सँडवीच

09 Jun 2022 09:30:00


sandwich

भारतीय लोकांसाठी, विशेषतः शहरी लोकांसाठी हा पदार्थ अजिबात नवीन नाही. कित्येक मुलांच्या शाळेच्या डब्यात, कित्येक वर्षांपासून सँडवीच दिले जातेय, पण लहान शहरांमध्ये, गावांमध्ये सॅन्डवीचची तितकी क्रेझ अजूनही नाही. बर्गरच्या माध्यमातून सँडवीच प्रसिद्ध झाले, पण अजूनही रोजच्या जीवनाचा भाग नाही. या पदार्थाच्या जन्माची कहाणी मजेशीर आहे. जॉन मोटांगू नावाच्या ब्रिटिश माणसाला जुगार खेळायची खूप आवड होती. खाण्यामध्ये वेळ वाया जाऊ नये म्हणून त्याने आचाऱ्याला असा पदार्थ करायला सांगितला, जो खात खात त्याला जुगार खेळता येईल आणि सॅन्डवीचचा जन्म झाला. दोन ब्रेडच्यामध्ये मीट, सॉस आणि भाज्या टाकून सँडवीकेले गेले आणि आजही जवळपास तसेच आहे. इंग्लंडमधील भाषा, क्रिकेटप्रमाणेच सॅन्डवीचही जगभर प्रसिद्ध झाले. हॉटडॉग, बर्गर आणि आपला मराठी वडापाव हे सगळे सँडवीचच आहेत, फरक आहे तो वेगळ्या प्रकारच्या ब्रेडचा. हॉटडॉग आणि बर्गरमध्ये पॅटी मुख्यतः असते, सँडविचमध्ये स्लाईसेस असतात.

 

व्हेज आणि नॉनव्हेज प्रकार आहेत, शिवाय ग्रिल्ड, क्लब, रूबेन, पोरीलीनन, फिलाडेल्फिया स्टाईल, शवार्मा स्टाईल, डोनर, ओपन सँडवीच असे असंख्य प्रकार आहेत. मुख्य कल्पना सारखीच, पण ब्रेड आणि सारण वेगळे! यातला सर्वांत गोड आणि छान प्रकार म्हणजे आईस्क्रीम सँडवी, ज्याने कोणी हा प्रकार शोधला त्याला शतशः नमन! ओरियोसारखी बिस्किट्स म्हणजे कुकीज सँडवीच आहेत, आपले जिमजॅमसुद्धा. खायला सोपे आणि करायलाही सोपे असे हे सँडवीच. आता तुम्ही अगदी पॅटी वगैरे घरी करणार असाल तर वेळ लागतो, नाहीतर साधे बटर, जॅम, चीझ सँडवीच तर लहान मुलंही करू शकतात. पाश्चात्य लोक सॉस वापरतात आपण चक्क चिंच आणि पुदिना चटणी वापरतो. हे कमी तर चक्क बटाट्याची भाजी ब्रेडला लावून, ते दोन ब्रेड बेसनाच्या मिश्रणात बुडवून, तळून आपण ब्रेड पकोडा करतात! मराठी लोकांनी बटाटावडा दोन पाव आणि लालचुटुक चटणी, मिरचीसोबत देऊन महाफेमस वडापाव केला. अशी क्रिएटिव्हिटी जितकी भारतीयांमध्ये आहे तितकी कुठेच नाही! गल्लोगल्ली बर्गर, सँडवीच मिळते. फ्रोझन पॅटीज, फ्रोजन सँडविच, रेडी-टू-ईट सॅन्डवीचही मिळते. फ्रोजन पॅटीज घरी आणून ठेवल्यास कमी पैशात बर्गरकिंगसारखे सँडवीकरता येईल. पोटही भरते, मनही भरते आणि वेळही वाचतो.

 

सॅन्डवीचच्या बर्गरकिंग, सबवे यांसारख्या रेस्टारंटच्या चैन्स आहेत. सबवे माझे सर्वांत आवडते. इतकी चॉईस आयुष्यात कधी मिळते हो? ब्रेड, पॅटी, सॉस, भाज्या, चीझ असं सगळं तुमच्या मनाने निवडा, हवं तितकं आणि हवं तसं! सबवेमध्ये ऑर्डर देणे माझ्यासाठी अजूनही तितकीच आनंददायी गोष्ट आहे, दर वेळी काहीतरी नवीन कॉम्बिनेशन ट्राय करता येते! चॉकलेट सँडवीचसारखे प्रकार कधीतरी ट्राय करायला हरकत नाही, पण बंगाली मिठाईमधील मलाई सँडवीच मात्र शाही प्रकार! पनीरच्या मध्ये क्रीम, खवा, मावा असं गोड सारण असतं आणि चिभेवर ठेवताच आपण कॅलरीज विसरतो, जग विसरतो! हा पदार्थ असा आहे की याचे अतिशय हेल्दी आणि अतिशय अनहेल्थी प्रकार एकाचवेळी करता येतात. मल्टिग्रेन ब्रेड, जास्त भाज्या, पनीर/चिकन ग्रिल्ड, कमी सॉस वापरल्यास हेल्थी आहे, नाहीतर मग डॉक्टरांकडून "खा अजून बर्गर आणि पिझ्झे" असं ऐकावं लागू शकतं!

 

इंजिनिरिंगमध्ये दोन या सेमिस्टरचे पेपर आणि मध्ये मागच्या सेमिस्टरचा पेपर कधीकधी यायचा, बॅकलॉग असणाऱ्यांना सलग तीन दिवस परीक्षा द्यावी लागायची, त्याला सँडवीच पेपर म्हणायचे! दोन आवडत्या व्यक्तीच्या भांडणात आपलं मरण होतं, तेव्हाही त्या व्यक्तीचं सँडवीच होतंय असं म्हटलं जातं. उदा., मुलगा, त्याची आई आणि बायको. इतका हा पदार्थ आपल्या आवडीचा, जवळचा झाला आहे. बाकी सर्व ठीक आहे, पण भावनांचं सँडवीच मात्र कधी होऊ देऊ नका, झालंच तर निदान ओपन सँडवीच असावं नाहीतर डोक्याची मंडई होऊ शकते!

- सावनी 
Powered By Sangraha 9.0