सर्वप्रथम तुम्हां सर्वांना माझा सलाम. तुमचे शौर्य, तुमचे देशप्रेम, देशासाठी प्राणार्पण करण्याची तुमची तयारी, टोकाच्या तापमानातही तुमच्या ठायी असणारी जिद्द, सतर्कता, स्वकीयांपासून लांब राहून मायभूमीलाच आपले मानून तिच्या रक्षणासाठी लढत राहण्याची तुमची जिद्द… तुमच्यातल्या अशा कितीतरी गोष्टींना मनोमन सलाम. तुमच्या सगळ्यांबद्दल आदर आणि तुमचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत.
तसं म्हटलं तर माझा कधी प्रत्यक्ष कोणत्या जवानाशी संपर्क आला नाही किंवा कोणाशी माझी ओळख नाही. पण घरापासून लांब राहणाऱ्या, नुसतं लांबच नाही तर उद्याची पहाट पाहू की, नाही याची शाश्वती नसताना आपल्या माणसांपासून इतकं दूर रहायचं, कधीतरी सहा-आठ महिन्यांनी, वर्षाने भेटायचं या सगळ्याचा मनात विचार जरी आला ना, तरी मन गलबलून येतं. मध्यंतरी काय झालं माहितेय? मी ट्रेनने प्रवास करत होते. मधल्या एका स्टेशनवर एक जवान माझ्याच बोगीत चढला. युनिफॉर्म नसला तरी हेअरकट, तगडी तब्येत आणि मोठी बॅग यावरुन तो जवानच असणार हे ओळखू येत होतं. सामान जागेवर ठेऊन तो परत खाली उतरला. सोडायला आलेल्या कुटुंबाचा निरोप घेणं किती जड जात असेल ना? तुम्हालाही आणि कुटुंबालाही. ट्रेन सुटायची वेळ झाली तसा तो आत शिरला. गाडी हळूहळू पुढं निघाली आणि खिडकीतून जे दृश्य दिसलं मला, अक्षरशः रडायला लागले होते तेव्हा मी. आताही त्या प्रसंगाबद्दल लिहिताना समोरची अक्षरं धूसर होत आहेत. प्लॅटफॉर्मवर त्या जवानाची बायको आणि तिच्या कडेवरचं जेमतेम 2-3 वर्षाचं मूल, धाय मोकलून रडत होते. लग्न होऊन सासरी जाणाऱ्या रडणाऱ्या मुलीला बघूनही रडू येतं कधी कधी. पण हे दृश्य पाहून आलेलं रडू हे नुसतं रडू नव्हतं. डोळ्यातलं पाणी आणि मनात साठलेल्या कितीतरी भावना, विचार यांचं दाटून आलेलं आभाळ होतं ते. काय वाटत असेल तिला बिचारीला. त्याच्या सुखरुप परत येण्याची वाट बघत आयुष्याचं रहाट गाडगं चालवायचं काही सोपं नाही. मनावर किती ओझं घेऊन रहावं लागत असेल तिला! तिचाही त्याग काही कमी नाही आणि अशा निरोपाच्या प्रसंगी होणाऱ्या तुमच्या मनस्थितीचं काय? बायको निदान डोळ्यातून पाणी तरी काढू शकते. पण तुम्ही? माझ्या समोर बसलेला तो जवान वरवर जरी शांत दिसत असला, तरी आतून तसा नसणार. घरच्यांना असं सोडून जाताना किती घोर लागत असेल तुमच्याही मनाला. सगळ्यातून सहीसलामत बाहेर पडून घरी सुखरुप गेलं तर काही प्रश्न नाही. पण….तुमच्या बाबतीत कशाची काही शाश्वती नाही. किती खडतर आयुष्य आहे तुमचं! कमाल वाटते खरंच तुमची सगळ्यांची.
कुठल्या ना कुठल्या बॉर्डरवर होणाऱ्या चकमकी किंवा काश्मिरमधलं वातावरण, तिथल्या तुमच्या अतिरेकी विरोधी कारवाया अशा घटनांबद्दलच्या बातम्या आम्ही कायम वर्तमानपत्रातून वाचत असतो. त्या वाचताना तेवढ्यापुरती हळहळ वाटते. आपण या सगळ्यांपासून दूर आहोत, या स्वार्थी विचाराने काही क्षण हुश्शही वाटतं. सर्वसामान्य लोकांना असं वाटणं साहजिक आहे ना. प्रत्येकवेळी आम्ही स्वतःपुरता विचार करत असतो. शिवाजी तर जन्मायला हवा असतो, पण तो दुसऱ्या घरी. पण तुम्ही फक्त नि फक्त देशाचा, आमच्या संरक्षणाचा विचार करुन जीवावर उदार होऊन लढत असता. कसं जमतं हे तुम्हाला? विचार करायला लागलं ना की वाटतं, सैनिक हा जन्मावा लागतो. फक्त घडवून तयार होत नसतो. असं असेल का? जिच्या कुशीतून तो जन्म घेतो ती मायही थोर! पोटच्या गोळ्याला देशसेवेसाठी धाडताना काय काय वाटत असेल तिला. अर्थात त्या गोळ्याला आकारही तिनेच दिलेला असतो. त्यामुळं अभिमान तर नक्कीच असणार. या मातांच्या धाडसाचं कौतुक वाटतं. एका मुलाला वीरमरण आलं तरी दुसऱ्या मुलाला सैन्यात पाठवायला ती तयार असते. अशी सकारात्मक ऊर्जा तिच्याकडे कुठून येते परमेश्वरच जाणे. तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं बॉंडिंग काही वेगळंच म्हणावं लागेल.
एकदा का ड्युटीवर गेलात की, घरी सारखं सारखं कुठलं फोन करणं आणि पत्र पाठवणं होत असणार ना? काही बातमी आली नाही म्हणजे तुम्ही सुखरुप असणार, असंच घरचे मानत असतील ना? सुट्टीत घरी आलं तरी ड्युटीवर हजर व्हायचा आदेश कधीही येऊ शकेल म्हणून, तुम्हाला कायम सज्जच रहावं लागत असेल ना? सुट्टी म्हणजे तरी काय? घरी आल्यावर इथली कामं काय कमी असतात का? शेतीची, जमिनीसंदर्भातली कामं तर डोकं वर काढूनच असतात. त्यात सरकारी कामं तर अशी की, खेटे घातल्याशिवाय होतच नाहीत कधी पूर्ण. म्हणजे सुट्टीत घरी आलात म्हणून कुटुंबाबरोबर निवांत क्षण फारच कमी मिळत असणार तुम्हाला. तुमच्यामागे किती व्याप, किती ताण असतील याची कल्पना करणंही जड जातंय. कसं सगळं निभावून नेता? तुमच्याबद्दल जेवढा विचार करत जाते ना तेवढा तुमच्याबद्दलचा आदर वाढत जातोय. खरंच तुम्ही आहात म्हणून आम्ही सुखी आहोत. तुमच्याकडून मिळणारी ही भाऊबीज इतर कशाहीपेक्षा खूपच मोठी आहे.
पत्रातून तर भेट झालीच आहे आपली. आता प्रत्यक्ष भेटायला आवडेल. तुमच्या शौर्याच्या कहाण्या तुमच्याकडून ऐकायला आवडतील. अर्थात त्या ऐकताना माझ्या डोळ्यांना अखंड धारा लागलेल्या असतील हे ही मला माहितेय. पण ते अश्रू लपवणार नाही मी. कारण तो प्रत्येक अश्रू नक्कीच तुमच्याबद्दलच्या अभिमानाचा असेल. जयहिंद!
कायम तुमच्या ऋणात…..
जस्मिन जोगळेकर.