शब्द मला दे साधा..

19 Nov 2023 10:00:00

शब्द मला दे साधा..

कवी साहित्यिकांचं शब्दांवर, भाषेवर प्रभुत्व असतंच; पण त्याहीपेक्षा जास्त असतं आणि त्यांच्यासाठी महत्त्वाचंही असतं ते त्या शब्दांवरलं अपार नितांत प्रेम! भाषा कोणतीही असो; पण त्या भाषेच्या हव्याहव्याशा स्निग्ध पोषक आणि तोषक अशा दूधावरची मऊ स्नेहाळ साय म्हणजे शब्द असतात! लोभस आणि आकर्षून घेणारे, लळा लावणारे असतात ते. अशी माणसं शब्दांविषयीचं अपार कुतूहल घेऊन बागडत असतात, भाषेच्या विस्तीर्ण प्रांगणात अगदी अल्लड वयातल्या कोवळी भिरभिरती दृष्टी घेऊन. एकाएका शब्दापाशी खेळण्यापाशी थांबावं, तसं थांबतात औत्सुक्यानं आणि खेळत बसतात त्याच्याशी. वरवर पाहून अनेकांना वाटतोही तो खुळेपणा; पण,

'अरसिकेषु कवित्व निवेदनं शिरसि मा लिख मा लिख मा लिख'

असं म्हटलंच आहे ना. अरसिकाला त्यातलं सौंदर्य समजावणं हे अशक्यच असतं, त्या वाटेलाही शक्यतोवर जाऊच नये. पण... या शब्दस्नेहींची कुठेतरी नाळच जुळलेली असते शब्दांची. एखाद्या कुशल पाचकाने आंब्याचे अगदी निपुणपणे काप करावेत तसेच हेही फोडी करतात शब्दांच्या. वाटतं, की शब्द म्हणजे वरवरचं आंब्याचं सालंच दिसतं आपल्याला. त्याच्या आतला रसाळ गर मात्र तेच जाणतात! चोखतात आणि तृप्तही होतात! पण हा गर मात्र न संपणारा असतो त्यांच्या कुतुहलासारखाच! हल्ली ‘कुतूहल’ या शब्दाचंही फार कुतूहल वाटू लागलंय... किती जीवंत असतो हा शब्द, असावा आणि जीवंत ठेवणारा असतो. जोवर तो मनाच्या अदृश्य गाभ्यात दरवळत राहतो, तोपर्यंत तरी संवेदना बोथट होत नाहीत. रक्ताला फुटत राहते हिरवी पालवी. कशालाही पाहून रक्तनातं जोडणारी आणि श्वासही होत राहतात सुरेल या कुतुहलामुळे. अगदी मुंगीच्या इवल्या इवल्या रेखीव पायांच्या निरीक्षणांपासून ते एखाद्या मोठ्या वृक्षाच्या हिरव्या छटा पाहण्यापर्यंत, आयुष्याला नवे ताल मिळत राहतात आणि त्यातून उमेदीची कोवळी स्वप्नही सजत राहतात ती या कुतुहलामुळे. मग ते शब्दांचं असेल, तर आंतरउमाळ्यांना मिळत राहतात अचूक शब्दाकार आणि अव्यक्ताचे अनुवाद होता होता कवितेचं सुगंधी ताजं पीक येतं आतून.

आठवतात ती पतंजलिंची वाक्य. 'अष्टाध्यायी' हा संस्कृत व्याकरणावरिल ग्रंथ सिद्ध करणारे पतंजली ऋषी आपल्याला माहीत आहेतच. आपल्या महाभाष्यामध्ये ते म्हणतात,

एकः शब्दः सम्यग्ज्ञातः शासन्वितः।

सुप्रयुक्तः स्वर्गे लोके कामधुग्भवति।

म्हणजे एक शब्द सम्यकरित्या ज्ञात केला आणि तसाच अचूक प्रयोजला तर त्या माणसाला स्वर्गात आणि इहलोकातही तो स्थान मिळवून देतो आणि याचमुळे तो कामधेनूसारखा ठरतो.

हे वाचून विस्मयचकीत होतो आपण! कसं असेल हे शक्य? क्षणभर वाटतोही हा कविप्रतीभेचा कल्पनाविलास. असा, जो केवळ कल्पना म्हणून आकर्षित करतो, आनंदून टाकतो आणि सुखद कल्पना म्हणून सानंद स्विकारताही येतो; पण कल्पनाच म्हणावी का याला? की खरोखरीच असतं असं काही? शब्द पतंजलींचे असल्याने ते नक्कीच असत्य असणार नाहीत. मग विचार करता वाटतं, की हेच तर शब्दब्रह्म असावं!

अनादिनिधनं ब्रह्म शब्दतत्त्वं यदक्षरम् ।

विवर्ततेऽर्थभावेन प्रक्रिया जगतोयत: ।।

अर्थात, शब्दब्रम्ह हे उत्पत्ती व विनाश या प्रक्रियेपासून मुक्त आहे, आदी व अंत रहित आहे. त्याच शब्दाला कुणी प्रणवही म्हटलं आहे. मग तो शब्द जाणण्याचे प्रयत्न हे ते शब्दयोगीच करु शकतात. एखादा शब्द असतो, कुठल्याही भाषेतला. संस्कृत किंवा मराठीही. त्याचा अर्थ आपण जाणतो; पण कधीतरी त्या अर्थाचा प्रत्यय एखाद्या विजेसारखा लखलखून जातो आपल्यासमोर कोणत्या विशेष किंवा सामान्य अनुभवातून सुद्धा. एखाद्या कवितेत शब्दाचा वेगळा अर्थ जेव्हा लागतो, त्याचं तिथलं उपयोजन, महत्त्व आणि गंमतही ज्याक्षणी लक्षात येते, तो क्षण साक्षात्कारासारखाच वाटतो नाही? कारण कविता ही शब्दांत कुठे असते? शब्द घेऊन जातात आपल्याला आशयाच्या डोहाकडे. त्याच्याही तळाशी क्वचित भेटते आपल्याला कविता आपल्यासाठी आसुसलेली, स्वागतोत्सुक. तसेच हे शब्द. शब्दब्रम्ह जो नीटपणे जाणतो, त्याला ब्रम्हतत्व प्राप्त होतं, असं शतपथ ब्राम्हणात म्हटलं आहेच. हाच धागा पतंजलींच्या शब्दांशी जोडताना थोडासा उलगडतो अर्थ आणि त्यांचं प्रतिपादन खरंही वाटू लागतं.

पण हे शब्द आणि शब्दांवर असलेल्या कविमनीषींच्या निष्ठा पाहून सहज आठवतात ते अरुणा ढेरेंचे असेच निष्ठावान शब्द.

'दिल्या तुला तळव्याच्या रेषा

शब्द मला दे साधा..'

खरं मागचे कोणतेही संदर्भ न पाहता या दोन ओळी वाचल्या तरी किती काय काय वाटून जातं!

शब्दांतच ईश्वर पाहून त्याच्यासाठी आसुसलेली शब्दनिष्ठांची मांदियाळी फार फार मोठी वाटू लागते. किती सहज म्हटलंय इथे, की तुला तळव्याच्या रेषाही देऊन टाकल्या; पण मला फक्त शब्द दे, बस्स. या सहजतेमागे की उत्कट आहे शब्दांसाठी आसुसलेली तहान! अशी तहान, जी तो शब्द मिळवण्यासाठी काहीही द्यायला तयार आहे, अगदी भाग्यही! हातावर भाग्यरेष नसेल तरीही चालेल; पण आपला शब्द मात्र तिथे असावा ही दाटून आलेली ओढ किती जवळचं नातं सांगते शब्दाशी! पण अशी तहान सगळ्यांनाच लागत नाही आणि ज्यांना लागते ते त्यांचे उरतच नाहीत!

तेव्हा वाटतं, की केवळ शब्दच नाहीत, तर कोणतीही कला अशीच तर असते. अखंडपणे कठोर परीक्षा घेणारी. मग कधीतरी झालीच तिची इच्छा तर प्रसन्न होऊन आपला प्रसाद त्या आसुसल्या हातांवर अलगद ठेवणारी. अगदी कमी असतात असे कलाकार ज्यांवर फार लवकर प्रसन्न होते कला नावाची गूढ अगम्या; पण अशी तहान ज्यांना लागते त्यांना या अलौकिकाची किंमत वेळोवेळी चुकवावी लागते. प्रसंगी आपल्या तळव्याच्या रेषा देऊनही, याला इतिहास साक्ष आहे!

- पार्थ जोशी

Powered By Sangraha 9.0