नित्यांकुरा शर्वरी..!

11 Dec 2023 10:00:00

नित्यांकुरा शर्वरी..!
रात्र म्हटलं की मला आठवते एक सुंदर कविता..ती अशी,
रात्री, मी कवी असतो
तेव्हा.. सर्जनाचा सोहळा सजतो
कारण, रात्रच मला कवी बनवते
दोन शब्दांमधले अंधार रात्रीच तर भरले जातात
जीवनाचे सारे रंग त्या अंधारातच मला भेटतात !
म्हणूनच सकाळी लोकांना कविता वाचायला मिळतात
ज्या खाली दिसतं माझं नाव, इवलंस..
पण त्यातली भव्य, नितांत सुंदर रात्र,
ती मात्र कुणालाच दिसत नाही !!
ही कविता वाचून आणि एकूणच, 'रात्र' हा शब्द, हा अनुभव मला मोठ्या अपृपाचा वाटतो. आपल्याला वाटेलंही कदाचित, त्यात कसलं आलं अपृप ? रात्र तर रोजच येते जाते. आपण पहातो, अनुभवतो. त्यात न कुठली नवलाई न अपृप. पण रात्र हा विषय वेगळाच. रोज नवा वाटणारा!
वाटतं, संस्कृतीच्या आरंभकाळी जेव्हा नुकताच माकडाचा 'माणूस' झाला होता, तेव्हा कशी असेल रात्र, माणसासाठी ? ती रोज येत असणारच, नक्कीच, पण माणसाने कळतेपणी घेतलेला तिचा अनुभव, आपल्या विकसित बुद्धीमत्तेच्या बळावर काय वाटला असेल त्याला, तो काळोख ? ज्याला आज आपण रात्र म्हणतो.. तेव्हा माणसाने आपल्या मनाशी लावलेला रात्रीचा अन्वयार्थ थेट सांगणं शक्य नाहीच. पण वाटतं, वाटली असेल त्याला भिती! प्रकाश नसण्याची! आणि दिसणार्या काळोखाने, अज्ञात अनुभवाने त्याच्या मनावर पसरली असेल भितीची गाढता! कदाचित क्षणभर मालावल्या असतील त्याच्या प्रकाशाच्या आशा. त्याच्या मनात असेल का तेव्हा शाश्वती, उद्याच्या उदयाची ? माहित नाही. पण नसावीच बहुधा. आपण विचारच करु शकतो, तेव्हाच्या त्याच्या भावकल्लोळाचा. अर्थात, ही काही अचानक एकाच दिवशी 'जाग' येऊन घडलेली गोष्ट नाही. पण तरीही, कल्पना केल्यावर वाटतं, तेव्हा, अगदी माणूस झाला, तो विचार करु लागला, भावना व्यक्त करु लागला, तेव्हा असा रात्रीचा गडद काळोख पाहून त्याच्या मनात सुरू झाली असावीत निसर्गाप्रतिची प्रार्थनेची अनाम आवर्तनं. जेव्हा भाषेचा प्रश्नही उद्भवत नव्हता, तेव्हा त्याचे चेहर्यावरिल भितीचे, अनिश्चिततेचे उत्कट भाव अस्फुट दिसतात आपल्या कल्पनेच्या डोळ्याला! आणि वाटतं, असतोच की प्रत्येक टोळीत एखादा जाणकार सूज्ञ, तसा असेलंच तेव्हाही ! जवळच्या अंधाराकडे पाहून भितीभाव व्यक्त करणार्या अनेकांना त्याने दाखवला असेल दूरवर, चंद्र! दाखवील असेल एखादी चांदणी, आणि मग त्या 'पहिल्या' रात्रीची भिती तसूभर तरी कमी झालीच असेल. तेही मोहावले असतील चंद्रकळा पाहून. चांदण्यांची चमचम पाहून धुंदावली असतीलच की काहींची सर्जनशील मनं. तेव्हा, भाषेच्या निर्मितीपूर्वीच, उमटली असेल का कुणाच्या मनात एखादी आश्वासक कविता ?
कदाचित, मग हळूहळू सवयीचे झाले असतील ते काळोखाचे प्रहर. मानवाला आराम देणारे, दिवसभर सोसलेली उन्हाची झळ शांत करणारे ठरले असतील ते अज्ञाताचे काळोख! मग हळूहळू काळाच्या ओघात, उत्क्रांतीच्या चक्रामधे, मानवाची कित्तीतरी क्षेत्र विस्तारत गेली. भाषा निर्माण झाल्या, त्याचे विचार, जाणिवा, भावना, सारं काही रुंदावत होतं. आणि माणसाची ह्या सगळ्याप्रतिची जाण वाढत होती. त्याच्या मनात, बुद्धिला चालना देणारे, अस्वस्थ करणारे प्रश्न सततचे बरसत होते आणि उत्तेजित होऊन त्याच्या सर्वांगीण प्रगतीची गती वाढतच चालली होती. मग त्याने शोधलं रात्रीचं वैज्ञानिक कारण, रात्रीची विभागणी, तारे, चंद्र, सगळ्याच बाबींची कारणं, संशोधनात्मक कार्याची तर घोडदौड चालूच होती. एवढंच नाही, तर जगभरात कित्तितरी प्रतिभावंत साहित्यकारांनी या रात्रिच्या गाढतेला, काळोखाच्या गूढतेला आपापल्या प्रतिभेचे मनोज्ञ स्पर्श दिले. हे पाहता वाटतं, मागाशी वर्णिलेला 'तो' माणूस आणि आपण, जरी काळाच्या प्रचंड अंतरावर असलेल्या दोन वेगळ्या बिंदूंवर असलो, तरी आपली परिस्थितीही थोडीबहुत त्याच्यासारखीच तर आहे! शास्त्रीय दृष्ट्या जरी आपण रात्रीच्या कारणाप्रत अचूकपणे पोहोचलो असलो, तरी आजही, ह्या रात्रीचे कित्ती वेगवेगळे अर्थ माणूस काढत आलाय आणि राहिलंही. रात्रीवर भरीव किंवा काही वेगळा मूलभूत सिद्धांत मांडणारं नवं संशोधन जरी आज शक्य नसलं, तरी त्यावर मर्मवेधी भाष्य करणार्या कित्तितरी कवितांचे जन्म आजही होतात. कवितांना, ललित लेखांना तर रात्रीचे डोहाळे अजूनही लागतात, त्यात नवनवे उमाळे, नवे आशय, अर्थ, आजही प्रत्येक भाषेत फुलतात! फुलत रहातीलही.
इथे मला आठवतो तो एक छानसा प्रसंग. एकदा एका लहान मुलाला त्याच्या काकाने विचारलं, "सांग पाहू, रात्र का होते?" यावर तो क्षणात उत्तरला की, "आपल्याला झोपता यावं ना, म्हणून!" तो पुढे म्हणाला, "झोपायला आपल्याला अंधार लागतो, मग झोप लागावी म्हणून रात्र होते!" किती सुंदर कल्पना आहे ही! वरवर कदाचित तुम्हाला वाटेलंही हे निरर्थक, पण मला इथे आठवतात म.म. देशपांडेंच्या नेमक्या ओळी,
"ते पक्षी सुंदर गाती निरर्थक गाणे
मी निरर्थकातील भुलतो सौंदर्याने"
आणि अशाच या वरवर निरर्थक वाटणार्या उत्तरातील सौंदर्याने मी मात्र भुलुन जातो! त्या मुलाचा भाबडा भाव, जणू त्याच्या शब्दांमागे एक गोष्ट चितारुन जातो. ती अशी, की ती सृष्टी आपल्यासाठी रात्र तयार करते. मुळात, वैदिक काळापासून आपण सृष्टीला माता म्हणत आलो आहोत. मग जणू काही तिच्या वात्सल्याचा आविष्कार म्हणून तिने माणसाचे अथक कष्ट पाहून, त्याला आराम मिळावा म्हणून रात्र तयार केली. की तिनेच घेतलं असावं 'रात्रीचं रम्य रुप' मानवाला तोषदायी आराम देण्यासाठी ?
ही रात्र कविकल्पनेला कितीही रम्य वाटली, तरी या रात्रीच्या दोन बाजू वाटतात. म्हणजे अमूक एका दिशेला एक बाजू आणि दुसर्या दिशेला दुसरी, असं नाही ! ठिकठिकाणी ह्या दोन्ही बाजूंचे बरेवाईट विलास आपल्याला आढळतात. कारण रात्र ही कितीही सुंदर वाटत असली, तरी आजच्या 'आधुनिक' काळातही, कित्तेकांसाठी ती आणते एक हेलावून टाकणारी अस्वस्थता, भितीचं आकाशाएवढं सावट, अबोल घुसमट, आणि संकटांच्या अनेक नकोशा चाहुली. विकारव्यसनांमधे 'रंगते?' काहींची रात्र, त्यांच्यासाठी! कितितरी असमर्थनीय कृत्यांना जणू तो अंधार त्यांच्या चुकिच्या कृत्यांसाठीच घातलेलं पांघरुण वाटतं. कुणाला नकोशी वाटते रात्र, निद्रासुखाच्या तळमळीने बेचैन होऊन जागवलेली. किंवा जिथे मनातली वादळं अधिकाधिक वेगवान चक्राकार होत जातात, तेव्हा नकोशीच वाटते रात्र, व्याकुळ करुन रहाणारी !
हिच रात्रीची काळी बाजू! पण रात्रीची दुसरी बाजू मात्र मला नेहमीच आकर्षित करत आली आहे. ती अशी, की रात्री जरी आपण झोपेत असू, तरी तेव्हा अनेकानेक ठिकाणी सुरू झाले असतात, प्रसवाचे उत्सव ! कुठे जन्म घेत असते एखादी आशयघन कविता, अंधाराशी नातं सांगणारी, जीवनाच्या मर्माला अचूकपणे अलगद स्पर्श करणारी. कुठे आकार घेत असतात कथा, जीवनाचे नवे दृष्टीकोन बहाल करणार्या. त्या रात्रीमधेच कुणी साहित्यकार रंगवत असतो व्यक्तीचित्र, नातेसंबंधांचे नवे सुगंध देत असतो शब्दांतून नव्यानं, एखाद्या ललित लेखातून सांगत असतो रात्रीचे नवे प्रकाश. कुणा संगीतकाराला तेव्हा क्षणात सुचून जाते एखादी सुंदरशी चाल. कुणा संशोधकाला लागतो एखादा शोध, सुटतं एखादं गणित, एखाद्या विषयातलं किंवा जीवनाचंही ! अशावेळी मला वाटते 'ही' रात्रीची 'तेजस्वी बाजू'. जिथे प्रज्ञाप्रतिभेला उलगडतात नवे प्रकाश, दिसतात नवी क्षितिजं, आणि खुणावतं काही अंधारापलिकडलंही. अशावेळी किती गोडवे गावेत आपण, या रात्रीच्या रम्यतेचे, तिच्या सृजनात्मक क्षमतेचे. अवर्णनीयच !
मुळात, भारतीय संस्कृतीमधे कोणतंही शुभकार्य करायचं, ते सूर्याच्या साक्षीने, प्रकाशात ! पण तरीही, संस्कृतीही रात्रीच्या मंतरलेल्या विशेषत्वाला जाणून होतीच की. म्हणूनच तर शंकराचार्यही आपल्या एका स्तोत्रात म्हणतात, 'नित्यांकुरा शर्वरी' ! शर्वरी म्हणजे रात्र, आणि ती कशी आहे हे सांगताना आचार्य म्हणतात, की ती नित्यांकुरा अर्थात, नित्य अंकुरीत करणारी अशीच आहे! आपल्याला वाटत असेल ही रात्र म्हणजे फक्त अंधार, काळोखाचं साम्राज्य! पण कुणासाठी असतो तो 'सावळा अंधार' त्या पांडूरंगाचंच प्रकटलेलं सावळं रुप!
या रात्री जागतात तीन 'समांत' जे आपण नेहमीच ऐकत आलोत. रोगी, भोगी, आणि योगी ! रोग्यांना नाईलाजास्तव जगाव्या लागतात रात्री, कंठत, असहाय्य अवस्थेत व्यथित करतात ते रात्र. भोगी लोकही जागवतात हे प्रहर भोगविलासांच्या रम्यतेत. आणि योगी मात्र, तल्लीन होतात साधनेत, योग साधत एकरुप होतात परमतत्वाशी. ही रात्र त्यांच्यासाठी चिदृपाच्या नव्या अनुभूती देणारी पर्वणीच ! थोडक्यात, ही रात्र म्हणजे प्रत्येकाला निरनिराळ्या अनुभूतींचे प्रकाश देणारी.
मग, अशाच रात्रीचं एक भव्य वर्णन जाणवतं, की या योग्यांसाठी 'ती' शक्ती जणू काही रात्रीचा पदरच ओढते आणि मग भूतलावरच्या तिच्या पिपासू लेकरांना ती पाजते, ज्ञानस्तन्य ! तेव्हा आकाशात न दिसणारे प्रकाश जणू उजळतात अंतरीच्या आकाशात. अनंताचे गम्य उलगडून जाते क्षणात, तिच्या रात्रीकृपेने !
थोडक्यात, ही रात्र फार अपृपाचीच तर आहे ! प्रत्येकासाठी वेगळी. प्रत्येकाच्या अंधाराला नवे प्रकाश देऊ करणारी. म्हणूनच रात्रीची शांतता ही भयकारक नसतेच तर ती असते प्रसन्न शांतता ! जी दूर सारते आपल्या आतले, अज्ञानाचे अंधार. तेव्हा तेजस्वी होते रात्र, उजळून जातात अंधार. मग श्वासाचा वारा होताना, हेच अंधाराचं संचित देऊन जातं प्रकाश, आणि ठेवून जातं मागे, आपलं, प्रकाश सांगणारं, अंधाराचं गाणं !
~ पार्थ जोशी
Powered By Sangraha 9.0