छोटे सरकार - भाग ४

01 Sep 2022 10:09:25

chhote sarkar
 

 

छोटे सरकार..! भाग ४

भर उन्हात अंग न्हाऊन निघाले होते, धरणपाळेवरून कधी एकदा धरणाच्या किनाऱ्यावर जातो आणि एकदाचे पाण्यात डुबकी मारतो असे तिघांना झाले होते.

बराचवेळ सलम्याच्या रेडूची गाणे कम, खरखर जास्ती ऐकल्यावर सलम्याने शेल संपून जातील अन् बा रागवेल म्हणून रेडू बंद करून उपरण्यात बांधून गळ्यात अटकवून घेतला. आम्ही धरणपाळेवरून चालत होतो. बकऱ्या आमच्यापुढे पुढे हिरवं गवत,छोट्या बाभळीचा पाला खात चालली होती.

अनवाणी पायांनी चालताना कधीतरी पायाला दगुड रुतत होते, तर कधी गरम झालेली लाल माती पायाला जाळवत होती. मी मातीला, खडकाला दूर करत गवताच्या रानातून चालत, बाभळीचा काटा टोचणार नाही याची सुद्धा काळजी घेत होतो. अखेरला धरणाच्या किनाऱ्यावर येऊन आम्ही विसावलो. जरावेळ पाठ लांब करून दिल्यावर, (हनम्याने मला नजरेने खुणावत, तो बोलता झाला)

“छोटे सरकार चलतुया का पाण्यामा पोहाया?’’

मी नकारार्थी मान हलवत, सलम्याला आवाज दिला, “ओ सल्म्याशेठ, रेडुचे मालक पोहया जाता का वं?’’ त्याने होकार दिला. गळ्यात घातलेला रेडू, अंगावरची कापडं दोघांनी माझ्याजवळ खडकावर आणून ठेवली. त्यांनी पाण्यात लांबची मासोळीगत उडी मारली आणि पाण्याच्या आत बरेच दूरवर जाऊन पुन्हा वर येत मला आवाज दिला, “ऊss छोटे सरकार!’’ म्या खडकावर बसून त्यांची मज्जा पहात होतो. धरणाच्या किनाऱ्यावर उगलेले हिरवे गवत बकऱ्या चरू लागल्या होत्या, काही बकऱ्या खडकाळ रानात फिरत चरत होत्या. मी दोन्हीकडे लक्ष देत दोघांची मज्जा बघत होतो, अधून-मधून महामार्गावर दिसणाऱ्या मोठमोठ्या गाड्या लक्ष वेधून घेत असायच्या, पण या गाड्यांची कधी ओळख नसल्याने त्यांच्या कधी निरखून बघायचो नाही. दोघे पोहत असताना खूप वेळा वाटायचं सलम्याचा उपरण्यातला रेडू काढून काहीतरी ऐकत बसावं पण.. मन याला तयार नव्हतं. कारण..
खोटं वागणं कधी जमायचं नाही. मग मनातच चालू असलेल्या विचारांच्या खाईत मी स्वताला झोकून द्यायचो. खऱ्या चेहऱ्यावर हास्याचा खोटा आव आणत सलम्या अन् हनम्याला अधून मधून हात उंचावत राहायचो
, कधीतरी तळपायावर थंड पाण्याचा हात लावायचो जेणेकरून पायाला गारवा जाणवायचा. एक-दीड तास पोहून झाल्यावर दोघेही पाण्यातून वर येऊन, सदऱ्याला टावेलसारखे गुंडाळून, चड्डी पिळून घेत, तीच पुन्हा घालून घेत असायचे. बराचवेळ वाढलेल्या केसांतून हात फिरवत त्यांना वाळविण्यासाठी खडकावर बसून राहत असायचे, मी मात्र माझ्याच कल्पनेतल्या विश्वात रममान असायचो. दोघांना हे बऱ्याचवेळ लक्षात येत असंत, पण दोघांनाही मी जीवापाड आवडत असल्यामुळे कधीही ती शब्दाने जुने विषय ते काढत नसायचे. सलम्या, हनम्या अन् मी तिघेही लहानग्या वयातच शहाणपण आलेली पोरं आहोत असं सारं गाव आम्हाला म्हणायचं...

ते काहून कळत नव्हत,पण अलीकडे माझं शांत बसून माझ्या विश्वात रमऩ हे हनम्या अन् सलम्याऩ बऱ्याचदा टिपलं होतं अन् कदाचित हे वेळे आदी आलेलं आमच्यातले शहाणपण होतं, असे तिघांना वाटू लागले होते. त्यात मी भावनाशील असावा म्हणून कींवा अपुरी माणसाची ओळख, मनाची ओळख म्हणून ते आम्हाला उमगत नसायचं. दुपारची दोन वाजून गेले होते, बराचवेळ धरणात पोहून झाल्यावर दोघांना आता कडकडीत भूक लागली होती. मग आम्ही सगळ्या बक्र्यांचा अंदाज घेऊन धरणाजवळ असलेल्या उंच टेकडीवर छोट्याश्या खोकल्या आईच्या देऊळामध्ये बाहेर ओट्यावर दुपारची भाकरी खायाला बसलो होतो. सलम्याने उपरण्यातला रेडू काढून पुन्हा चालू करून, देवळाच्या वरती असलेल्या गजाला आटकवुन दिला होता. उंचावर असल्यामुळे आता खरखर ऐकू येत नव्हती अन् कुठलीतरी कथा रेडूवर ऐकू येत होती, ती आम्ही ऐकत बसलो होतो.

महामार्गावरील वाहतूक करणाऱ्या मालगाड्या आता मला स्पष्ट दिसू लागल्या होत्या. भर दुपारचे रणरणते ऊन, उंचावर खोकल्या आईच्या देऊळात येऊन बसल्यामुळे काही प्रमाणात का होईना गारवा जाणवू लागला होता. सोबतीला कधी नव्हे तो रेडु ऐकायला येत होता, रेडूमध्ये आमच्या सारख्याच उनाड मुलांची "शाळा" ही कथा ऐकू येत होती. तिघेही मन लावून ती ऐकत होतो. महामार्गावरील वाहनाच्या हरीणीचा आवाज कानावर अधून-मधून पडत होता. मोठमोठाल्या गाड्या लक्ष वेधून घेत होत्या.

मनात त्या मोठाल्या गाड्याबद्दल अनेक प्रश्न येत होते. रात्रंदिवस होणारा त्यांचा प्रवास. गावात जसे टायर दामटायला आवडायचे तसेच इथे आले की, तासंतास त्या गाड्याबद्दल विचार करायला त्यांना बघायला आवडायचे लहानपणी मोठं झालं की, ड्राइव्हर व्हायचे हे स्वप्न आम्ही तिघेही उरावर घेऊन मिरवत होतो. कारण गाड्यांचा आम्हाला मोक्कार नाद होता. त्यामुळे तिघेही कथा ऐकत गाड्या बघत बसलो होतो. ही माझी, ती माझी, ती सलम्याची, ती हनम्याची अश्या आमच्या गप्पा चालू होत्या.

सोबतीला दुपारची भाकरही पोटात चालली होती,आज म्या आईनं दिलेल्या मुगाच्या दाळीचं मेदगं,हिरव्या मिरच्याचा ठेचा अन् भाकर फडक्यात बांधून आणली होती. सलम्यानं टंबट्याची चटणी आणि पोळी तर हनम्यानं कुरडईचा भुगा भाकरी, लोणचे आणले होते. तिघेही भाकरीवर ताव मारीत खात बसली होती. बकऱ्या बाजूला असलेल्या काळ्या खडकात बसून रवंथ करत होती, तर काही बाभळीच्या झाडाची कवळी डगळे खात बसली होती. खूप दिवस झाले खोकल्याआईच्या देऊळात कुणी आले नाही हे लक्षात येतं होते. देवीच्या पायथ्याला ओल्या नारळाच्या खोबऱ्याचा काळा पडलेला प्रसाद पडलेला होता. दिव्यातील वात उंदराने मंदिराच्या ओट्यावर आणून टाकली होती अन् मंदिराच्या समोर असलेल्या मुंज्यावर खूप दिवस झाला कुणी शेंदूर वाहिला नव्हता, हे साचलेल्या धुळीमुळं दिसून येत होते. लवकरच हे दिवस निघून जावोत. ही जेवता-जेवता मनोमन खोकल्या आईला मी प्रार्थना करत खात बसलो होतो.

(हनम्याने मला मांडीवर हात ठेवत खुणावले अन् बोलू लागला...)

“ओ छोटे सरकार.’’

“बोलकी, हनम्या भावा काय म्हूनु राहीलास्सा?’’

“आरे ऊ छोटे सरकार.’’

“म्या कालच्याला तुला संच्याला म्हणलू हूतो, मोहळ हुळाया जायचं हायसा आज.’’

(मी बोलता झालो)

“हाव ठाव आहे रे हनम्या भाई.”

“पर भाई सलम्या तूच सांग, आत्ता तीन वाजलया अजून घटकाभर आपून मोहरं जात नाय मग, आजच्यानं कसं होईल रे भाई?

(माझ ऐकत, सलम्या हात धुवत बोलू लागला.)

“भाई आजके दीन जाने दो, कल कु सुब्बा-सुब्बा उसका काम तमाम करत डालेंगे साल्ला!

आज के दीन उसको बक्ष दो!”

“क्यू छोटे सरकार क्या लगता?

(मी हसत हसत, त्याला प्रतिउत्तर देत म्हणालो)

“जो हुकूम काया. आप जो कहेंगे हम सूनेंगे.”

“कल सुब्बा सुब्बा निकाल लेंगे!”

(हनम्या आमच्याकडे बघत म्हणु लागला)

“बर बर भाईलोग, उद्याला सकाळी फिक्स मग”

“भाई आवरा आता आजून खपुड्यायले पाला तोडायचा हायसा!

आम्ही हात धुवत आळशी माणसासारखे मंदिराला पाठ टेकून गोष्ट ऐकत बसलो होतो. दुपारचे ऊन कमी झाले होते, सांजेकडे सूर्य कलू लागला होता हवेतही आता गारवा निर्माण झाला होता. जरावेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारत आम्ही उठलो.

बकऱ्या धरणपाळेच्या दिशेनं हुस्कीत हुस्कीत खालच्या दिशेनं आणू लागलो. सलम्या रेडूला सावरत खाली उतरू लागला होता, म्या बकर्यांनाणा शीळ फुंकीत वळत-वळत खाली आणू लागलो होतो, हनम्या पळत पळत जाऊन धरणपाळेवर असलेल्या खडकावर बसून आम्हाला हात उंचावत बोलवत होता.

#क्रमशः

लेखक-भारत लक्ष्मण सोनवणे.

औरंगाबाद.


 
Powered By Sangraha 9.0