सिमांतनी भाग- ३

06 Jul 2022 11:24:23


simantani

सिमांतनीचे नऊ महिने नऊ आठवड्यासारखे सरून गेले अन् ऐन बोचणाऱ्या थंडीत सिमांतनीचे दिवस भरले असल्याचे गावच्या सुईनीने सांगितले. सिमांतनी आता कुठल्याही वखताला बाळंत होईल, हे सहा बाळंतपण झालेल्या तिच्या सासुबाईला कळलं...

 

आता मात्र सिमांतनीच्या दादला असलेला जो एकुलता एक मुलगा असा तरी या पहिल्या खेपेला सिमांतनीला व्हावा अन् तिला देवानं मोकळं करावं अन् मलाही हा नातूच व्हावा म्हणजे मी डोळे मिटायला मोकळी, असं सिमांतनीची सासू सांच्याला भांडे घासत स्वतःशीच बडबडत होती...

सांच्याला जेवणं आवरून, सिमांतनीची सासू भांडे घासून तिने, सिमांतनीला अंथरूण टाकून दिलं.

थंडी खूप असल्यानं अन् शेणानं सांजवेळी सारलेल्या भिंती असल्यानं घरात अजूनच हुडहुडी भरून आल्यासारखे तिला वाटत होते. तिच्या सासूने तिला खाली अंथरायला दिलेली घोंगडी चांगली उबदार असल्यानं तिनं गरमट धरली होती अन् अंगावर पांघरूण म्हणून लेपड्याची केलेली गोधडी अंगावर असल्यानं आता तिला बरं वाटत होतं.

 

सासरा महुरच्या पडवीत टाकलेल्या खाटेवर खोकत-खोकत बिड्या फुंकीत सिमांतनीच्या सासूबाईच्या आई-बापाच्या नावाचा उद्धार करत होता. म्हाताऱ्याच्या गौऱ्या म्हसणात गेल्या, पण म्हातारा काही डोक्यात आला नाही, असं म्हणत सासूबाई तिच्या लेकाचे एक अंगाला अंथरूण घालत होती अन् तिचंही.

सिमांतनीच्या या आडीनडीच्या रात्रीला म्हणून तिची सासूबाईसुद्धा आता तिच्या जवळ पहुडली होती...

बाहेर अंधारून आलं होतं, काळोख चहूकडे पडला होता, वाहत्या नदीतून थंड्या पाण्यात वाहणाऱ्या वाफा मात्र दरवाज्यातून दिसू लागल्या होत्या. झोपायला म्हणून सिमांतनीचा दादला चार लोकाचे घरं पुंजून ओसरीला आला, कडाक्याची थंडी वाजत असल्यानं त्यानं पेटीतून सिमांतनीचे तिच्या माहेरून मायना दिलेलं सेटुर काढून घालायला म्हणून सिमांतनीला दिलं अन् सिमांतनीचा चेहरा खुलून आला.

 

तोही आता त्याच्या आईच्या अन् बायकोच्या पायथ्याला अंथरलेल्या अंथरुणाला झोपला. रोजचा एक दिवस आजही कलला होता, सिमांतीनीचे बाळंतपण पुन्हा एक दिवसाने जवळ आले होते. आत मात्र त्याची त्याला चिंता सतावत होती, तिचं असलेलं कमी वय अन् तिला हे सर्व सोसल का? या विचाराने तो या उश्यावरून त्या उश्यावर आपली कुस बदलत होता...

काळोख आधिकाधिक गडद होत चालला होता. यात कमी की काय म्हणून फळीवर असलेल्या दिवा आता विझायला करत होता अन् एका वख्ताला तो विझला, घरात सर्वत्र काळोख झाला होता...

सासूबाई निवांत पहुडली होती, सासरा अधूनमधून खोकलत बरतळत होता, सिमांतनीचा दादला आता मस्त काळोखाच्या राती घोरत होता.

 

थंडी अजून वाढत होती, नदीला असलेलं मोप पाणी अन् चहुकडे असलेली हिरवळ त्यामुळे या सालाला नेहमीपेक्षा जास्तीची थंडी जाणवत होती. देऊळात कीर्तन, अभंग चालू होती टाळ, मृदंग, पखाचा आवाज सिमांतनीच्या कानापहुर येत होता अन् ती हे सर्व मन लावून ऐकत होती.

तिच्या होणाऱ्या बाळावर याचा परिणाम होत होता की, काय म्हणून ते पोटातल्या पोटात रांगल्यासारखे करत होते अन् हे सुखद क्षण अनुभवत सिमांतनी निपचित देवाचा धावा करत अंथरुणात मायनं दिलेलं माहेरचं सेटुर घालून निपचित पहुडली होती, निपचित पहुडली होती.

 

कोजागिरी होन आठ दिवस सरले होते, शाच एका अंधाऱ्या रात्री सिमांतनीच्या पोटात एकाकी कळा येऊ लागल्या सिमांतनी अंथरुणाला रेटा देत त्या कळा सहू लागली होती.

अंधारी रात्र अन् गोठवलेली थंडी यामुळे तिची अजूनच जास्तीची अबळ होत होती. इतक्या सर्व थंडीतही तिला धरधरून घाम फुटला होता, सर्व अंग घामाने घामेजलेलं झालं होतं.तिची ही अवस्था बघून तिच्या पायथ्याशी झोपलेली तिची सासूबाई जागी झाली अन् तिच्या बाळंतपणाचे शेवटचे दिवस तिच्या नजरेसमोरून तरळून गेले.

 

तिला हे कळून चुकले होते की, होणारा त्रास हा तिचा अन् बाळाच्या जीवाशी खेळणारा ठरू शकेल, म्हणून तिला ज्या काही उपाययोजना करता येईल त्या तिनं केल्या. या उडालेल्या धांदलीत सिमांतनीचा दादला उठला त्याला हे सर्व नवं असल्यानं सिमांतनीकडे पाहून त्याला अपराधी वाटू लागलं, तो स्वत:ला कोसत होता, जीवाचा त्रागा करत होता काळोखाची असलेली मध्यरात्र सरता सरेनाशी झाली होती, होणाऱ्या प्रसववेदना मिनिटागणिक वाढू लागल्या होत्या.

ही सर्व धांदल ऐकून ओसरीत झोपलेला सिमांतनीचा सासरा कचाकच शिव्या देत मधल्या घरात आला अन् डोळ्यासमोर असलेली अवस्था बघून खोकलतच त्यांच्या बायकोला शिव्या देत, लेकाला म्हणू लागला मर्दा जा लवकर मांगवाड्यातून सुईनीला घेऊन ये.

काळ जवळ आला हाय, एकतर तू बाप होणार नायतर अवघड होणार तुझी कसोटी हायसा जा.

सिमांतनीचा दादला हे ऐकताच घराच्या बाहेर पडला एकीकडे, सिमांतनीचा एक जीव येत होता एक जात होता, तिच्या दादल्याला मात्र काय करावं सूचना झालं होतं. अनवाणी पायांनी तो मांगवाड्याच्या वाटेना मांगवाडा घाठण्याचा प्रयत्न करत होता, अंधारी रात्र असल्याने काळोखात समोर काहीही दिसेना झालं होतं.

 

वाटेतून अंदाज काढीत तो धावत होता, प्रत्येक पावलागणिक त्याला सुईनीचं घर दूर भासत होतं अन् यात घात झाला एका धोंड्याला त्याचा पाय धडकला, ठोकर बसली अन् डोक्यात पार आतपर्यंत ती कळ त्याला झोंबली. नखाचे टकूर निघून बाजूला झालं होतं, पण आता आपलं दुखणं बघणं त्याला योग्य वाटत नव्हतं कसाबसा लंगडत धावत तो मांगवाड्यात सुईनीच्या घराला पोहोचला. कावडावर हातानं ठोकत त्यानं सुईनीला आवाज दिला कावड उघडलं तसं सुईनीनं त्याचा चेहरा बघून अवस्था ओळखली अन् ती तिचं गाठुड घेऊन त्याच्या संगत सैरावैरा पळू लागली.

अखेरला दोघेही घरला पोहोचले, सुईनीनं सिमांतनीच्या दादल्याला अन् त्याच्या म्हाताऱ्याला परसदारच्या खोलीत थांबायला लावलं अन् कावड लावून घेतलं आत सिमांतनीच्या वाढणाऱ्या प्रसववेदना, वाढणाऱ्या कळा अन् तिला होणार त्रास बघून तिच्या सासूबाईचं अर्ध आवसांन गळून पडलं होतं, पण तिला धीर द्यायला म्हणून ते हे सर्व रेटत तिला धीर देत होती, सुईन तिच्या योग्यतेप्रमाणे प्रयत्न करत होती.

 

बाहेर सिमांतनीच्या दादल्याला एक-एक क्षण एक-एक काळासारखा झाला होता, तो गुडघ्यात मान घालून आपली आसवे ढाळत बसला होता. सिमांतनीचा सासरा बिड्या फुकित काळजीनं परसदारच्या खोली महोरल्या अंगणात येरझऱ्या घालत होता.

या सर्व दांगुड्यात गल्लीतले सारे लोकं जागी झाली अन् सिमांतनीच्या कुडाच्या घरासमोर तिची या त्रासातून सुटका होण्याची वाट बघू लागली होती. अंगणात शेकोटी पेटली होती. थंडी मी म्हणत होती. गल्लीतल्या बायका आपआपले बाळंतपणाचे दिवस आठवून एकमेकांना सांगत होत्या.

काही तासभराने बाळाचा रडण्याचा आवाज बाहेर आला अन् सिमांतनीच्या दादल्याच्या डोळ्यातील धारा खंडल्या. तो वर मान काढून कावरीबावरी नजर करत इकडं तिकडं बघू लागला. सिमांतनीची यातून सुटका झाली हा विचार करून अंगणात जमलेल्या बायका सुखावल्या. अंगणातील माणसं सिमांतनीच्या दादल्याच्या गळ्यात पडू लागली अन म्हणून लागली,

लका आम्हाला नातू झालासा तू बाप झाला हायसा.

 

पण या आनंदामागे बाळाच्या ओरडण्यामागे सिमांतनीचा आवाज मात्र तिच्या दादल्याच्या कानावर पडेना झाला होता. अंगण पुन्हा एकदा शांत झालं, इतकं शांत की गावात घोंघावणारा वारा आता स्पष्ट ऐकायला येऊ लागला होता, बाळ जन्माला आलं पण बाळंतणीचं काय झालं ती बेसुध हाय का?

हे मात्र कळंना झालं होतं.

दहा-पाच मिनिटानं कावड उघडलं, सुईनबाई अन् सिमांतनीची सासूबाई हातात बाळ घेऊन बाहेर आली. सुईनीनं लुगड्याच्या पधरानं आपलं रडू लपवत तिथून काढता पाय घेतला अन् काही विपरीत घडल्याचं गल्लीतल्या लोकांना कळून चुकलं.

 

सिमांतनीचा दादला त्याच्या आईजवळ जान लेकाला बघत बोलला,

मायव सीमांतनीचा आवाज का येईना झालं हायसा, ती झोपली हाय का? अन् तू थंडी वाऱ्याच तुझ्या नातवाला घेऊन का बाहेर आली हायसा?

सिमांतनीच्या सासूबाईंन तिच्या नातवाला तिच्या नवऱ्याकडे दिलं. सिमांतनीचा सासरा त्याच्या नातवाला बघून बोळक्या झालेल्या गालातून गालातल्या गालात हसून त्याच्याकडे बघू लागला.

अन् इतक्यात होत्याचं नव्हतं झालं, सिमांतनीच्या सासूबाईनं मोठ्यानं तोंड झोडत स्वतःला शिव्या द्यायला सुरुवात केली.

म्या कैदाशिनीनं माझ्या लेकाच्या संसाराचं वाटुळं केलं, माझ्या सुनबाईला म्हसणात नेऊन घातलं.

हे ऐकून सिमांतनीचा नवरा रडतच कावड उघडून आतल्या खोलीत गेला. सिमांतनी बाजीवर निपचित पडून होती. ती तिच्या लेकाला अन् तिच्या दादल्याला सोडून कायमची निघून गेली होती. सिमांतनीचा दादला तिच्या गळ्यात पडून मोठ्यानं हमसून हमसून रडत होता. त्याला हळदीत नटलेल्या सिमांतनीपासून मरणासन्न अवस्थेत पडलेली सिमांतनी डोळ्यांना दिसत होती.

सिमांतनीचा सासरा डोळ्याला पाणी येत नसतानाही सुनेच्या जाण्याच्या दुःखात नातवाला सांभाळत रडू लागला होता. गल्लीतल्या साऱ्या बायकांच्या डोळ्यातून आसवांच्या धारा वाहू लागल्या होत्या. गावावर शोककळा पसरली होती. गावची सून गावानं गमावली होती हे खूप दुःखद होतं.

 

अंधारी रात्र सरून पहाटेचं तांबडं फुटलं. सूर्योदय झाला. सिमांतनीच्या माहेराला खबरबात गेली. तेही आले अन् सिमांतनीला अखेरचा निरोप देण्यात आला.

दुःखाचं मूळ सिमांतनीच्या सासू सासऱ्याला कळून चुकलं होतं. आपल्या लेकाचं कमी वयात केलेलं लग्न अन् सूनेला न झेपणाऱ्या वयात आलेलं बाळंतपण तिला नाही झेपलं अन् सिमांतनीनं आपल्याला पिढीचा वारस, वंशाला दिवा देऊन आपला प्राण त्यागला.

पुढे सिमांतनीचा दादला विदुर म्हणून गावाभर भटकत राहिला अन् मायविना पोरकं झालेलं पोर माय शिवाय,मायच्या प्रेमाशिवाय आपलं जीवन जगत राहिलं.

लेखक:भारत लक्ष्मण सोनवणे.

औरंगाबाद.

Powered By Sangraha 9.0