हिमाचलमध्ये पहाडी प्रदेश जास्त असल्याने भाज्या कमी मिळतात त्यामुळे जसा डाळींचा वापर जास्त होतो, तसाच मांसाहारही आहे. बाकी राज्यांपेक्षा प्रमाण कमी असले तरी तिथल्याही काही मांसाहारी पाककृती प्रसिद्ध आहेत. भाज्यांच्या पाककृतीमध्ये दही आणि ताक वापरतात, तसेच मांसाहारी पदार्थांमध्येही वापरतात.
हिमाचलच्या उत्तर भागात मांसाहार जास्त आहे. आता तिथल्या प्रसिद्ध डिशेस बघू या.
पहाडी चिकन/मटन - पहाडी टिक्का खाल्ला आहे कधी? छान मसालेदार असतो. पहाडी चिकनमध्ये मसाले थोडे वेगळे असतात. प्रमाण वेगळे असल्याने चव वेगळी येते. यात दह्याची ग्रेव्ही असते. पंजाबी ग्रेव्हीसारखी कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून घेतली की ती दह्यासोबत शिजवली जाते. चिकन किंवा मटनचे तेलात थोडे क्रिस्पी परतलेले तुकडे टाकून परत शिजवतात आणि सर्व्ह करतात. दही वापरताना परत तापमान मेंटेन करावे लागते. आंबट-तिखट असे मीट वेगळ्या चवीचे असते.
चिकन अनारदाना : याला चिकन खट्टा असंही म्हणतात. भेळेत आमचूर किंवा दाबेलीत अनारदाने ठिक आहेत, पण चिकनमध्ये? असा प्रश्न पडला असेल तर तो हा पदार्थ खाऊनच सोडवता येऊ शकतो. यात मटनही बनवतात. कोरडी आमचूर पावडर वापरल्यामुळे छान चव येते. गोड बटरचिकन असू शकते तर आमचूर असलेले चिकन का नाही?
छा गोश्त : हा अजून एक ताक/दह्यात बनवलेला प्रकार. छा म्हणजे छाछ. फोडणीत ताक, किंचित बेसन टाकून त्यांची ग्रेव्ही बनवतात आणि चिकन/मटन टाकून शिजवतात. बऱ्याचदा मीट काळे मिरे, मीठ यात आधीच शिजवून घेतलेले असते. मोहरीच्या तेलाची फोडणी असलेला हा पदार्थ चंबा जिल्ह्यात फेमस आहे.
ट्रॅाट फिश : पहाडी प्रदेशात तसे मासे फार मिळत नाही, पण हा पदार्थ प्रसिद्ध आहे. कुल्लू मनालीची खासियत असलेला हा पदार्थ कमीतकमी तेल, मसाले वापरून बनवतात. हेल्दी मांसाहारी पदार्थ म्हणता येईल.
चंबा फिश : चंबा जिल्ह्यात बनवल्या जाणाऱ्या या पदार्थात माशाला आधी मसाल्यात मॅरिनेट करतात. बेसनात घोळवून तेलात कुरकुरीत तळतात. स्टार्टर म्हणून ही डिश खाता येईल.
हिमाचली तवा मुर्ग : यात चिकनला दही, क्रिम आणि मसाल्यात मॅरिनेट करतात. फ्रेश भाजून बारीक केलेले गरम मसाले वापरले जातात. तव्यावर परतून, कोथिंबीर वगैरे गार्निश करून सर्व्ह केले जाते.
मसाले तर भारतभर सारखेच असतात, पण त्याच्या मिक्सचे प्रमाण वेगळे असते. पहाडी पदार्थांमध्येही हेच असते. आता यातील सगळे पारंपरिक पदार्थ तिकडे जाऊन खाण्यातच मजा आहे पण आपल्या मेनूकार्डवरही यायला हवीत ना. मांसाहारी मेनू मी पाहत नाही, त्यामुळे मला माहीत नाही, पण त्यातही पनीर अनारदाना असा पदार्थ मी तरी खाल्ला नाही! पहाडी पदार्थातील मसालेही बाजारात मिळत नाहीत. पनीर/ चिकन बटर मसाल्याचा वेगळा मसाला मिळतो तसे पहाडी मसालेही मिळायला हवे ना! तोपर्यंत घरीच दह्याची ग्रेव्ही बनवून हे पदार्थ बनवून पाहा. अर्थात घरच्यांची बोलणी खायची नसतील तर कमी प्रमाण घ्यावे हे काही पहाड चढण्याइतके अवघड नक्कीच नाही!
-सावनी