भारतीय महिलांचा क्रीडाक्षेत्रात डंका

22 Jul 2022 10:27:36


india

........आणि पी. व्ही. सिंधू चीनच्या खेळाडूला पराभूत करत सिंगापूर ओपनमध्ये अव्वल ठरली. चीनच्या वँग झी यीचा पराभव करत सिंधूने स्वतःचं नाव विजेतेपदावर कोरलं आणि भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला. राजकीय घडामोडींच्या धामधुमीत ही घटना फारशी प्रकाशात आली नसली तरी त्यामुळे तिचं महत्त्व मात्र अजिबात कमी होत नाही. या विजयामुळे सिंधूवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होतो आहे. भारताच्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा युवा खेळाडूंमध्ये सिंधूचं नाव वरच्या फळीत येतं. केवळ सिंधूच नव्हे तर सायना नेहवाल (बॅडमिंटन), सानिया मिर्झा (टेनिस), द्युती चंद (ऍथलिट), हिमा दास (धावपटू), फोगट भगिनी (कुस्ती), मिताली राज, हरलीन, हरमनप्रित कौर (सर्व क्रिकेट), दीपा कर्माकर (लाँग जम्प), दीपिका कुमारी (नेमबाज) अशी ही मोठी यादी आहे. या सगळ्याच जणी आपापल्या क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.

 

प्राचीन कालापासून भारतात शिक्षण, राजकारण, समाजकारण, संरक्षण, वैद्यकी, तत्त्वज्ञान अशा विविध क्षेत्रात महिलांचा कौतुकास्पद सहभाग राहिला. क्रीडाक्षेत्रात मात्र तुलनेने तो सहभाग कमी होता. अर्थात इसवीसनापूर्वी वेदाध्ययन कऱण्याचा, सर्व प्रकारचं क्रीडा व शास्त्रप्रशिक्षण घेण्याचा स्त्रियांना अधिकार होता. त्याचे पुरावेही इतिहासात दिसून येतात. पुढे परकीय आक्रमणकाळात स्त्रीच्या स्वातंत्र्यावर बंधनं येत गेली आणि हा सहभाग निवळत गेला. पण साधारण विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून मात्र स्त्रियांचा क्रीडाक्षेत्रात सहभाग वाढत गेला. स्वातंत्र्योत्तर काळात तर तो वाढत गेलाच, पण खऱ्या अर्थाने ज्याला सुवर्णकाळ म्हणता येईल असा काळ म्हणजे गेल्या तीस ते चाळीस वर्षांचा काळ. क्रीडाक्षेत्रातील स्त्रियांच्या उल्लेखनीय कारकीर्दीचा हा ओझरता आढावा.

 

आपल्यापैकी प्रत्येकालाच पी.टी. उषा माहीत आहेत. धावपटू म्हणून त्यांची कारकीर्द देशाची मान उंचावणारी अशीच राहिली आहे. पण आपल्यापैकी किती जणांना एम.डी. वलसम्मा माहीत असतील. वलसम्मा यांनी १९८२च्या आशियाई क्रीडास्पर्धांमध्ये ४०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. १९८४च्या लॉस एंजिलिस ऑलिम्पिक्समध्येही त्यांनी पी.टी.उषा यांच्यासह भारतासाठी देदिप्यमान कामगिरी बजावली. कर्नाटकातील शिनी अब्राहम आणि वंदना राव यांचाही यातील सहभाग महत्त्वाचा होता. यापूर्वी १९५२मध्ये मेरी डिसुझा यांनी हेल्सिंकी ऑलिम्पिक्समध्ये भारताचं पहिल्यांदा महिला खेळाडू म्हणून प्रतिनिधित्व केलं होतं. तत्पूर्वी १९५१मध्ये नवी दिल्लीत झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्येही २०० मी आणि ४०० मी धावण्याच्या स्पर्धेत भारताना कांस्य पदक मिळवून दिलं होतं. हेल्सिंकी ऑलिम्पिक्समध्ये निलिमा घोष यांनी ऍथलिट म्हणून हर्डल रेसमध्ये कर्तृत्व गाजवलं होतं, त्या वेळी त्या अवघ्या १७ वर्षांच्या होत्या. रिटा दावर यांनी १९५२च्या विम्बल्डनमध्ये फायनलपर्यंत धडक मारली होती व पुढील चार वर्षं सातत्याने सर्व स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून मान मिळवला होता. बुला चौधरी यांनी पोहणे या क्रीडाप्रकारात विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये लक्षणीय यश प्राप्त केलं होतं. १९९१मध्ये साऊथ इस्ट आशियाई स्पर्धेत सहा सुवर्ण पदकं प्राप्त केली. १९९६मध्ये मुर्शिदाबाद लाँग डिस्टन्स स्पर्धा व १९९९मध्ये दुसऱ्यांना इंग्लिश खाडी पोहून पार केली. सातही महासागरांमध्ये पोहणाऱ्या त्या पहिल्या महिला तरणपटू आहेत. मेरी कोम यांनी लंडन ऑलिम्पिक्समध्ये भारताला बॉक्सिंगचं पहिलं कांस्य पदक मिळवून दिलं. ईशान्य भारतात, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सराव करून भारताला बॉक्सिंगमध्ये चेहरा मिळवून देण्याचं कार्य मेरी कोम यांनी केलं आहे. अंजली भागवत यांनी भारताला शूटिंगमध्ये मानाचं स्थान मिळवून दिलं. २००२मध्ये १० मी एअर रायफल शूटिंगमध्ये त्या जगभरात अव्वल ठरल्या आहेत. २००३मध्ये त्या मिलान विश्वचषक आणि आयएसएसएफ चॅम्पियन ट्रॉफी जिंकणाऱ्या त्या पहिल्या आणि एकमेव भारतीय नेमबाज आहेत. राही सरनोबत यांनी २५ मीटर पिस्तुल शूटिंग क्रीडाप्रकारात २००८मध्ये कॉमनवेल्थमध्ये भारताला सुवर्णपदक प्राप्त करून दिलं. त्यानंतर २०१८मध्ये जकार्ता पॅलेमबंग आशियाई स्पर्धेतही सुवर्णपदक प्राप्त केलं.

 

साधारण २०००च्या दशकापासून महिलांचा क्रीडाक्षेत्रातील सहभाग हा संख्यात्मक दृष्टीने वाढता आणि यशस्वी असा आहे. सिंधू, सायना नेहवाल, महिलांची क्रिकेट टीम, फोगट भगिनी आणि वर उल्लेखित सर्वच क्रीडापटूंनी आपापल्या क्रीडाप्रकारात अत्यंत यशस्वी आणि उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ही सगळी माहिती इथे देण्याचा हेतू एकच आहे. आयुष्यात करिअर म्हणून विचार करताना थोडा वेगळा आणि आऊट ऑफ द बॉक्स विचार करायला काहीच हरकत नाही. पण हा विचार तुम्हाला शालेय जीवनापासूनच करावा लागेल. त्यासाठी आवश्यक ती मेहनत घ्यावी लागेल. मोबाईल, सोशल मीडिया, मित्र मैत्रिणी या पलीकडे जाऊन आपल्या आवडत्या खेळाचा, यशाचा आणि देशाप्रती असणाऱ्या समर्पिततेचा विचार करावा लागेल. क्वचित आईवडिलांना त्यासाठी कन्व्हिन्स करावं लागेल. पण ते तितकसं कठीण नाही. त्यासाठी एकाग्र होऊन ध्येय निश्चिती करावी लागेल, योग्य प्रशिक्षकाकडे प्रशिक्षण घ्यावं लागेल. सुदैवाने आज स्त्रियांसाठी आजूबाजूची परिस्थिती सकारात्मक आहे. घरातल्यांकडूनही क्रीडाक्षेत्रात कामगिरी करण्यासाठी पाठिंबा दिला जातो. त्यासाठी पहिली काही पावलं तुम्हाला टाकायची आहेत. बघा विचार करा.... कदाचित एखादी मिताली राज, स्मृती मंधाना, पी. व्ही. सिंधू, अंजली भागवत, सायना नेहवाल तुमच्यातूनही घडेल. सिंधूच्या यशाच्या निमित्ताने हा विचार पुढे आला व जनमानसात रुजला तर तेच त्याचं फलित असेल.

- मृदुला  
Powered By Sangraha 9.0