दुःख कुरुवाळत बसायला आपल्याला वेळ नाही गड्या!

25 Oct 2023 10:14:47

 दुःख कुरुवाळत बसायला आपल्याला वेळ नाही गड्या!

त्या आपणच श्रमदान केलेल्या दवाखान्यात काहीशी मुलं आली आहेत बघ,

समजुन घ्यायला बहुतेक; आपले कष्ट, आपली दुःख..

त्यांची जरा इकडे नजर वळली तर कोणी न सांगताच कळेल त्यांना सगळं काही...

ह्या कपड्यांच्या ढीगामधला एक एक कपडा एका एका संघर्षाची कथा सांगेल...

हेच संघर्ष घासता घासता माझी मोडलेली कंबर इथल्या वास्तवाची कथा सांगेल...

आपली देहबोली, नजर आपल्या खरेपणाची आणि या निसर्गाशी आपल्या असलेल्या घरोब्याची कथा सांगेल...

कारण हल्ली प्रसंग अनुभवणाऱ्या पेक्षाही जास्ती महत्त्व प्रसंग सांगणाऱ्याला दिलं जातं!

बोलता बोलता कपडे घासून झाले बघ,

आता हे आपटायला घेतले तर उगाच आवाज चौफेर फिरेल...

आपट म्हणतोस ?

आपल्यासाठी न थांबणाऱ्या जगासाठी आपण का थांबायचं?

बरोबर आहे म्हणा! निदान या कपडे आपटण्याच्या आवाजाने तरी आपल्याकडे नजर जाईल त्यांची!

एरवी कायम ही चार झाडं आणि ही नदीच तर ऐकते आपल्या व्यथा...

आज त्या मुलांना सुद्धा ऐकवू लांबूनच...

जरा जोरातच आपटते बरं का कपडे!

आवाजात ताकद असल्याशिवाय कोणी लक्ष देत नाही आजकाल.

तू दूर हो बाबा पाण्यापासून आधी,

घरात पाणी नाही या पाठी माणसाचीच चूक असताना उगीच

पाण्याने घात केला असं म्हणत या निसर्गालाच अपराधी ठरवतो आपण!

हे तर होईलच आणि प्रसंग सांगणाऱ्याला आणखी एक प्रसंग मिळेल सांगायला...

त्या दवाखान्यात आपल्यावर उपचार होत असेल तरी आज अचानक आलेल्या दुखण्यावर/काळावर सहा दिवसांनी उपचार मिळाले तरी त्याचा फार उपयोग होत नाही, आणि तातडीने तुला खोल पाण्यातून बाहेर काढून चार मैल चालायला मी काही प्रसंग सांगणाऱ्यातली नाही.

तू बाजूला हो चल आधी...

हं! हे झाले कपडे आपटून-

फार कोणाचं लक्ष गेलेलं दिसत नाही रे,

निघालेच की सगळे परतीच्या प्रवासाला त्यांच्या त्यांच्या.

आवाज पोहचलाच नाही बहुतेक.

असो!

चल निघूया..

चुलीवर आधण ठेवून आले होते,

पारुला चारा घालायचाय,

दुःख कुरुवाळत बसायला आपल्याला वेळ नाही गड्या!

- मैत्रेयी

Powered By Sangraha 9.0