पत्र लिहायला घेतलं खरं, पण आज कसं व्यक्त व्हावं कळेना. तुझ्याबद्दल इतक्या संमिश्र भावना आहेत मनात की, कुठून सुरुवात करावी हेच कळेनासं झालंय बघ. पण मला खात्री आहे, मी कसंही मोडकं तोडकं लिहिलं तरी तू ते नक्कीच समजून घेशील. आईला कसं आपल्या मुलाचे बोबडे बोल, त्याच्या कृतीमागचा अर्थ पटकन समजतो, तसंच तू ही समजून घेशील मला…मैयाच आहेस ना तू!
तुझं पहिलं दर्शन मी कधीच विसरणार नाही. ट्रेनमधून प्रवास करताना सकाळी सकाळी तू समोर आलीस आणि मनातून कायमची माझी सोबती झालीस. केवढं ते तुझं विशाल पात्र! बापरे! खरं सांगायचं तर पहिल्यांदा थोडी भीतीच वाटली होती. कारण तुझ्या अंगावरुन चाललेला ट्रेनमधला प्रवास. तिथं काही रुळांना कठडे वगैरे प्रकार नाहीत ना रस्त्यांसारखे. खिडकीतून खाली पाहिल्यावर अधांतरी चाललोय की काय वाटावं असं दृश्य. त्यात तुझं इतकं मोठं रुप. पसाराच एवढा तुझा की, त्यावरचा प्रवास संपेनाही पटकन. ही भीती मात्र त्यामानाने पटकन पळून गेली. नंतर लांबवर कुठेही दृष्टी टाकली तरी तिथं तुझं अस्तित्व पाहून एकदम शांत झाले…डोळे आणि मनदेखील. तेव्हापासून तू माझीही आई झालीस. तुझं नाव जरी कधी कुठं निघालं तरी एकदम नतमस्तक व्हायला होतं. माहेरी जसं सारखं सारखं जायला मिळत नाही तसं तुझं दर्शनही सारखं घेता येणार नाही माहितेय. पण कधी कधी काहीही विषय नसताना अचानकच तुझी खूप आठवण येते आणि डोळ्यातून पाणी कधी वहायला लागतं हे कळतही नाही. आत्ताही हे सगळं लिहिताना पुढची अक्षरं पुसट, अंधुकच झाली आहेत. हे असं मला होतंय असा उल्लेख केला ना कोणापाशी, तर ते हसतात मला. हसले तर हसू दे, पण माझी ओढ काही कमी होणार नाही कधी.
मला तुझी परिक्रमा करायची बऱ्याचदा फार इच्छा होते. पण परत वाटायला लागतं जमेल का ते आपल्याला? त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे सगळा व्याप मागे तसाच टाकून आत्तातरी बाहेर पडणं शक्य होणार नाही. दुसरं काही व्यवधान नसताना केलेली परिक्रमा जास्त आनंदाची होईल असं वाटतंय मला. तुझ्यापाशी जास्तीतजास्त काळ राहता यावं हाच एक उद्देश आहे माझा. बाकी पुण्य, अध्यात्म वगैरे गोष्टी काही मनात नाहीत. कोणी तुझ्या भेटीला गेल्याचं कळल्यावर मला जमत नाही म्हणून कधीतरी थोडं वाईट वाटतं. अशावेळी मी परिक्रमेवर लिहिलेली पुस्तकं वाचत बसते आणि त्यांच्याबरोबरीने मानस परिक्रमा करते. आहाहा! मनाचं शांतवन! पण मला पुस्तकातले ते चमत्कार वगैरे गोष्टींबद्दल फार वाचायला आवडत नाही. म्हणजे मी कोणावरही अविश्वास दाखवत नाहीये बरं का. येत असतील असे काही अनुभव. तुझ्यावर आणि तुझ्या कोणत्या ना कोणत्या रुपात मदत करण्याचा स्वभावावर तर माझा पूर्ण विश्वास आहे. सगळ्यांची प्रेमाने काळजी घेणारी आईच आहेस तू तर! पण सारखं त्या चमत्कारांचं वर्णन नको वाटतं ना. तुझ्या आसपास, तुझ्या भोवतीने फिरताना इतर कितीतरी सुंदर सुंदर गोष्टी असणारच…तू, तुझ्या भोवतीचा निसर्ग, खडतर वाट, तुझ्या आसपासची माणसं यांचं वर्णन वाचताना कसं आपणही त्या वाटेवरुन परिक्रमा करतोय असं वाटून तेवढंच समाधान मिळतं. मला तुझ्याभोवतीचे ते शूलपाणीचे जंगल बघायची खूप इच्छा होती. पण आता काय ते शक्य होणार नाही. धरण झालं आणि तो परिसर विस्कटून गेलाय ना? जंगलातली किती संपत्ती पाण्याखाली गेली असेल? फार वाईट वाटतं गं असं काही ऐकलं की. तिथं राहणाऱ्या लोकांचं तरी काय. ज्याच्या अंगाखांद्यावर वाढलो, खेळलो त्या प्रदेशाला कायमचं सोडून जाणं काय सोप्पं आहे का? आपल्या घरातून थोड्या दिवसांसाठीही कुठं बाहेर जायला नको वाटतं तर तिथं घर कायम सोडावं लागणाऱ्यांची काय अवस्था होत असेल? निर्जीव असल्या तरी आपल्या जीवाच्या असतात त्या भिंती, दारं-खिडक्या. नको…नको…विषयच बदलते मी आता. विचार जरी मनात आले तरी मन काहूरतं.
मला एक सांग ना...तुझ्या काठावर मोठमोठे वड, पिंपळ, मोह वगैरे वृक्ष आहेत ना? मी एका पुस्तकात वर्णन वाचलं होतं. त्या झाडांवर वेगवेगळ्या असंख्य पक्ष्यांचा मेळा भरतो म्हणे. ते सौंदर्य आहे का गं अजून? मला ना माणसांच्या गर्दीपेक्षा ही अशी गर्दी फार लोभसवाणी वाटते. मोहाचं झाड असतंच भारी सुंदर. कोणालाही मोहात पाडेल असं आणि ते शतधारा ठिकाण? ते ही बघायची फार इच्छा आहे बघ. अर्थात तुझ्या काठावरचं सगळं बघण्यासारखंच असणार. पण तरीही, इथल्या तुझ्या असंख्य धारा डोळ्यात साठवायच्या आहेत. त्या पुस्तकात तुझ्याविषयी एक दंतकथा वाचली मी. मेकल पर्वतातून उगम पावतेस म्हणून मेकलसुता हे ही तुझं नाव. त्यात तुला भारी अवखळ म्हटलंय. खुदकन् हसूच आलं मला. आपल्या अवखळ लेकीची मेकल राजाला काळजी वाटली म्हणून त्यानं तुझ्या भावांना. विंध्य आणि सातपुडा यांना तू मोठी होइपर्यंत तुझी साथ देण्याची ताकीद दिली म्हणे. तुझ्या दोन्ही बाजूंना हे पर्वत नसते तर काय झालं असतं गं? पटकन ब्रम्हपुत्रा आठवून गेली.
बघ लिहिता लिहिता किती लिहीत गेले. अजूनही साठलेलं बरंच बाकी आहे. पण आता थांबते गं इथे. प्रत्यक्ष तर भेटूयाच, पण तोवर असंच पुस्तकांमधून मी तुझी भेट घेत राहेन.
तुझ्या भेटीसाठी व्याकुळ….
जस्मिन जोगळेकर.