नामाचा गजर....

26 Oct 2023 10:23:21

नामाचा गजर....

शब्दांच्या पलीकडे जाणारं, झळकणारं विट्ठलाचं माहात्म्य संतांनी मोठ्या कौतुकाने गायलं आहे. त्याची थोरवी सांगून किती खोलवर कृतज्ञ केलं आहे आपल्याला.... त्यांच्या अभंगांमधे असलेला साधेपणा सहज स्पर्शून जातो अंतरंगाला आणि त्यावर रेखाटलेली भक्तीची विलक्षण नक्षी नक्कीच भान हरपून टाकते. वर्णनातून जणू उभा राहतो पांडूरंग आपल्या डोळ्यांसमोर तेव्हा कदाचित संतांची कृपा उमटली असते शब्दांवर तशी आपल्यावरही.... संत नामदेव महाराज एका अभंगात म्हणतात,

नामाचा गजर गर्जे भीमातीर । महिमा साजे थोर तुज एका ॥१॥

भीमेच्या तीरावर नामाचा गजर चालू असणं ही किती एकरूप झालेली संकल्पना आहे. वारकरी उत्साहाने, भक्तीने आपल्या देवाचा, पांडूरंगाचा जयघोष करतात तो फक्त मंदिरात नाही, घरात नाही तर सबंध जीवनात.... त्याच्या नामघोशाने दुमदुमून गेलेल्या जीवनात कमी ते काय पडणार..... तसा हा जयघोष चालू असतो तो भीमातीरीही. हे दृश्य जेव्हा डोळ्यांसमोर उभं राहातं तेव्हा जणू तो भीमातीरच गर्जतो आहे असं वाटतं, कदाचित तोही मिसळत आहे आपला सूर नामाच्या उच्चारात, सार्थकाची साद घालत....

सिद्धि सिद्धि दासी अंगन झाडिती । उच्छिष्टें काढिती मुक्ती चारी ॥२॥

चारी वेद भाट होऊनि गर्जती । सन-कादिक गाती कीर्ति तुझी ॥३॥

सिद्धींची प्राप्ती होण्यासाठी किती कष्ट घेतात माणसं, अविरत, अचल राहतात ते आपल्या मार्गावर, असं असताना ईथे नामदेव महाराज म्हणतात की रिद्धी-सिद्धी ह्या स्वत: साक्षात् जिथे पांडूरंग आहे अशा पंढरीत अंगण झाडत आहेत, ज्या मुक्तींच्या प्राप्तीसाठी अवघं आयुष्य साधक निष्ठेने परिश्रम करतात अशा चारही मुक्ती तिथे उष्ट काढत आहेत. यावरुन पंढरीचं माहात्म्य किती अतुलनीय आहे हे सांगण्याची वेगळी गरज उरत नाही, अर्थात तिथे महत्व आहे ते भक्तिला, पांडुरंगावरच्या नि:सीम प्रेमाला.... वेदांना अद्वितीय महत्व आहे, वेदांना आपण प्रमाण मानतो, इतकं त्यांचं महत्व असताना असे हे वेद भाट होऊन गर्जना करतात, तो जयघोष आहे, ती प्रेमाने, आर्ततेने केलेली घोषणा आहे, म्हणून ती गर्जना आहे.... सनकादिकही गातात पांडूरंगाची किर्ती, इतका थोर आहे 'तो'. त्याच्या थोरवीचं वर्णन करणार ते कसं ? कदाचित म्हणूनच उदाहरणं दिली आहेत, ईथे ज्यांचं उदाहरण दिलं आहे त्यांना कमी लेखलं नसून पंढरीचं श्रेष्ठत्व वर्णिलेलं आहे, महात्म्य वर्णिलेलं आहे....

सुरवरांचे भार अंगणीं लोळती । चरणरज क्षिति शीव वंदी ॥४॥

नामा ह्मणे देव ऐसा हो कृपाळू । करि तो सांभाळू अनाथांचा ॥५॥

किती मोठी गोष्ट सांगीतली आहे पुढे.... अंगणात लोळत आहेत ते सुरवरांचे भार, पांडूरंगाचं श्रेष्ठत्व एवढं की माणसंच नाहीत तर सारे सुरवरही जणू त्याच्या दर्शनासाठी त्याच्या अंगणात आले आहेत. जिथे दर्शनासाठी देवही आले आहेत, पर्यायाने जिथे त्यांचं प्रसन्न अस्तित्व आहे अशा ठिकाणी अर्थात पंढरीत जाण्याचं भाग्य ते केवढं.... अशा या पांडुरंगाच्या चरणांचं वंदन केलं जातं ते महादेवाकडून.... अशा या पांडुरंगाच्या चरणांवर डोकं ठेवण्याचं भाग्य मिळावं ही 'त्या'चीच केवढी कृपा म्हणावी लागेल.... संत नामदेव महाराज म्हणतात की हा असा, इतका मोठा देव कृपाळू आहे, कृपा करणारा आहे जो नक्कीच अनाथांचा सांभाळ करतो, सांभाळ करतो ते जणू माऊलीच्या प्रेमाने....

- अनीश जोशी.

Powered By Sangraha 9.0