संग्रामवाडीमध्ये अशी कित्येक वडीलधारी माणसं आहेत, जी माझ्या खूप जिव्हाळ्याची आहेत, ज्यांच्यावर माझा भयंकर जीव आहे. त्यांच्यावर लिहायचं झालं, तर एका व्यक्तीवर एक कादंबरी सहज होईल इतकं सुंदर अन् तितकंच गूढ आयुष्य ही माणसं जगली आहेत. त्यामुळं या आजोबांच्या जगण्याच्या कथा फार उलगडल्या नाहीत अन् तेही फार असे कुणाला उलगडले नाहीत. एकांतात राहून एकांतात आपलं ठरलेलं काम उभं आयुष्य ते प्रामाणिकपणे करत राहिले अन् आपलं आयुष्य कंठीत राहिले.
रंगाजी आबा, झुंबर आई, आपा अशी गावात कित्येक मंडळी होती, जी आज खाटीला मिळाली, पण त्यांचं उभे आयुष्य समृद्धपणे जगलेलं जीवन काही केल्या त्यांना स्वस्थ जीवन जगू देत नाही. अन् मग ते असे काहीतरी उद्योग करत राहतात. ही माणसं उद्योग करत राहतात म्हणूनच आजवर तग धरून आहे नाहीतर केव्हाच यांची लाकडे म्हसनात गेली असती, पण जे हाय ते बरं हाय.
हिवाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. गेले दोन-तीन दिवससंग्रामवाडीवर पहुडलेली थंडी हळुवार रोज थोडी-थोडी वाढत आहे. सूर्य पिवळ्याचा तांबडा सोनेरी व्हावा अन् नेहमीची सांज ढळावी. वेगळं काही नाहीये रोजच्याप्रमाणे सायंकाळ व्हावी, गावाच्या वेशीवर दोन-चार तरण्या, म्हाताऱ्या माणसा-पोरांच्या शेकोट्या पेटल्या जात आहेत.
उंच-उंच आकाशात उडणारे विस्तवाचे लोट, उडणाऱ्या ठिणग्या, आगीसोबत लहान पोरांचे काडीने चालू असलेले खेळ इतकंच.
काहीवेळाने शेकोटी विझुन जाते, सगळे ज्याच्या त्याच्या घरी जाऊन खाऊन पिऊन झोपून रहातात...
गावचे चार-दोन ज्ञानी म्हातारे देऊळात येऊन दिवाबत्ती करतात अन् अंगावर शाल पांघरून टाळ मृदुंग हातात घेऊन अभंग म्हणत बसतात, हरिपाठ घेतात. अभंगाचा तो खडा आवाज त्या शेवटचा काळ मोजत असलेल्या म्हाताऱ्याच्या गळ्यातून इतका सुंदर येतो की, त्याला जगातील कुठल्याही आवाजाची तोड नाही...मला हरिपाठ उमगतो समाप्तीचा अभंगही माझा पूर्ण पाठ आहे.
वेळोवेळी नेहमीच रात्रीच्या प्रहरी अभंग कानी पडत राहिले, हरिपाठ कानी पडत राहिला. मीही त्या संस्कारात घडत राहिलो. हल्ली कधीतरी माझाही तसा उंच आवाज अभंगात लागून जातो. हरिपाठ तर नेहमीचाच आहे, पण ते तितके सोयीचे, सवयीचेही नाही जितके त्या देवळात बसलेल्या म्हाताऱ्या माऊलीचे आहे...
हे सगळं कानावर पडत राहतं, मी न्याहाळत असतो. त्या लाकडी खोलीला सोबतीला असतात खोलीतल्या सादळलेल्या भिंतीचा सुवास, शिंक्यात अटकवून ठेवलेली रिकामी तगार, झोपेच्यावेळी जुन्या पिवळ्या बल्बच्या उजेडात चालू असलेला सावल्यांचा खेळ, पालीचा भिंतीवरील किडे पकडण्याचा बेत अन् माझी नजर तिच्यावर जाणे, नुकत्याच शेतातून तोडून आणलेल्या भुईमुगाच्या शेंगा ज्या पत्री डब्यात ठेवलेल्या आहे,त त्यांचा कोरठ येणारा सुगंध...
पिसाच्या कापडात गुंडाळून ठेवलेली फळीवरील आजोबांनी आणलेली सार्थ ज्ञानेश्वरी, भागवत गीता, अन् अजून भरपूर पुस्तके, दस्तावेज, पत्र, जुनी मासिके जी पिढ्यानपिढ्या जपली गेली आहे. आजही कधीतरी माझाही हात त्याच्यावरून फिरत असतो, वाचन होत असते संस्कृत फार उमजत नाही पण मराठी अर्थात वाचून मनाला समाधान भेटत असते...
हे जपवल जावं पुढेही असच अन् इतकंच..!
बाकी शिवनामाय संथ शांतपणे वाहत आहे, रात्रीच्या प्रहरी रौद्र वाटते. जशी सकाळ सुंदर वाटत असते. नदीच्या तीरावर असलेल्या हापश्यावर कुणीतरी याहीवेळी हापश्याला हापसत आहे, कोण असावा माहीत नाही खिडकीतून दिसेचना...
देऊळात चालू असलेला देवाच्या नामस्मरणची वेळ संपलेली असावी बहुतेक, म्हातारी खोकत-खाक्रत रस्त्यानं चालत जाताना दिसू लागली आहे. धोंड्या आबाच्या आधारासाठी असलेल्या काडीला आबाना खालून घासू नये म्हणून स्टीलचा रोड लावला आहे. तो टीन टिन वाजवत आबा चालत असल्याचा आवाज माझ्यापर्यंत येतोय...
गाव कधीचाच झोपला, कुणी टीव्ही पाहतो. पण या गावची माऊली त्या माऊलीच्या सहवासात वावरत असते कायम, म्हणून गाव सुखी भासतो, गावाला गावपण आल्यागत वाटत राहतं, नाहीतर पडकी वाडे, इमारती कधीच जमीनदोस्त झालीत, पिंपळाची पार कधीच मोडून लोकांनी खुर्च्या बसवल्यात. बरे आहे... गाव टिकला पाहिजे गावातली माऊली टिकली पाहिजे इतकंच.
क्रमशः
- भारत लक्ष्मण सोनवणे.