ए व्हिलन !!!

25 Jul 2022 11:59:51


villain

काही वर्षांपूर्वी श्रद्धा कपुर, रितेश देशमुख, सिद्धार्थ मल्होत्रा अभिनित "एक व्हीलन" नावाचा सिनेमा आला होता. आता ह्याच आठवड्यात त्याचा पुढचा भाग म्हणता येईल असा परंतु नव्या कथानकातला अर्जुन कपुर, दिशा पटणी, जॉन अब्राहम अभिनित "एक व्हीलन रिटर्न्स" येतोय. पहिल्या सिनेमाच्या वेळेस ट्रेलर मधील श्रद्धा कपूरच्या आवाजातील " व्हीलन !" ही हाक खूप गाजली. मुळ स्टोरीलाईनपेक्षा हिरोला उद्देशून असलेली ही सादच जास्त गाजली. खरंच ही किती गंमत आहे ना! हिंदी सिनेमा मधील व्हीलन हा बालपणापासूनच अनेकांच्या कुतूहलाचा विषय असतो. आपल्याला आवडणाऱ्या एखाद्या शिक्षकाला किंवा नातेवाईकाच्या रंगरुपावरून आपण कळत नकळत एखाद्या व्हीलनची उपमा कधी ना कधी दिलेली असते. असं म्हणतात की, रामाचं महत्व समजुन घ्यायचं असेल तर आधी रावण कळला पाहिजे. तसा हिंदी चित्रपटातला व्हिलन आणि त्याचा आजवरचा प्रवास हा सुध्दा तसाच एक गंमतीदार अभ्यासाचा विषय आहे.

 

पहिले चित्रपट बघताना प्रश्न पडत असंत की, ‘शान' मधला ‘शाकाल' वास्तवात असता

तर आपला हायटेक अड्डा कसा बनवुन घेतला असता? त्याचा मेन्टेनन्स कसा केला असता? अमुक एका खुर्चीवर हिरो बसणार आहे तर त्याला लॉक करण्याची यंत्रणा बसवून दे वैगेरे ठेकेदाराला सांगितलं असेल का? मोगॅम्बो, डॉ.डेंग वैगेरे मंडळी वास्तव आयुष्यात आपल्या खलनायक गॅंगसाठी युनिफॉर्म कुठून शिवून घेत असतील? गँगच्या सदस्यांना आमच्याप्रमाणे पगारात धुलाई भत्ता/ शिलाई भत्ता मिळत असेल का? गब्बरची टोळी दिवसभर उन्हातच खडकावर बसत असतील की, आपल्या घरी पण जात असतील? (शेवटी गब्बर, कालिया, सांबा वैगेरे आपल्यासारखीच माणसं) ! थंडीवाऱ्याने किती हाल होत असतील बिचाऱ्यांचे ! बाकी सिनेमातून हिरोची फॅमिली किडनॅप केल्यानंतर ‘पुराने किलेके पिछे’, ‘देवीमंदिर के बाजुमे’, ‘कालीघाटी के नीचे’, ‘खंडहरवाली हवेली के पास’, अशा आडवाटेच्या जागा निवडण्यात खलनायकाचं कसब वाखाणण्याजोग होते. त्या अड्ड्यावर जे काही खोके भरून ठेवलेले असंत त्यात नेमकं काय असावं? हा विचार करण्यात बराच काळ जात असे. खोके भरून सोने उचलण्यात किती ताकद लागत असेल? मग हे पळत कसे असतील? असे शाळेत घनता वैगेरे शिकल्यानंतर प्रश्न पडत. बरं ते पहाडी अड्डे एकाच बाजुने उघडे असल्यावर पोलिस नेमके “चारो तरफसे तुम्हे घेर लिया है" म्हणुन कशाला दम देत असंत हा पण प्रश्न होता.

 

आपला हिरो पण वेंधळा असायचा, ‘अपने आदमीयोसे कहदो के हथीयार फेक दो' म्हणायचा तोच अड्ड्यावरचा लपलेला कोणी दुसरा व्हिलन त्याच्या पाठीमागे रिव्हॉल्वर लावुन बाजी पलटवायचा. बरं हिरो इतका वेंधळा की, खलनायक पूर्ण मेलाय ह्याची खातरजमा करता आनंद साजरा करू लागायचा; तेवढयात तो अर्धमेला व्हिलन उठून हिरोवर गोळी झाडायचा. ह्या प्रयत्नात कित्येक सहनायक नाहक शहीद झाले आहेत.

 

चुकूनमाकून इंटर्व्हलच्या आधी खलनायकाची गोळी दंडावर लागलेला नायक कुठेतरी धडपडत नायिकेचं घर गाठायचा ! ती बया प्रसंगाच गांभीर्य ओळखून ओढणी फाडून दंडावर बांधायची पण हिरोच तो, त्याला सेल्फ ट्रीटमेंटची हौस आली की, एनस्थेशियाची वाट बघता दारूचा एक घोट घेऊन तापत्या चाकूने दंडातील गोळी काढायचा. एकूणच व्हीलन आणि त्याचे उपद्व्याप ह्यावर भरभरून लिहिता येईल.

 

भारतीय सिनेमाची सुरुवात झाली तेव्हा सुरुवातीच्या काळात रावण, कंस, दुर्योधन वैगेरे पौराणिक पात्र खलनायक असंत. काळ जसजसा पुढे सरकला तस तसा सामाजिक कथानकांच्या काळात गावातील दुष्ट जमीनदार, सावकार, ठाकूर, लाला, धनिक शेठजी…. असे लोक समाजाच्या दृष्टीने खलनायक असत.

 

प्राण, कन्हैयालाल, सी एस दुबेह्यांनी असे अनेक रोल अजरामर केले आहेत. ही पात्र अजरामर झाली कारण, ग्रामीण भारतातल्या लोकांना त्यामध्ये स्वत:चं प्रतिबिंब दिसत असे. पुढे शहरीकरण वाढलं तसतसं खलनायक सुटाबुटात आले. अजित, रणजित, जीवन, पासून अमरीश पुरी पर्यंत अनेक मंडळींनी साकारलेले स्मगलर किंवा काळे धंदे करणारे बिझनेसमन खलनायक स्वरूपात सामोरे आले. हा सामाजिक बदल घडत असतानाच चंबळ खोऱ्यातील डाकू हा सुद्धा सिनेमाचा आवडता विषय होता. विनोद खन्नाने “मेरा गाव मेरा देश" मध्ये साकारलेल्या जब्बर पासून चायना गेट" मधील मुकेश तिवारीच्या जगिरा पर्यंत डाकूपटांचा एक स्वतंत्र अध्याय लिहिता येईल.

 

स्वातंत्र्योत्तर काळात जसजशी आदर्शवादी किंवा स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेली जनता नामशेष होऊ लागली, तसतसे आधुनिक प्रशासनातील पोलिस अधिकारी, राजकारणी, नोकरशाह हेच त्यांच्यासाठी खलनायक ठरले. डॅनी, गुलशन ग्रोव्हर, शक्ती कपूर, सदाशिव अमरापूरकर अशा अनेक खलनायकानी तशी पात्रे रंगवली.

 

जागतिकीकरणानंतर मूल्य, नैतिकता,आदर्श सगळ्यांच्याच व्याख्या बदलल्या. डर, कांटे, वास्तव, मुसाफिर, इत्यादी सिनेमांनी नायक आणि खलनायक ह्यांच्यातील सीमारेषाच संपवून टाकल्या. दुष्मन सारख्या सिनेमात आशुतोष राणाने साकारलेला पोस्टमन खलनायक होता तर गुलाम मध्ये रॉनी नावाचा क्रिकेट बुकी ! गुप्त, अजनबी सारख्या सिनेमात तर खलनायक म्हणाव की नाही असा प्रश्न पडावा असे कथानक होते. नंतरच्या काळात तर मन्या सुर्वे, माया डोळस इत्यादी गुन्हेगारांच्या नावावर जे सिनेमे आले ते त्यांचं उदात्तीकरण करत आहेत का असा गंभीर प्रश्न माध्यमात चर्चिला जाऊ लागला.

 

मुन्नाभाई mbbs, इडियटस, तारे जमीनपरमध्ये व्यक्तीपेक्षा समाजव्यवस्था किंवा सगळी यंत्रणाच खलनायक म्हणून दर्शवली गेलीं. एकंदर खलनायकांची जमात नामशेष होते आहे. हिरोईन किंवा हिरोची बहीण ‘भगवानके लिए मुझे छोड दो' म्हणत असताना खलनायक तिच्या पदराला हात घालायचा किंवा तिच्या बाह्या फाडायचा पण आजकालच्या जीन्स-टॉप आणि स्लीवलेस टीशर्टच्या जमान्यात अजित - रणजित सारखी खलनायक मंडळी बेरोजगार झाली आहेत. “तुम्हारे पास सिर्फ 24 घंटे बचे है, बचालो अपने बिवि बच्चोको" अशी टाइमलिमिटची टार्गेट बेस्ड कामे देणारी खलनायक मंडळी पण कमी झाली आहेत. “यह लो 20 लाखका चेक और दफा हो जाओ मेरी बेटीके जिंदगीसे" म्हणणारे सईद जाफरीसारखे व्हिलन कम हिरोचे ससुर पण आजकाल दिसत नाहीत. “हिरोला त्याच्या हैसीयतची जाणिव करून देणारे, खानदानसे बेदखल करणारे, जायदादमेसे फुटी कौडी देनेवाले, तुम मेरे लिए हमेशा हमेशाके लिए मर गई हो" वैगेरे डायलॉग मारणारे बापलोक्स पण कालबाह्य झालेत. एकूण काय तर खलनायक आणि खलनायकांचे अड्डे, ह्या साऱ्यांचा जीर्णोद्धार करायची गरज आहे.

- सौरभ रत्नपारखी

Powered By Sangraha 9.0