गंध फुलांचा गेला सांगून…

29 Jun 2022 09:30:00


flower smell

तुला माहिती आहे का, तू मला किती वेड लावतोस ते? तुला कसं कळणार म्हणा ते. तू काय? वाऱ्याचा हात धरून तुझ्याच धुंदीत लहरत असतोस. बाकी काही बघायला वेळ तर मिळाला पाहिजे ना तुला.

 

तुझी नि माझी पहिली ओळख नक्की कधी झाली ते नाही सांगू शकणार मी, पण मला वाटतं मी अगदी लहान असताना असेल. शेकशेगडीच्या धुराचा वास, तेव्हा कदाचित पहिल्यांदा आपली भेट झाली असेल. आपली ती भेट मला आवडली होती की नाही हे मात्र माहीत नाही हं. खांदे उडवायला काय झालं तुला? कोणता गंध कधी आवडेल काही सांगता येतं का? आता माझंच बघ ना... पूर्वी मला पेट्रोलचा वास खूप आवडायचा, पण आता नको वाटतो. स्टोव्ह बंद केल्यावर यायचा तो वासही आवडायचा, अजूनही आवडतो, पण आता स्टोव्ह कुठं वापरले जातात एवढे. म्हणून म्हटलं रे, तेव्हाची आपली भेट कशी होती काय जाणे. तेव्हाचं ते जाऊ दे, पण जशी मी मोठी होत गेले, तशी माझी वेगवेगळ्या फुलांशी गट्टी जमली आणि मग अर्थातच तुझ्याशीही. त्या देखण्या फुलांना बघत राहू की, तुला उरात साठवून ठेवू अशी अवस्था होते बघ माझी. किती मंद दरवळत असतोस रे तू! तुझा सात्त्विक दरवळ आसपास जाणवला ना की, मन एकदम प्रसन्न, उल्हासित होऊन जातं. प्रत्येक फुलाबरोबरचा तू किती वेगवेगळा असतोस रे... तुला माहिती आहे, मी ना माझ्या अंगणात मोगरा, मदनबाण, जुईची झाडं लावली आहेत. उन्हाळ्याच्या स्वागतासाठी रोज सज्ज होतात ती. रात्री मदनबाण फुलायला लागला की, मी तिथे जाऊन बसते. मंद वाऱ्याबरोबर येणारा सुगंध... आहाहा! जीव ओवाळून टाकावा वाटतो रे अगदी. काय जादू असते तुझ्यात की बाकी सगळं जग विसरायला लावतोस. अगदी उठू नये वाटतं तिथून. मग दुसऱ्या दिवशी त्या फुलांचा गजरा केसात माळला की, माझ्याबरोबर तुलाही सोबत घेऊन फिरते मी. सगळं घर तुझ्यामुळं प्रसन्न... गजरा काढला तरी केसांना मात्र तू पटकन सोडून जात नाहीस. तुलाही तिथं असं रेंगाळायला आवडतं का? चाफा फुलला की, झाडापाशीच पाय अडकून बसतात. पाणी घालण्याच्या निमित्ताने मन तिथं जास्त वेळ घुटमळलं जातं मग. त्याचीही वर्णी केसात लागते अध्येध्ये. बकुळीबद्दल तर काय बोलू रे... तिथं तू जीव घेतोस रे अगदी. कित्ती कित्ती आठवणी जाग्या होतात तुझ्यामुळे माहिती आहे? तुझ्यात गुंतत बकुळीच्या त्या नाजूक फुलांचा हळुवारपणे गजरा करायचा, वेणीत माळायचा आणि नंतर काढून उशाशी ठेवून द्यायचा... काय सुख आहे यात... बकुळीची फुलं कोमेजली तरी तू मात्र अगदी पहिल्यासारखाच टवटवीत. बकुळीच्या प्रेमातबिमात पडला आहेस की काय रे? तिला सोडवून जाववत नाही तुला ते. अगदी हं... किती लाजतोयस! फुलं आणि तू... किती गोड जोडी आहे तुमची! तुमच्याबद्दल लिहायचं म्हटलं ना तर प्रबंध होईल एखादा. हसू नकोस... खरंच सांगतेय.

फुलांसोबतची तुझी साथ आवडतेच मला, पण अजून एकेठिकाणचा तू फार फार लाडका आहेस माझा. पहिला पाऊस पडल्यावर तापलेल्या मातीतून हलकेहलके वर येणारा तू... तेव्हाचा तू म्हणजे तर... काय बोलू? बोलण्याची गोष्टच नव्हे ही. अनुभवायलाच पाहिजे तुला. जलबिंदूंनी मातीशी केलेली सलगी पाहून तू खूश होतोस की काय? पण तिथं मात्र काही क्षणच तुझं अस्तित्व जाणवून देतोस तू. एवढी कुठं पळायची घाई असते तेव्हा?

 

अजून तुझं असणं केव्हा आवडतं मला सांगू... इवल्याइवल्या बाळांना जेव्हा मालीश करू, अंघोळ घालून, पावडर-तीट लावून, दुपट्यात गुंडाळून झोपवतात ना, तेव्हा त्यांच्या खोलीत असतोस ना तू? त्या निरागस बाळासारखाच वाटतोस तू मला... एकदम निरागस. तेव्हा त्या बाळाची खोली सोडून जावं वाटत नाही की नै. खरं खरं सांग

 

असा अजून बऱ्याच ठिकाणचा तुझा दरवळ आवडतो मला. जंगलात फिरत असताना जाणवणारा जरासा ओलसर दमट असा तू, गाभाऱ्यात देवाला वाहिलेल्या वेगवेगळ्या फुलांसोबत प्रसन्नतेने दरवळणारा तू, स्वयंपाकघरात एखादा पदार्थ शिजत असेल तर तेव्हा झाकणाच्या फटीतून हळूच बाहेर सटकणारा तू, पुस्तकाचं कपाट उघडलं की कोपऱ्यात ठेवलेल्या डांबरगोळीतून फटकून बाहेर पडणारा तू, कोऱ्या पुस्तकाच्या पानापानातून नवेपणाचा डौल दाखवणारा तू, धुतलेले कपडे झटकून वाळत घालत असताना पाण्याच्या त्या बारीक फवाऱ्याबरोबर हवेत मिसळणारा तू... अरे अजून किती सांगू! जसं लिहीत जातेय ना तसतसं प्रत्येक ठिकाणचा जाणवतोयस तू मला माझ्या अवतीभवती. किती वेडा आहेस खरंच!

 

पण एक सांगू... मला ना कायम निसर्गाचं, निसर्गाच्या निर्मितीचं आश्चर्य वाटतं. खरं म्हणजे तुझा जन्म पक्षी, कीटक यांच्यासाठी झालाय ना? तू त्यांना आकर्षित करून घ्यायचं आणि त्या झाडाची पुढची पिढी तयार करण्यात त्यांना मदत करायची. हो ना? ते काम तू उत्तम तऱ्हेने नक्कीच पार पाडत असशील, मला खात्री आहे. पण आम्ही माणसं बघ की किती आपलाच विचार करतो. तुला कायम जवळ ठेवण्यासाठी काय काय करतो. अत्तर काय, उदबत्ती काय, वेगवेगळ्या पावडरी काय... पण नैसर्गिक गोष्टींची सर थोडीच येणार त्याला. खरं ना?

 

तुझ्या आठवणीत तुला पत्र लिहायला घेतलं आणि रमले बघ त्यातच. आता मात्र थांबते हं. एक मात्र ऐकशील... कुणालाच कधी सोडून जाऊ नकोस प्लिज.

 

- कायमच तुला माझा मानणारी एक वेडी

जस्मिन जोगळेकर

Powered By Sangraha 9.0