तुकोबांचे पसायदान!

22 Oct 2023 10:00:00

तुकोबांचे पसायदान!

पसायदान म्हटलं की मराठी मनामनाला लगेच आठवतात ज्ञानेश्वर माऊली. पण भागवत धर्माचा शिखर अर्थात संत तुकोबारायांचं पसायदानही इतकंच गोड, अर्थमधुर आणि कळवळ्याचं आहे. तुकोबांचं कुठलं पसायदान? या स्वाभाविक प्रश्नाला उत्तर म्हणजे त्यांचा सर्वश्रुत अभंग - 'हेचि दान देगा देवा'

श्री विठ्ठलाकडे तुकोबा दान मागत आहेत. कुठलं बरं? तसा विचार केला तर कोणत्याही मंदिरात कुठल्याही देवापुढे हात जोडून आणि खरंतर मंदिरात न जाताही कुठूनही आपण देवाकडे सतत दान मागत असतोच! मग ते एखादी मनोकामना पूर्ण होण्याचं असेल, घर असेल, पैसा, जमीन, नाती कशाचंही असेल.. असं दान मागणं, मागत राहणं हा मानवी स्वभावच. पण तरीही जेव्हा हे दान माऊली किंवा तुकोबा किंवा अन्य संत मागतात तेव्हा त्यात आपोआप एक प्रासादिकता येते. मग ते दान केवळ एका व्यक्ती पुरता संप्रदायापुरतं उरत नाही एका समाजापुरतं, देशापुरतंही नाही.. तर ते विश्वात्मक असतं. विश्वात्मकाकडे मागितलेलं अखिल विश्वासाठीचं दान. म्हणून हे गाणं प्रसादिक होतं, त्याचं पसायदान होतं!

हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा ।।

जेव्हा ईश्वराकडे आपण एखादी गोष्ट मागतो तेव्हाच ती गोष्ट प्राप्त करून आपण सुखावून जातो आणि पर्यायाने त्या सुखावस्थेत ईश्वरालाही विसरतो. पण तुकोबा सुख दुःख या दोन्ही पलीकडे जाऊन ईश्वराचं स्मरण मागत आहेत. त्याचा विसर मला क्षणभरही न पडावा ही त्यांची तहान. त्याची माधुरी अखंड अनुभवत राहावी हीच भूक! क्षणभर वाटतं की जगताना कितीतरी प्रलोभनांमध्ये किंवा बाकी साध्या सुध्या गोष्टी करताना देखील क्षणभरही ईश्वरचरणांचा विसर पडू नये? ही अतिशयोक्ती नाही का? पण हा झाला आपल्या सामान्य पातळीवरून विचार, संतत्वाच्या स्तरावरून नव्हे! 'विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला' हे केवळ बोलण्या लिहिण्यासाठी नव्हे तर ही संतांची प्रत्यक्ष अनुभूती. तेव्हा कोणतीही गोष्ट करताना अगदी सामान्यातलं सामान्य काम करताना देखील त्यातला विठ्ठल दिसणारच ना! त्यामुळे त्याच्या सर्वत्र असण्याचा अनुभव अखंड येत राहणं म्हणजेच त्याचा विसर न होणं इतका सहज अन्वय लावता येतो. सहज पण साध्य करण्यासाठी आपल्याला तितकाच अवघड वाटणारा.. त्यामुळे त्याचा विसर व्हायचा नसेल तर सर्वत्र त्याची अनुभूती अखंड यायला हवी हेही खरंच.

गुण गाईन आवडी हेचि माझी सर्व जोडी ।।

स्मरण अखंड राहण्याची इतकी याचना केल्यानंतर हे स्मरण कसं बरं होणार? कसं केलं जाणार? तर तुकोबा म्हणतात की मी तुझी गोडी आवडीने गात राहील अर्थात यामध्ये काही साध्य करण्याचा भाव नाही, की चारणस्तुतीचा भावही नाही. हे सांगण्यासाठी 'आवडी' हा एक शब्दही पुरेसा आहे. विठ्ठल हा सर्वच संतांच्या कौतुकाचा विषय आहे, सुखाचा आरव आहे. त्यामुळे त्याचं कौतुक आहे. असेच सहजस्फूर्त त्याचे गुण आवडीने गात राहणं ही तुकोबांची सर्व जोडी आहे. इथे 'जोडी' याचा अर्थ 'प्राप्ती'. त्याचे गुण गाऊन जो आनंद मिळतो तीच त्यांची अवघी प्राप्ती. जोडी याचा अर्थ 'जोडून घेणे' असा घेतला तरीही अर्थाची नवनीत माधुरीच आपल्या हाती येते. आपण रोज जगताना कितीतरी गोष्टी आपल्या सोबत जोडून घेत असतो. मग ती नात्यांची ऊब असेल, सुखाची साधनं असतील, दाखवण्यासाठीच्या चीजवस्तू असतील, किंवा आणखी काही. हे जोडून घेण्याचे आपले प्रयास सतत सुरूच असतात. कारण ते स्वतःला जोडून स्वतःचा स्तर वाढवणे यातच तर आपण कळत नकळतपणे सुख मानतो! पण तुकोबा जोडून घेत आहेत तो फक्त विठ्ठल. विठ्ठलाला आपल्याशी जोडून घेण हिच त्यांची श्रीमंतीची व्याख्या असेल तरी नवल वाटू नये. त्यांचे श्रीमंतीची व्याख्या धन किंवा संपत्तीशी निगडित नाही. अध्यात्ममार्गावर ज्या मुक्तीसाठी उपासना केली जाते, जी साधण्यासाठी नाना प्रयास केली जातात ती देखील त्यांना नको आहे! का बरं? काय हवंय मग त्यांना? हेच पुढे सांगितलं आहे -

नलगे मुक्ति धन संपदा। संतसंग देई सदा ।।

तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी ।।

तुकोबांना हवा आहे तो सत्संग. संतांचा सज्जनांचा संग. तुकोबांनी आपल्या अभंगांतून कितीतरी वेळा मुक्ती नको असं म्हटलेलं आहे. का हवी नसावी मुक्ती? तुकोबांचं स्पष्टीकरण असं, की वैकुंठप्राप्ती केली तरी तिथे जाऊन शांत बसायचं.. यापेक्षा इथे या पांडुरंगासमोर कीर्तनरंगी रंगून जाण्यात जास्त सुख आहे. त्यामुळे वैकुंठ नको. आणि मुक्ती मिळाली तर पुन्हा जन्मच मिळणार नाही! मग पुन्हा या पांडुरंगाची सेवा कशी करणार? कीर्तनाच्या रंगी रंगून कसे जाणार? म्हणून मुक्ती ही नकोच! मग काय हवंय? हवा तो जन्म, गर्भवास. गर्भावसाकडे अनेकदा नकारात्मकतेने पाहिलं जात असलं तरीही भक्ती साधण्यासाठी तो हवाच. पुन्हा पुन्हा हवाच. म्हणून तुकोबा म्हणतात की आम्हाला गर्भवासी घाल आणि पुन्हा एकदा सातत्याने ही सेवा करण्याची संधी दे. भारतीय परंपरेत मुक्ती हा चतुर्थ आणि सर्वश्रेष्ठ पुरुषार्थ मानला गेला असता तरीही माऊलींनी भक्तीला पंचम पुरुषार्थ म्हंटलेलं आहे. अर्थातच हा पुरुषार्थ मुक्तीपेक्षाही वरचढ ठरतो. तुकोबा तर एके ठिकाणी म्हणतात की मुक्ती आत्म्याची असते, पण आत्मा ब्रह्मच असतो अशीच शिकवण आहे. ब्रम्ह असलेला आत्मा पुन्हा ब्रह्म होणं यात फार वेगळं काय? पण कीर्तनाची कमाल अशी ही देह जो ब्रम्ह नाही तोही ब्रम्ह होऊन जातो या कीर्तनाच्या माध्यमातून!! म्हणून ही भक्ती सर्वश्रेष्ठ. 'ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी' हा तुकोबांचा अनुभवनिर्वाळा.

हे पसायदान तुकोबा वैयक्तिक मागत आहेतच, पण त्यासोबत सर्वांसाठी देखील ते तितकंच आहे हे महत्त्वाचं. वडील जे करतात त्यालाच धर्म असं नाव ठेवून इतर अनेक लोक ते आचरतात असंमाऊलींनी सांगितलं आहे. तेव्हा तुकोबांनी हे पसायदान मागणं हे सर्वांनाच ते मागण्यासाठी प्रेरक ठरणारं आहे. तुकोबांचा विठ्ठलावर अधिकार आहे. प्रेमाचा, भक्तीचा अधिकार आहे. म्हणूनच तुकोबा पसायदान मागतात पण तेही एका अर्थाने अधिकाराने. अट्टहासाने म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण सुरुवातच होते 'हेचि दान देगा देवा' यातील 'चि' खूप बोलका आणि महत्त्वाचा आहे. विठ्ठलालाही ते पसायदान अगदी पुढच्या क्षणाला नव्हे त्याच क्षणाला देऊ लावणारा आहे.

काय मागावं मग हे तुकोबा सांगून गेले आहेतच. आपण ते मागण्यासाठी कचरायला नको, इतकंच!

- पार्थ जोशी

Powered By Sangraha 9.0