इंद्रियां आर्जव!

29 Oct 2023 10:00:00

इंद्रियां आर्जव!

एखाद्या माणसाला काय उचित आणि काय अनुचित हे योग्य प्रकारे माहित असतं, पण तरीही अनुचित्याच्या मागे लागून तो स्वतःला क्लेश करून घेतो. क्षणभराच्या आनंदापायी, मोहापायी काय चांगलं आणि काय वाईट हे बुद्धीच्या पातळीवर ठाऊक असलं, तरीही इंद्रियांचं ओढाळपण, मनाचं गुंतलेपण आणि अनावर होणं हे माणसाला नको तिथे(च) पटकन घेऊन जातं. त्याच्याही नकळत! याचं सोपं उदाहरण म्हणजे डायबेटिस असलेल्या व्यक्तींना कितीही ठाऊक असलं, की गोड खायचं नाही तरीही मनाचा मोह नियंत्रणाखाली नसल्याने त्यांच्याकडून गोड खाल्लं जातं, अर्थात त्याचे परिणामही अटळ असतात! ज्याप्रमाणे 'किं अकर्तुम्' म्हणजे काय करू नकोस हे या मनाला आणि इंद्रियांना सांगावं लागतं त्याचप्रमाणे 'किं कर्तुम्' म्हणजे काय करावं, कुठे रमावं हेही सांगायला हवंच ना.. माऊलींनी म्हटल्याप्रमाणे पाणी खालच्याच दिशेने वाहत जातं, तसंच आपल्या मनदेखील चुकीच्या गोष्टींकडे अगदी सहज प्रवाही होतं. ते त्याला सांगावही लागत नाही. पण मग कुठे जायचं? कोणत्या दिशेने धाव घ्यायची, हे आवर्जुन सांगायला हवं हे मात्र नक्की! त्यामुळे विषयसुखात, इंद्रिय-विलासात अति वेळ रमू नकोस, हे सांगणं जितकं गरजेचं आहे, तितकच कुठे रमावं काय करावं, हे सांगणही निकडीच आहे. तुकोबांनी एका अभंगातून त्यांच्या इंद्रियांना हेच तर सांगितलं आहे!

घेई घेई माझे वाचे ।

गोड नाम विठोबाचें ॥१॥

तुम्ही घ्या रे डोळे सुख ।

पहा विठोबाचें मुख ॥२॥

तुम्ही ऐका रे कान ।

माझ्या विठोबाचें गुण ॥३॥

ते सांगतात, स्वतःच्या वाचेला, की अगं वाणी घे, विठोबाचे नाव घे’’. इथे ते नाव गोड आहे, हे सांगायला ते विसरत नाहीत. कारण कदाचित गोड म्हटल्यावर वाणी त्याच्याकडे आकर्षित होईल आणि शब्दातूनही न आलेला त्याचा गोडवा अनुभवल्यानंतर ती तिथेच रमून जाईल. स्वतःलाही विसरून. तुकोबा आता वळतात आपल्या डोळ्यांकडे. डोळ्यांना सांगतात, “की अरे डोळ्यांनो तुम्ही सुख घ्या.’’ कसं? तर विठोबाच्या मुखाला पाहून. भारतातील इतर देवतांचा विचार केला तर त्यांच्यापेक्षा विठोबा अगदी साधासुधा, कुठलाही बडेजाव नसलेला, सोन्यामोत्याच्या श्रीमंतीने माखला नसलेला अगदी साधा सावळा इथल्या काळा सावळ्या माणसांचा देव आणि त्याच्याकडे पाहून मात्र प्रत्येकाला शांती लाभते. एक सुखद आश्वासन मिळतं. सर्व ताप शांत होतात. सुखाचे डोलावे आपसूक अनुभवास येतात. त्याला पाहायचं, तर संतांची दृष्टी हवी, नाही का? म्हणूनच तुकोबांना तो राजस सुकुमार मदनाचा पुतळा दिसतो! त्याचं तेजःपुंजाळ अगणित लावण्य संतांनी आपल्या अभंगांतून ठायीठायी मांडल आहेच. “ते त्याचं लावण्य दिठीच्या ओंजळीतून तुम्ही पिऊन घ्या, घेत रहा”, असं तुकोबा डोळ्यांना सांगतात. आता तुकोबांचा मोर्चा वळतो कानांकडे. ते त्यांना म्हणतात, ऐका रे.. माझ्या विठोबाचे गुण ऐका बरं.” सर्व वेदांनी देखील त्याचे गुण वर्णिताना हात टेकले असे जिथे ज्ञानोबा तुकाराम आणि इतर संत म्हणतात, तिथे पुन्हा पुन्हा त्याचे गुण गावेत ते का? याचं स्वाभाविक उत्तर म्हणजे 'प्रेम'! तो अनंत आहे, त्याचे गुण अनंत आहेत पण तरीही आपण मात्र प्रेमापोटी त्याचे गुण गावेत, मनापासून त्याचा गोडवा चाखावा आणि त्या अमृतपानात हरखून जावं हा आत्मानंद कीर्तनातून संतांनी लुटलेला आहे. हे सगळं म्हणूनच तर प्रेमाचं आहे, प्रेमाने केलेलं आणि सहजस्फूर्त आहे. 'गुण गाईन आवडी' या तुकोबांच्या शब्दांतला 'आवडी' हा शब्द हे प्रेमच तर सांगतो! म्हणूनच, हे कानांनो तुम्ही माझ्या विठ्ठलाचे गुण ऐका, ऐकत रहा, ऐकतच रहा..”

वाणी, डोळे, कान, अशा सगळ्या इंद्रियांना तुकोबा विठ्ठलाकडे नेत आहेत. त्याचं नाव घ्यायला, त्याचे गुण गायला आणि त्याचा मुख पाहायला सांगितलं आहे. असं असता तुकोबांना मनाचा विसर पडला तरच नवल. अर्थात तो पडलेला नाही. भगवद्गीतेत मनाला सहावं इंद्रिय असे म्हटलेल आहे आणि तेच तर पंचेंद्रियांना स्वाधीन ठेवत असतं! या मनाला आता तुकोबा म्हणतात -

मना तेथें धांव घेई ।

राहें विठोबाचे पायी ॥४॥

“तू जे एकाच वेळी दश-दिशांना धावत असतोस, ती धाव आता विठ्ठलाच्या पाशी घे, आणि त्याच्या चरणांशी रहा.” मनानं विठ्ठलाच्या पायी राहणं याचा एक सांकेतिक अर्थही वाटतो. तो असा, की विठ्ठल गेल्या अठ्ठावीस युगांपासून विटेवर समचरण उभा आहे. न डगमगता न डळमळता, हे किती विशेष! जेव्हा मन त्याच्या पायाशी राहील तेव्हा अर्थात मनाला देखील एक प्रसन्न स्थिरता येईल, चित्तवृत्ती स्थिर होतील. एका व्याख्येनुसार चित्तवृत्ती स्थिर होणं हाच तर योग असतो! तो साधला आहे, तोही विठ्ठल चरणी.. आणि विठ्ठलाची मूर्ती ही देखील मूर्तीशास्त्रानुसार योगमूर्तीच आहे! तुकोबांनी आता मनालादेखील सांगितलं आहे आणि आता सगळ्याच इंद्रियांनी मनासह त्यांचं ऐकून काय केलं बरं? त्याचं फलित काय झालं? हेच ते सानंद सांगतात -

रूपी गुंतले लोचन ।

पायी स्थिरावले मन ॥५॥

देहभाव हरपला ।

तुज पाहता विठ्ठला ॥६॥

बघता बघता डोळे विठूरूपात गुंतून गेले, रंगून गेले, आणि त्याच्या पायी मन स्थिरावलं आहे. इथे आलेला 'स्थिरावले' हा शब्द वरील अर्थाला पुष्टी देतो हा आनंदच! सर्व इंद्रिय आणि मन त्या विठूरुपात गुंतून गेले असताना तुकोबा म्हणतात अरे विठ्ठला, तुला पाहता पाहता देहभावच हरपून गेला बघ. 'त्या'च्या ठायी गुंतून जाऊन देहभावाच्या मोहक गाठी किती सहज सुटतात नाही? हा अनुभव घेत असताना किंवा घेतल्यावर तुकोबा आता स्वतःच्या जीवालाच उद्देशून म्हणतात,

तुका म्हणे जीवा ।

नको सोडूं या केशवा ॥७॥

अरे माझ्या जीवा या विठ्ठलाला आता सोडू नकोस बरं! आधी आपल्या मनाला आणि इंद्रियांना कुठे रमावं हे नेमकं सांगणं, मग त्यांनी ऐकणं आणि एकदा त्याच्या ठायी आनंद साधल्यावर पुन्हा एकदा आपल्या जीवाला म्हणजे एका अर्थी सगळ्या इंद्रियांनाच आता दुसरीकडे जाऊ नका हे सांगणं ही पायरी पायरीने केलेली कृती महत्त्वाची आहे. तशी आचरणीय सुद्धा. खरं तर तुकोबांनी हा अभंग लिहिला असावा तो आपल्यासारख्या सामान्यांसाठीच. त्यांना थोडीच गरज होती असं स्वतःच्या इंद्रियांना समजावण्याची? म्हणजे तुकोबाच एक अभंगात म्हणतात की शाळेतली गुरुजी पाटीवर लिहितात ते मुलांसाठी. त्यांना थोडीच सराव करायचा असतो? तसंच तुकोबांनी हे लिहिलं आहे ते आपल्यासाठी. त्यांना थोडीच त्याची गरज!? या अभंगाचा आनंद घेणं, आस्वाद घेणं हे सुखाचं आहेच. पण सोबतच त्याचं आचरण करत आपणही आपल्या इंद्रियांना ही विठ्ठल नावाची गोडी लावणं किंबहुना प्रत्येक चांगल्या गोष्टीकडे अशा पद्धतीने घेऊन जाण हिच या अभंगाची फलश्रुती ठरेल!

- पार्थ जोशी

Powered By Sangraha 9.0