हसणं ही प्रत्येक व्यक्तीला लाभलेली एक सुंदर देणगी आहे. एखादी गोष्ट कला आहे का शास्त्र, असा आपण विचार करतो. हास्य ही कला आहे. कला म्हटलं म्हणजे ती उपजतच असावी लागते. हसता येणार नाही, असा जगात माणूस नाहीच. म्हणून हसणं हे उपजत आहे. माणसानं नेहमी मोकळेपणाने हसावं. हास्य नसणारी क्षेत्र फार थोडी.. संगीतात अनेक गाणी विनोदी आहेत. साहित्याच्या क्षेत्रात कथा-कविता विनोदी असतात. व्यावहारिक कार्याची सुरुवात देखील हास्यानेच होते. नवीन ओळख होते तेव्हा ओठांवर स्मितहास्य असतं. साधं स्मितहास्य एखाद्या नात्याची छानशी सुरूवात करतं. तेव्हा हसणं किती सुंदर आहे, हे आपल्याला जाणवतं.
एखाद्याकडे आपण हक्काने टाळी मागतो तसं आपण एखाद्याकडे बघून निर्मळ हसतो, तेव्हा ती व्यक्ती आपल्याकडे पाहून निर्मळ हसते. म्हणजेच साद आणि प्रतिसादाची क्रिया साध्याशा हसण्यामुळेही घडून येऊ शकते. हसण्याला वरदान म्हणावं ते ह्याकरिताच ! वरदान याचा अर्थच मुळी कधी नष्ट न होणारं दिलेलं दान.. हास्य कधीही नष्ट होणार नाही. हास्य प्रत्येकवेळी ओठांवरच असतं असं नाही. ते मनातल्या मनातही असतं. ते डोळ्यातून दिसतं. अर्थात त्यासाठी डोळे बोलके हवेत आणि समोरच्या व्यक्तीत ते डोळ्यातलं हास्य ओळखण्याची शक्ती हवी. ही शक्ती ज्यांच्याकडे असते ते मनानी निर्मळ असतात, मोकळे असतात. ओठांवर असणाऱ्या या हास्याचा आपल्या भोवतालच्या वातावरणावर प्रभाव पडत असतो. हसण्यानी वातावरण पवित्र राहतं, प्रसन्न राहतं. एखादा माणूस रागीट असला, सतत रडत असला म्हणजे आपल्यालाही काही सुचत नाही किंवा काहीवेळा कंटाळा येतो. पण एखादा माणूस छान प्रसन्न हसत असेल तर त्याचा आपल्याला कंटाळा येत नाही. उलट ते हसणं हवंहवंसं वाटत राहतं.
आपण कधी गावाला जातो किंवा शहरापासून दूर एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जातो, तेव्हा भोवतालच्या रम्य वातावरणाचं निरीक्षण करत असतो. डोळ्याला जे जे दिसेल, ते ते आपण मनात साठवून घेतो. फुलं फुलतात, झरा वाहतो, पाखरं झुलतात, वा-याची इवलीशी झुळूक आली तरी त्या स्पर्शाने झाडांची पानं अलवार सळसळतात. ह्या साऱ्यांतून निसर्गच हसत असतो.. म्हणूनच तर हे सारं पाहताना आपलं मन आनंदी होतं. छोट्या छोट्या हलचालीतून निसर्ग हसत असतो. लहान मुलांना हसताना बघून आपल्याला किती आनंद होतो नाही का ! छोट्याशा बाळांना हसवण्यासाठी आपण किती प्रयत्न करतो. एखाद्या प्रयत्नात ते बाळ हसायला लागतं. त्याच्या हास्यात आपल्या हसण्याचे सूर मिसळून आपण हसायला लागतो.. अगदी आपल्याही नकळत ! ते बाळाचं हसणंच निरागस असतं. त्याच्या हास्यात सूर मिसळला म्हणजे ती निरागसता ते बाळ आपल्याला सहज देऊ करतं. हसण्याचं आणि निरागसतेचं घट्ट नातं आहे... नव्वदीच्या घरात पोचलेल्या एखाद्या आजीची बत्तीशी निघून गेलेली असते. पण तरीही ती आजी हसताना गोड दिसते. हीच हसण्याची किती कमाल आहे. आजच्या सारं पैशाने विकत घेण्याच्या काळात हास्य मात्र फुकट आहे. हसण्याला हसण्यानी प्रतिसाद देण्यानी ते वाढतं. हसणं जपून ठेवण्यासाठी एफडी करावी लागत नाही की लॉकर उघडावा लागत नाही. मनातला एखादा कप्पाही अनंत हास्याला पुरतो. कायम मोकळेपणाने हसत राहणं हीच निरोगी आयुष्याची एफडी ! त्या एफडीला तुम्ही हसत रहाल तेवढा व्याजदर आणि हसण्यात जितका मोकळेपण तितकं तुम्हाला त्याचं व्याज मिळत राहतं. आता मॅच्युरिटी डेट विचाराल तर ह्या हसण्याच्या एफडीची मॅच्युरिटी डेट म्हणजे शेवटचा श्वास... तोपर्यंत सदैव मनापासून हसत रहायचं.
हसणं जितकं सहज आहे, तितकं हसवणं मात्र सोपं नाही. हसवण्यासाठी दुस-याच्या मनाला सहज स्पर्श करण्याची कला अवगत असावी लागते. लॉरेल अँड हर्डी ही दोघं या भूतलावरची पवित्र माणसं.. आपल्या आयुष्याच्या साऱ्या कथा आणि व्यथा बाजूला ठेवून सारं आयुष्य त्यांनी हसण्याला वाहून घेतलं. मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेली लक्ष्मीकांत बेर्डे, दादा कोंडके, अशोक सराफ, प्रशांत दामले, सतीश तारे, नयना आपटे, शरद तळवळकर अशी कितीतरी नावं घेता येतील. हे हास्याचे तारे आहेत. हसवण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचलंय, अजूनही वेचत आहेत.. एखाद्या प्रियकराला आपली प्रेयसी हसते, तेव्हा रम्य फुलांचा जणू वर्षाव झाल्यासारखं वाटतं. आपलं तान्हं मूल हसतं, तेव्हा त्या बाळाच्या आईच्या चेह-यावरलं हास्य शब्दांत सांगणं अशक्य आहे. नात्याला, माणसाशी माणसाला आनंदानी बांधून ठेवणारं हसणं, हे खरोखरच माणसाला मिळालेलं वरदान आहे. या रम्य अशा हसण्याला आणि मनापासून हसणाऱ्या आणि हसवणाऱ्या या जगातल्या प्रत्येक जीवाला सलाम !
- गौरव भिडे