राम लड्डूमध्ये रामाशी संबंधित काहीही नाही आणि लड्डू म्हणावं तर गोडही नाही. या पदार्थाचा इतिहास शोधून सापडणार नाही. तसं पाहिलं तर राम लड्डू म्हणजे मुगाचे भजे आहेत पण त्याची सर्विंगची पद्धत अतिशय वेगळी आहे. एखाद्या पदार्थाचे नाव ठरवताना आपल्याकडे देवाचे, शहराचे नाव गुंफण्याकडे सर्वांचा कल असतो. त्यामुळे असंच एखाद्या आचाऱ्याने या भज्यांना राम लड्डू म्हणायला सुरवात केली असावी असा माझा अंदाज आहे. उत्तरप्रदेशमध्ये हा पदार्थ मिळतो आणि तिथूनच दिल्लीत आला असावा. रामाच्या एखाद्या आचारी भक्ताने राम लड्डू नाव दिले असावे.
उडदाची, चण्याची आणि मुगाची डाळ भिजवली जाते. याचे प्रमाण आवडीनुसार ठरवले जाते. कमीतकमी पाणी मिसळून या भिजवलेल्या डाळी, मिरची घालून वाटले जाते. वाटल्यावर त्यात हवा मिसळण्यासाठी मिश्रण फेटले जाते. हलके झालेल्या पिठाचा गोळा पाण्यावर तरंगतो. यात मुळ्याच्या पानांची पेस्ट टाकतात आणि त्यामुळेच हा पदार्थ भज्यांपेक्षा वेगळा आहे. तेलात तळल्यावर राम लड्डूचे सुरीने दोन तुकडे केले जातात. यासोबत देतात ती चटणी वेगळी असते. मूल्याची पाने, मिरची, आलं आणि कोथिंबीर याची चटणी बनवतात. राम लड्डू मध्ये जितका मुळा वापरला जातो तितका मुळ्याच्या पराठ्यातही नसतो.
सर्व्ह करताना राम लड्डुवर मुळा किसून, चटणीमध्ये डुबवून द्रोणात आपल्या हातात देतात. लड्डूच्या पिठात मिरची उभी चिरून त्याचेही मिरची वडे बनवतात. लड्डुसोबत हे वडेही देतात. कोणतेही स्ट्रीट फूडमध्ये कच्चा किसलेला मुळा लोक आनंदाने खातील असं मला कधीही वाटले नव्हते पण राम लड्डूची ती कमाल आहे. दिल्लीत अनेक ठिकाणी तुम्हाला याचे स्टॉल्स दिसतील. आपल्याकडे जसं पाणीपुरीच्या गाड्या उभ्या असतात तर तिकडे लड्डूचे स्टॉल्स असतात. लाजपतनगरमध्ये अनेक प्रसिद्ध स्टॉल्स आणि दुकाने आहेत. कधी तिकडे गेलात तर या तिखट लड्डूचा आस्वाद नक्की घ्या.
- सावनी