दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं..! भाग - ११

04 Oct 2023 10:00:00

दगडफोड्या संतू अन् नागूचं जगणं ..! भाग - ८

चहूकडे अंधारून आलं होतं, काळोख दाटून आला होता. या काळोखाच्या किर्र अंधाराखेरीच तुडुंब भरून वाहणाऱ्या शिवणामायच्या पाण्याचा खळखळाट फक्त या अंधारात ऐकू येत होता. संपूर्ण गाव भूकंपात जमीनदोस्त व्हावं तसं सारं गाव अंधारात निपचित झोपड्यांच्या आड होऊन गारठयाचा जो मिळेल तो आसरा घेऊन पहुडला होता. सांजेचे आठ वाजले तसं सारं गाव चिडीचूप पहुडले होते.

इकडे संतू, नागू अन् गोंडाजी यांची जेवणं आवरली अन् ती तिघे लिंबाच्या पारावर सोजणी अंथरून लिंबाच्या खोडाला मान टेकवून उद्याच्या पहाटे शहराला जायचं नियोजन करु लागली होती.

सांजेला गोंडाजी अन् संतू उद्या पहाटे दोन टेम्पो आपल्याला शहर जवळ करायला लागतील एक आपलं अवजारे, संसार बादली, तयार झालेली वराटे, पाटे, मंदिरात असणारे दिवे, खलबत्ते, मुसळी असं सगळा तयार माल एका गाडीत अन् राहण्यापूर्ता संसार अन् दोघांची तीन खेचर एका गाडीत घेऊन जायचं म्हणून गावातल्या रख्माजीला पहाटेचा सांगावा सांगून, काही इसार देऊन आले होते.

त्याने पहाटे सहालाच झोपड्या मोहरे गाडी आणून लावण्याचं कबूल केलं होतं. आता तिघेही महत्त्वाचं काम झाल्यानं निवांत होते.

सांज सरली तसं अंधारून आलेल्या ढगाडात पावसाची ढग दाटून आली होती. सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस बरसतो की काय असं वाटून गेलं होतं. वाऱ्यावावधनाचा पाऊस आला तर पालं उडायची भिती होती. पण; बिरोबाच्या कृपेनं अन् नागूने मंत्र मारून पावसाला वळून दिल्यानं पाऊस वाऱ्याच्या वेगासरशी गावाच्या उत्तरेला कलला होता.

गावाच्या उत्तरेकडील दिशेनं पाऊस कलला तसा, गावाच्या निसर्गावर काळी ठिगळं दिलेली घोंगडी अंथरावी तसं आसमंत त्याचं काळोखात दाटून आलेलं सौंदर्य दाखवत होता. वावधन सुटलं होतं अन् दिवसभर दगुड फोडून थकलेला गोंडाजी व संतू हा गारवा अनुभवत नागूशी बोलत बसले होते.

बराच वखत गप्पा झाल्या अन् उतरवयाचं लक्षण दिसू लागलेला नागू दोघांना येतूया म्हणून आपली सोजनी झोपडीच्या बाहेर अंथरलेल्या खाटेवर टाकून अंगावर एक कंबळ अंगावर घेत खाकरत, खोकरत झोपी गेला.

इकडे संतू अन् गोंडाजी कोपरीच्या खिश्यातून चंची काढून तंबाखूला चूना लाऊन गप्पा करीत तिला मळीत होते. बराच उशीर झाला होता, दोघांनी आपल्या हातातली मळीलेली तंबाखू फटका देऊन ओठाखाली दाबली अन् उद्या पहाटे लवकर उठायला हवं म्हणून झोपडी जवळ केली.

संतू त्याच्या झोपडीजवळ आला तेव्हा संतूची बाई मोहरल्या अंगणात भांडे घाशीत बसली होती. संतू तिला दुरूनच न्याहाळत तिच्याजवळ येऊन उकीडवा बसला. तिच्याशी गप्पा मारीत बसला, उद्याचं तिचं काम अन् पहाटे काय करायला हवं असं एकूण दोघांचं नियोजन त्यांनी केलं.

भांडी घासून झाली तसे भांड्याची दुरडी संतुने उचलली अन् तो त्याच्या बायकोकडे बघू लागला. संतूचं हे असं दूरडी उचलणं त्याच्या बायकोला पहीलून होतं, त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक अनामिक प्रेमाचं हसू आलं अन् तिनं संतूकडे बघत बालिश भाव करून, गोंडाजी गुण लागलासा काय..! असं तिचा दादला संतूला बोलून गेली. दोघं पुन्हा मोठ्यानं हसत झोपडीच्या आत गेली, ताटीला अडकुत घातल्या गेलं अन् सुखी संसाराच्या त्यांच्या गुजगोष्टी सुरू झाल्या.

संतूचं हे बदलेलं वागणं बघुन त्याची बाय आज त्याच्यावर ज्याम खुश होती.

इकडे गोंडाजी झोपडी पहूर येवोस्तोवर रानूबाई अन् सुमनबाई उद्याच्या पहाटे निघायचं म्हणून भांडीकुंडी करून, लागणारी संसारबादलीची बांधाबुंध करत होत्या. गोंडाजी आला तसं त्यानं झोपडीच्या चारी मोहरं लावलेला दगुड चापलून बघितला अन् तयार जिनशीचा माल बघून उद्याच्याला गाडीभरून माल होईल का याचा अंदाज तो लावत बसला.

खेचराजवळ जाऊन त्यांच्या पाठीवर हात फिरवत त्यांना एका अंगाला पाणी दाखवून त्यांना त्याने बांधून टाकलं. अन् काहीबाही दोनचार पेंड्या गवताच्या, उरलेल्या भाकरी त्यांच्यापुढे टाकून तोही झोपडीत शिरला.

येदूळपर्यंत रानुबाई अन् सुमनबाई यांची आवरासावर झाली अन् त्यांनी दिवसभर आपलं कामाने, वणवण भटकंती करून थकलेलं शरीर त्यांनी धरणीला टाकलं व दोघीही झोपी गेल्या.

गोंडाजी बाजूलाच खाट टाकून तिच्यावर पडून राहिला, उद्याच्या कामाचा तो विचार करत बसला होता. हळूहळू बाहेर होणारं वावधन बरच शांत झालं होतं. पिठाच्या डब्ब्यावर लावलेला लाम्हण दिवा हळू हळू मालवत चालला होता.

क्रमशः

- भारत लक्ष्मण सोनवणे.

Powered By Sangraha 9.0