाहून माझेही पाय पार जड पडले होते, अंग दुखत होते. कसेतरी निघालो घरच्या वाटेला विष्णू म्हातारं चालत होत बिगीबीगी न्याहाळत वस्त्यावरील लोकांची ती बडबड, दुरूनच येणारा तो बोंबलाच्या खुडीचा वास. आम्ही दोघे चालत होतो एरवी मी घरी पोचलो, विष्णू म्हातारं बाबा वाटेनं घरला जाता जाताच रस्त्यावर चपला काढून देवळाची पाय पडून घराच्या रस्त्यान निघायचं.
मी घरला आलो अन् मायना चुलीवर पाणी तापून ठेवलच होत, ते घेऊन मी मोरीत गेलो हातपाय धुतले,तुटक्या आरश्यात बघत बघत वाढलेले केस फनीने मागे घेऊन विंचरले आणि मलाच हसू लागलो. मायन आवाज दिला, मी आलो चुलीजवळ बसलो चुलीचा लालभडक शख अंगाला लागत असल्यानं चेहरा प्रसन्न झाला होता.
मग मायने गिल्लासभर चहा दिला, माझ्यासाठी पिठाच्या डब्ब्यात लपऊन ठेवलेले बटर मला दिले. मी चहा बटर खाऊन घेतले. चिमणी पुढं बसून शिंगाडे मास्तराने दिलेला काहीतरी अभ्यास फाटलेल्या वहीत खरडत बसलो. ते झालं अन् काहीतरी पाठीवर, शिकत हुतो बाप गेला अन् शाळा नावलच राहिली. मला काम करायला लागलं पोटासाठी पोटाची भूक कुठ शाळा शिकू देतीया, पण; आता बसतो काहीवेळ पाटी घेऊन.
ढनाढना आग लागलेल्या चुल्हीवर माय थपथप भाकरी थापवत होती पहिली भाकर भाजायला म्हणून विस्तवाला लागली अन् दुसरी भाकर जेव्हा आई तव्यावर गिरवू लागली तेव्हा मायने मला शिक्यात असलेलं अन् नुकतेच गरम करून ठेवलेले दूध घेऊन भाकर खायला बोलावते, आवाज मारते. शिल्प्यातून साखरेचा डब्बा अन् दूध घेऊन मी चुल्हीसमोर बसतो अन् ताटात भाकर मोडून दूध घेऊन त्या साखर टाकून, कांद्याची पात घालून केलेलं बेसन तोंडी लावत पोटभर जेऊन घेतो.
सोबतीला मायही दोन भाकरी झाल्या की भाकर खायला बसते अन् मग आमच्या कामधंद्याच्या, उद्याच्याला कुठे कामाला जायचं या गप्पा सुरू होत्या. मायीच्या बोलण्यात कळलं की उद्या पहाटे शांता मामी, इस्माईलची माय अन् इस्माईल,मी अन् माय अशी सगळे शिवनामायच्या पल्ल्याड असलेल्या पाटलाच्या वावरात कांदे काढायला उकते ठरून घेतलं हाय.
अन् त्यात मायने माझा बी वाटा केला हाय म्हणून आता आठ दिस कामाची चिंता नव्हती दोन पैकं जास्तीचे हाताला लागणार होतेपण या आठ दिवसात जिवाचं रानही तितकं करायला लागणार होतं. वर भरीस भर की आठ दिसाची शाळा बुडणार होती पण सध्या पैका महत्त्वाचा होता म्हणून म्या माय संगतीने आठ दिस उक्त्यात जायचं ठरवलं अन् माझ्या न बोलण्यानं काही होणारही नव्हतं मायने माझा वाटा केला होता मग जाणं आलं होतच.
क्रमशः
भारत लक्ष्मण सोनवणे.
Powered By Sangraha 9.0