काल सांच्याला पाऊस येऊन गेल्यामुळे घरावरली कौलं ओली झाली होती. ती बरीच दिवस झाले बदलली नसल्यामुळे,त्यातून पाणी लाकडाच्या वाश्यामध्ये रीचु लागले होते. रीचू लागलेल्या पाण्यामुळे लाकडाचा आंबट, कोरसर हवाहवासा सुवास येऊ लागला होता, सादळलेल्या भिंतींना मातीने पोचरल्यामुळे घराच्या भिंतींचा कोरट सुगंध येत होता.
रात्र ढळु लागली, मायनं जेवणाची भांडी परसदारच्या अंगणात आणुन चुल्हीतल्या राखुंडीने घासुन घेतली. चुलीला मातीचा पोच्चारा दिला,तिचा सभोवताली रांगोळी काढली, तोवर म्या अंथरुन टाकून झोपी गेलो होतो. दिवसभर बकर्यामागे फीरुन पाय फटफट करत होते मायनं अंगावर पांगरुन टाकलं अन् माय, शांताक्का, पारावरली लक्ष्मीआय, हनम्याची माय सगुणा काकू हरीपाठाला परसदारच्या अंगणात येऊन बसलित.
मी अजुनही रखमाजीच्या बोलण्याचा विचार करत होतो. झोप काही केल्या येत नव्हती. तो बोलत होता ते खरं होतं. पुढं उभं आयुष्य बकर्याच्या सहारं जगणं शक्य नव्हतं मला. शिकायला हवं होतं, पण शाळा शिकायला पैक लागत्यात, ते कुठुन आणायचं हा प्रश्न सुटत नव्हता.
घडीभरच्यानं माय हरीपाठ संपवून आली, मायनं दरवाज्याला कडी घातली अन् मिणमिणनारी चिमणी विझवुन माय खाटेवर येऊन झोपी गेली. चिमणीच्या विझण्याबरोबर डोळ्यांसमोर अंधार झाला, थकलेले डोळे आपोआप झपाझप लागू लागले कुस बदलून मी ही झोपी गेलो.
पहाट झाली मायना घराचं कावड खोललं तशी घरात वार्याची मंद झुळूक आली, मला थंडी वाजायला लागल्यामुळं मी अजुन एक गोधडी घेऊन घंटाभर पडून रहातू मायला सांगितलं. पहाटची साखरझोप हवीहवीशी झाली होती, डोळे उघडायचे नाव घेत नव्हते. म्या झोपेतच मायला म्हंटला डाल्यातली पिल्लं प्यायला सोडुन दे.
ती पिवास्तोवर म्या झोपतो.
मायना पिल्लं सोडली, चुल्हीवरचं पाणी तापलं हूतं ते घेऊन मायनं अंघोळ केली. चुल्हंगणाला चांगला जाळ लागल्यामुळं भाकरी करायला घेतली.
परातीत भाकरी करण्याचा आवाज येत होता, तव्यावर भाकरीचा येणारा करपट सुगंधही येत होता.
मी उठलो मनातल्या मनात अंथरुणावर श्लोक म्हंटलो, अंथरुण घडी घालत घडोंचीवर ठेऊन दीले. दातौन घेऊन महोरच्या अंगणात दात घासत, ये जा करणाऱ्या लोकांना न्याहाळत बसलो...
(मायचा आवाज आला...)
छोटं सरकार पाणी तापलं हायसा, न्हाऊन घे.
म्या पळत गेलो, न्हाणीघरातुन बादली आणली, चुल्हंगणावरलं पाणी बादलीत टाकुन न्हाणीघरात अंघोळ करत बसलो.
(मायनं पुन्हा आवाज दिला)
छोटे सरकार आवरतयक्का..?
मी कापडं घालत,भांग पाडत माय जवळ आलो.
मायनं शिल्प्यातुन मोठ्या डब्यातून दहाची नोट काढून हातात दिली. रामाच्या किराणा दुकानातुन तांदुळ, तेल, शेंगदाणे आनाया सांगितले दुसर्या हातात तेलाचं बुटलं, पिशी दीली.
मी मायकडं बघत हसू लागलो अन् मायला म्हंटलं, 'पैसे तो है नहीं और बोलती हैं,मुनी श्याम को आते वख्त राई का तेल, राई, नमक, सब्जीभी लेके आना..
मुनी सुंन रहा है ना तू मैं क्या बोल रहीं हुं मुनी...'
(मालगुडी डेज मधील गरीब आदमी कथेतील हे वाक्य बायको तिच्या बकऱ्या सांभाळणाऱ्या पतीला म्हणत असते)...
माय हसु लागली....
मला म्हणाली,जा बिगी बिगी मला सरला काकूच्या वावरात सरकी निंदाया जाणं हायसा..
मी पायात वाहाणा घालून पिशीला गोल गोल फिरत, दुकानात जाऊन हवी ती जिन्नस घेऊन आलो...
सामान मायकडं दिलं बकऱ्याची पिल्ले दोन-चार पाठी,दोन-चार बोकडं मोठ्या टोपलीखाली डावलली अन् भाकर वांग्याची काळी भाजी घेऊन न्याहारी करत बसलो,माय भी न्याहारीला बसली न्याहारी करुन मी बकऱ्यांना दावणीतून सोडले...
(मायनं आवाज दिला...)
छोटू सरकार...
भाकर बांधून ठेवली हायसा उपरण्यात जाता वखत ली जास्..
मायना आवरलं अन् माय खुरपं,डब्बा घेऊन सुमी आक्काकडं जाऊन बसली....
म्या पण आवरलं भाकर घेतली,घराला कुलूप लावलं उटळं तुळशीच्या कुंडीत पुरलं....
अन् म्या बकऱ्या घेऊन बकऱ्या चरायला निघालो....
म्या बकऱ्या घेऊन वेशीच्या बाहेर असलेल्या हनुमानाच्या देऊळ जवळ येऊन बकऱ्या फिरवीत बसलो होतो, काहीवेळ गेल्यानंतर सलम्या त्याच्या बकऱ्या हुस्कीत हुस्कीत आला.
(लांबूनच मला आवाज देऊ लागला)
उं छोटे सरकार राम राम...
मी त्याला म्हणलो तुमच्या शेंडीवर दोन जाम...
आम्ही हसत-हसत हनम्याची वाट पहात बसलो, रस्त्याने हंनम्याची माय घरला जाताना दिसली मी त्यांना आवाज दिला...
ये काके हन्याला पाठव की लवकर...
जाया उशीर होई रहायला...
(त्याची माय बोलती झाली).
हाव रे लका...
आमचा हनम्या पहाटं लवकर उठत नाही अन् गरबड करत बसतंया...
आम्ही मोहरं चलतूयां पाठव त्याले लवकर काके...
आजच्याला आम्ही धरण पळेवर जायचे म्हणून मी,सलम्यानं ठरवले. कारण तिकडे बाभळीची झाडं खूप असत्या,मग बकऱ्याचं पोट भरतया...
गावच्या समशानभूमी जवळ आलो येताच मागून हनम्याने आवाज दिला अन् आम्ही समशनभूमीच्या शेडमध्ये जाऊन बसलो, बकऱ्या पण वर चढल्या होत्या...
(मी हान्याला आवाज दिला..)
आय लका चल की बिगी बीगी...
यळ हून रहीलिसा..!
सलम्या बक्र्यांना हुस्कीत हुस्कीत हातात गलुल घेऊन शेडवर बसलेल्या वांधरांणा हकलत होता...
समशाभूमीपासून नितळ, निवांत नदी वाहत होती. संथ वाहणारी नदी मी खूप वेळ नजरेत समावात स्मशान ओट्यावर बसलो होतो ...
संथपणे वाहणारी शिवणामाय गावाचे पाप धुवून तिच्या कवेत नेहमी गावाला घेत होती,तिच्यामुळे गावाला गावपन अन् गावातल्या माणसाला माणूसपण होते. गावात श्रीमंत, गरीब अशी दरी जरी असली पण गावातली माणसे एकमेकांना समजून घेणारी सणावाराला एकत्र येणारी होती. सर्वांना सोबत घेऊन चालणारी होती,म्हणून आसपासच्या पंचक्रोशीत गावाला मान होता.
हनम्या आला आणि आम्ही धरणपाळेच्या दिशेने चालू लागलो. दुरूनच वळसा घेतलेली धरणपाळ भव्य दिसत होती... तालुक्यातील लोकांला दुष्काळाच्या सालात कामधंदा नव्हता, म्हणून हे मोठं मातीचं धरण सरकारने दोन साल गावच्या गरीब लोकांना मजुरी देत करून घेतलं होतं. नाला बंडींगची सारी कामं या सालात पूर्ण झाली, पुढेही वखत मिळाला तसे हे काम होत राहिली, या दुष्काळाच्या काळात गावातील सारी माणसं एकत्र राहिली ती आजवर आहे.
आज पहाटं पहाटं ऊन चटकले होते, बाभळीच्या रानात बकऱ्या मुक्तपणे पाला खात फिरत होत्या बसायला दाट सावलीचे झाडही नव्हते. आखेरला हनम्या अन् म्या धरणपाळवर जाऊन बसलो...
बकऱ्या मस्तपैकी धरणाच्या सांडीत चरत बसल्या होत्या, आम्ही तिघेही धरणपाळवर बसून पाण्याचा गारवा अनुभवू लागलो होतो.मस्तपैकी बसून दूरवर गाड्यांची रांग दिसत होती,तो महामार्ग गावाच्या लगत आल्यामुळे गावात अनेक विकासकामे आली होती अन् गावाची विकासाकडे वाटचाल सुरू झालेली...
कधीतरी हवेच्या झुळके बरोबर गार वाटत असायचे, तर कधी दुसऱ्या बाजूनं येणाऱ्या गरम वाऱ्याच्या झळईमुळे गरमी होत असत...
धरणात मासे पकडनारे अशोक अण्णा अन् त्यांचा लेक इज्या माशे पकडत होते, धरणात दूरवर जाळे पसरले होते.आता ते एक बाजूला खाद्य टाकून माश्या पकडत, तर धरणपाळच्या दुसऱ्या बाजूला इज्याची माय मासे इकत बसली होती...
सलम्याने आज सोबतीला रेडू आणल्यामुळे तो आज खुश होता. घडोघडी रेडूचे चॅनल बदलत गाणे ऐकत बसला होता. हनम्या अन् मी बक्र्यांकडे लक्ष देत शीळ फुंकित धरणपाळेवर मोठ्याने गाणे म्हणात होतो.
#क्रमशः
भारत लक्ष्मण सोनवणे.
औरंगाबाद.