छोटे सरकार..! भाग -१

20 Jul 2022 11:39:21


chhote sarkar

 

सूर्योदय केव्हाच झाला होता, चुलीवरचं पाणी इसन घेण्याइतपत तापलं होतं.

मायची अंघोळ झाली अन् मायनंमधल्या घरातून आवाज दिला, छोटे सरकार उठ की. आता बकऱ्याच दूध काढायचं हायसा, बकऱ्या घेऊन रानात जायचं हायसा.

उठ रं लेका, चल उठ.

गोड गुणाचं हाय माझं ते लेकरू उठ चल.

आवर बिगी.. बीगी.

मला बी जयवंता काकूच्या वावरात सरकी निंदाया जायचं हाय.

मोहरच्या घरात राच्या भांड्याचा गराडा पडला हायसा.

मायचं बोलणं ऐकुन तावातावात मी ताडकन अंगावरची गोधडी पायाने लोटून देत उठलो.

परसदरच्या चुल्हंगणावर ठेवलेलं गरम पाण्याचे घमीलं मोरीत आणून पितळीच्या बादलीत टाकलं. पाच मिनिटात पाणी तांब्यानी साऱ्या अंगावर घेऊन अंघोळ केली अन् मधल्या घरात कपडे बदलून मायकडे गेलो.

मायनं चुलीवर कोरा चहा ठेवला होता अन् तो पार उकळून उकळून साऱ्या घरात त्याचा उकळायचा सुगंध पसरला.

मी कंगव्याने मोठे झालेल्या केसांचा भांग पाडत मायकडे कप, बशी, चाळणी घेऊन गेलो. आये मला बटर खायचे दोंड रुपये दे.

आईला पैसे मागितले,

माय हसत हसत मला म्हणाली,

छोटे सरकार.. तुम्ही मोठे झाला हायसा आता, बटर खाऊ नये...!

मी तोंड बारीक करून पैसे मागित होतो, माय बोल्ली

बर बर उगी, महोरल्या घरात शिल्प्यात छोट्या डब्ब्यात पाच रुपये हायसा ती घेऊन जा टपरीमध्ये अन् चारू पयची साखर आन सांच्याला अन् तुला दोन बटर आन जाय.

मी उड्या मारीत मारीत महोरच्या घरात गेलो, पिठाच्या डब्ब्यावर उभं राहून पैक काडली अन् शामा अन्नाच्या टपरीमध्ये जाऊन साखर, बटर घेऊन आलो.

माय जवळ येऊन गिल्लास घेऊन बसलो. चमच्याने दोन बटर गिल्लासात बारीक केले, मायने किती मोठी चहा दिली. गिल्लासाला कापडात पकडत म्या परसदरच्या खाटेवर येऊन चहा बटर गिळत बसलो हुतो.

तितक्यात सलम्या आला अन् मला आवाज दिला,

ओ छोटे सावकार..

चला की बकऱ्या राखणीला वखत होऊन रायलाना.

मी पटापट चहा बटर गिळत गिल्लास ओसरीवर टेऊन दिला,मायला आवाज दिला मायव भाकर बांध धुडक्यात बांध.

सालम्या आलासा.

येळ हून राह्यला.

मायना धूडक्यात भाकर बांधली

मी बोकडे, बकऱ्या सोडल्या अन् चार पिल्लांना डाल्याखाली डावलून मायला म्हंटल मायंव मी चालू हायसा रानात बक्रड्या चराया घेऊन.

तू जाता वख्त उटळं परसदरच्या चौकटीपाशी मातीत पुरून ठीव, अन् ... सांच्याला लवकर घरी ई.

छोटे सरकार.. ओ छोटे सरकार.

निघालासा का बक्रड्या घेऊन..?

हाव जी रं सलम्या निघालो हायसा.

आय सलम्या.. हाण्या कुठशिक हायसा?

त्यो युंन राहीलासाना त्याच्या बक्रड्या घेऊन.

हम हम युं राह्यला छोटे सरकार.

ते वरल्या आळीतले कोपीनचे दुकान आज उघडं हायसा. मग त्यो त्याच्या मायच्या संगत राशन आणाया गेलासा, पाटाच्यावर जास्तोवर येतूया बोलला बकऱ्या घेऊन...

तोवर आपण चालत हू पावसापाण्याचं..!

सलम्या आज कसलं कोड्यास घेतलं हाय सा रे लेका तू..?

म्या आज बोंबलची खुडी, मायना दोन बाजरीच्या भाकरी केल्या पहाटं त्या घेऊन आलो हायसा.

तू काय घेऊन आलासा छोटे सरकार.

म्या नई का?

चुलीवर वांगा भाजला दोन, त्याचा मस्त भरीत केला वरून तिखट मिट घालून अन् चिरी, भाकरी आणलियासा...

आज गावच्या वरच्या अंगाला बकऱ्या घेऊन जाऊ, लक्ष्मी आईच्या देऊळा मोहरं अन् रस्त्याला असलेल्या पडक्या महादेवाच्या मंदिरात कवटीच्या झाडाखाली भाकर खाऊसा...

अरे ओ छोटे सरकार, सलम्या भाई... तुम्ही राशन आणया नाय आला का आज..?(हनम्या बोलता झाला.)

(त्याला उत्तर देत छोटे सरकार...)

अरे माही मायला बोलो म्या माय राशन आलंया वरच्या आळीला...

माय म्हणली...

पुढच्या बाजाराच्या दिशी आणु या, सुमी आक्काच्या वावरतलं कामाचं पैक नाय आलं अजून...

हनम्या तू कश्याचं कोड्यास आणलं हायसा आज न्याहारीला..?

म्या आज खूब आणलसा न्याहारीला, दुपारच्याला.

अरे सलम्या रातच्याला आमचा भावजी आला हुता, घरला आक्काला राखीला घेऊन मंग काहायला ईचार्तो भो.

मायना बोंडं, कुरडई, पापड तळलेसा

वांग्याची शाख, राशनचा तांदळाचा भात, गव्हाची खीर काय अन् काय ईचारू नगस.

सलम्या, छोटे सरकार म्या काय म्हून राह्यलो...

बोलकी भाई...

मायला जावयाची मज्जा असता लेको...

जावई म्हणायला पहाटच्याला मामा जातू म्या. तर आण्णा म्हणायला,जावई बापू रहा आले हायसा दोन-चार दिस आराम करा.

लेको आपण कधी जावई हूतो कुणाचं...(अन् मोठ्याने हसाया लागले सगळेच.)

वीस-पंचिवीस बकऱ्या घेऊन तिघेही रानात बकऱ्या चारत होते. दोन-तीन दिवस सलग पाऊस पडल्यामळे निसर्गात जीव आला होता, सर्वदूर हिरवेगार आणि गवतावर पहाटे-पहाटे चमकणारे पाण्याचे दव लक्ष वेधून घेत होते. सलम्या दगडावर बसून बकऱ्या संभाळत होता. हनम्या बिंगोट्याची भिंगरी करून फिरवीत होता, मी छोटे सरकार टेकडीवरच्या लॉकडाऊनमुळे बंद पडलेल्या शाळेच्या भिंतीवर बसून बक्र्याना शिळ फुंकित हुडकत होतो.

हिरवगार गवत बकऱ्या मस्त फस्त करत होत्या, टेकडीवरून दूरवर गाव दिसत होता. गावाची पाण्याची टाकी रंग दिल्यामुळे मस्त चमकत होती आता लक्ष्मी आईचे देऊळही जवळ आले होते.

कोरोनामुळे वस्तीवर शांतता माजली होती. चार महिने झाले तशी वस्तीवरची शाळा भरली नव्हती. शाळेतली मूलं आता मला रोज ईचारु लागली होती.

आमच्या मास्तरीन बाई, खिचडी शिजिनारी बाई कधी शाळेला येणार हायसा? किती दिस झाले?

शाळेतील खिचडी, सुगडी,आमटी भात,उसळ खाली नाय हायसां आम्ही.

मी जरी बऱ्यापैकी शिकलो होतो, पण मी त्यांना काय सांगणार होतो. मीच माझ्या बकऱ्या घेऊन चारत बसलो होतो म्हंटल येईल लेको लवकरच, तोवर तुम्ही घरला अभ्यास करा.

बकऱ्या पुढे जाऊ लागल्या, तसा मला हनम्यानी आवाज दिला. ओ छोटे सरकार चालता का काय? की तुम्हीपण त्या शाळेसारखा बंद हुतात.

मी बकर्यांना शूक, शुक करत पुढे चालत गेलो. दुपार भरायला आली होती लक्ष्मी आयच्या देवळात न्याहारी म्हणून आम्ही जेवाया बसलो होतो.

म्या अर्ध्या भाकरीवर वांग्याचं भरीत घेतलं होतं. सलम्यानं सागाच्या पानावर बोंबलाची खुडी भाकर घेऊन, हनम्यानं सगळ्यांना रातची बोंड दिली अन् तो पण माझं भरीत घेऊन खात बसला होता. बाकीची भाकर दुपारच्यासाठी उपरण्यात गुंढळुन बांबूच्या लाकडाला बांधून ठेवली.

सागाच्या डवण्यात पाणी पिऊन, आम्ही थोडूशी पाठ लांब करून झोपलो होतो बकर्या गवत रवंथ करत बसल्या होत्या.

क्रमशः

लेखक: भारत लक्ष्मण सोनवणे.

संपर्क क्र:९३०७९१८३९३.

औरंगाबाद.

Powered By Sangraha 9.0