मराठी आणि मध्य प्रदेशातील लोकांच्या घराचा नित्यनियमाचा नाष्ट्यातील पदार्थ म्हणजे पोहे. पोह्यांचा इतिहास अगदी महाभारताच्या काळापर्यंत जातो, इतका जुना आहे. कृष्ण आणि सुदाम्याच्या मैत्रीचे प्रतीक म्हणून चार पोह्यांचे दाणे आजही द्वारकेच्या मंदिरात प्रसाद म्हणून दिले जातात. तांदुळापासून वेगवेगळ्या आकाराचे पोहे बनवले जातात. पातळ पोहे चिवड्यासाठी आणि त्याहून थोडे जाड पोहे कांदेपोह्यांसाठी वापरले जातात.
फोडणीत जिरे, मोहरी, मिरच्या, कधीतरी बडीशेप, कढीपत्ता, शेंगदाणे, हळद घालून भिजवलेले पोहे परतवले की, झाली डिश तयार. यात आवडीप्रमाणे कांदे/बटाटे/कोथिंबीर आणि लिंबू असते. गुजरात आणि राजस्थानमधील पोह्यांमधे थोडी साखर असते आणि शेव/गाठीसोबत खाल्ले जातात. मध्य प्रदेश आणि उत्तरप्रदेशमध्ये पोहे हे जिलेबीसोबत खातात. इंदोरी पोहे डाळिंबाचे दाणे आणि जाडसर शेव याने सजवले जातात. मराठी घरांमध्ये पोह्यांवर खोबऱ्याचा किस असतो, बाहेर दुकानात कोथिंबीर आणि नागपूरला तर चक्क तर्री पोहे खातात. कारवार पद्धतीत काजू, ओले खोबरे घालून लाल पोहे बनवतात, यात बहुदा हळद नसते. बंगाली पोह्याच्या प्रकाराला चिरेर पुलावही म्हणतात. यात गाजर, काजू, मटार आणि मनुकेही असतात. दहीपोहे म्हणजे एक कंफोर्ट फूड. दह्यात पोहे भिजवून, त्या मऊसर मिश्रणाला उडद डाळ, लाल मिरच्या, कढीपत्ता, जिरे आणि हिंगाची फोडणी असते. महाराष्ट्रात कृष्ण जन्माष्टमीला हा पदार्थ गोपाळकाला म्हणून प्रसिद्ध आहे. कृष्ण लहान होता तेव्हा त्याच्या सवंगड्यांसोबत जेवायला बसायचा आणि प्रत्येकाच्या घरून आलेला पदार्थ एकत्र करून हा गोपाळकाला बनवला जायचा अशी कथा आहे. कर्नाटकमध्ये कारा अवलक्की बनवतात. यात जिरे, मोहरीसोबत, चणा डाळ, उडद डाळ, अद्रक आणि एक मसाला असतो. गोज्जू अवलक्की हा पण कर्नाटकी आणि महाशिवरात्रीला बनवला जाणारा प्रकार. हे पोहे आणि आंध्रमधील चिंच पोहे जवळपास सारखेच. मराठी कोकणी लोक भरपूर ओले खोबरे घालून, पोहे न भिजवता दडपे पोहे बनवतात, तो एक चविष्ट प्रकार!
पोह्यांचे कटलेट, पॅटिस, इडली, वडे असे काही फ्युजन आहेत पण मराठी लोकांसाठी कांदेपोहेच खरे आणि बाकी मग त्या त्या प्रांतानुसार! पोह्यांपासून केरळमध्ये खीर बनवतात, अतिशय छान असते. काकडीच्या कोशिंबिरीत मीठ असल्यामुळे पाणी सुटते, त्यावेळी थोडे पोहे घातले तर ते पाणी शोषले जाते. (महिलांच्या मासिकात येतात तश्या टिप्स द्यायला सुरवात केली मी) मॅगी, एमटीआर इन्स्टंट पोहे बाजारात आणले आहेत. मॅगीचे खरंच छान आहेत आणि एमटीआरचे खट्टा मिठा पोहा जरा वेगळा आहे. कधीकधी मला वाटते, केवळ पोह्यांचे वेगवेगळे प्रकार मिळतील असे रेस्टारंट सुरु करावे. जसे डोश्यांचे प्रकार मिळतात ना, इटालियन, चायनीज पोहे वगैरे. कांदेपोह्यांच्या किंचित अपमान झाल्यासारखा वाटेल पण गर्दी वाढेल. कदाचित असे शॉप्स असतीलही.
इंदोरी पोहे चांगले की, मराठी कांदेपोहे हा वाद नेहमीच रंगतो पण एक मराठी म्हणून मी एक सांगेन की, आम्ही कांदेपोह्यांना अतिशय मानाचे स्थान दिले आहे. कारण लग्नाआधी मुलामुलींचे कुटुंब भेटते त्या कार्यक्रमाला चक्क "कांदेपोह्यांचा कार्यक्रम" असे मराठी घरांमध्ये म्हटले जाते.मुलीच्या डोळ्यात भीती, चेहऱ्यावर लाजेमुळे आलेली लाली, मुलाच्या चेहऱ्यावरील "काय प्रश्न विचारू" हे भाव किंवा चेहरा पाहून क्षणार्धात झालेला निर्णय, पालकांच्या "काय ठरते, देव जाणे" या नजरा, या सगळ्याचा साक्षीदार निदान मराठी घरांमध्ये तरी कांदेपोहे असायचे. लग्न ठरले तरी पाहुण्यांना परत जातांना चिवडा-लाडूची पाकिटे दिली जायची, तो चिवडाही पोह्यांचा किंवा पोह्याचा चुलतभाऊ मुरमुरे यांचा. असं सगळीकडे आपलं अस्तित्व दाखवणारा हा पदार्थ! मला आठवते, कोविडमधून बरं झाल्यावर माझ्या तोंडाला चव नव्हती तेव्हा चायोसचा अद्रक, विलायची घातलेला चहा आणि गरमागरम पोहे खाल्ले होते. परक्या शहरात एकटं राहत असतांना, अचानक माणसात आल्यासारखं वाटलं होतं. या घटनेमुळे पोह्यांना मी कधीही कमी लेखू शकणार नाही!