एकल पालकत्वाचा दुस्तर घाट

17 Jun 2022 10:21:55


single parenting

आई आणिक बाबा यातील कोण आवडे अधिक तुला? सांग मला रे सांग मला हे गमतीशीर गाणं जवळपास प्रत्येक मराठी माणसाने आपल्या बालपणी ऐकलेलं आहे. अशा प्रश्नांनाही आपण लहानपणी सामोरे गेलेले असतो. त्याची गमतीदार उत्तरं, रुसवेफुगवे हे सशक्त कुटुंबाचंच प्रतीक असतात. पण, ‘आई आणि बाबाऐवजी आई किंवा बाबायातील कोण आवडे अधिक तुला असं जेव्हा मुलांना विचारलं जातं तेव्हा मात्र ती मनातून हबकतात. आज समाजापुढे अनेक आव्हानं आहेत. त्यातही कुटुंब पातळीवरील आव्हानं अधिक प्रखर होत चालली आहेत. त्यातलं एक आव्हान आहे सिंगल पॅरेंटिंग अर्थात एकल पालकत्वाचं. भारतीय समाजाने गेल्या शंभर वर्षात अनेक बदल पाहिले. विवाहसंस्थेत होत गेलेले बदल, गावाकडचं वडीलधाऱ्यांच्या अधिकारात चालणारं एकत्र कुटुंब, शहरातलं(आता गावातलंही) चौकोनी असं विभक्त कुटुंब, तरुणांचं तुझं-माझं असं दोघांचंच कुटुंब, लिव्ह इन नातेसंबंध, एकमेकांशी न पटल्याने वेगळं होण्याचा निर्णय घेणं, एकटं राहाणं, परिस्थितीशी जुळवून घेत एकट्यानेच मुलांना वाढवणं हे सारं परिवर्तन आपण आजूबाजूला पाहत आलो आहोत.

 

आपण अनेक सोनेरी स्वप्न बघत नव्या जोडीदारासह आयुष्याचा प्रवास सुरू करतो. योग्य वेळी चिमुकल्याचाही प्रवेश या सोनेरी कुटुंबात होतो. मुलाबाळांसह आपण हा प्रवास आनंददायीपणे एन्जॉय करत असतो. पण काहीवेळा पुढे गणित चुकत जातं. काहीवेळा सुरुवातीसच ते चुकलेलं असतं पण त्याची जाणीव मात्र परिस्थितीचे चटके बसायला लागल्यावर होते. वाद वाढत जाऊन घटस्फोटापर्यंत किंवा विभक्त होण्यात याची परिणिती होते. यानंतर सुरू होतो एकल पालकत्वाचा प्रवास. मुळात पालकत्वाची वाट कठीण, त्यात एकल पालकत्वाची वाट अधिकच जीवघेणी.

 

तरुणाईच्या मनात आणि तनात जोश असला तरी भले भले या आव्हानापुढे गारद होतात. पण माघार घेण्याची इच्छा नसते, काही वेळा तशी परिस्थितीही नसते. अपत्य मुलगा आहे की मुलगी, त्याचा अधिक लोभ कुणावर आहे(हे अगदी साहजिक आहे), त्याचा स्वभाव मनमोकळा आहे की मनस्वी, शाळेतील त्याची वर्तणूक कशी आहे, एकत्र कुटुंब असेल तर बाकीच्या नातेवाईकांशी त्याचे संबंध कसे आहेत या साऱ्या मुद्द्यांच्या आधारे एकल पालकत्वाची जडणघडण होत असते. मुळातच पतीपत्नी बिघडलेल्या मानसिकतेतून प्रवास करत असतात. निसर्गाने मुळात डिझाईन केलेलं पालकत्वाचं गणित या एकल पालकत्वात बिघडतं. म्हणजे दोघांपैकी कोणीतरी एक मायाळू असतं, तर दुसरं करारी असतं, कोणी अभ्यास घेण्यात पटाईत असतं तर कोणी भावनिक पोषण करणारं असतं. कोणी आपल्या वर्तणुकीतून सामाजिक जाणिवा बळकट करतं तर दुसरं कौटुंबिक ताणेबाणे जपत असतं. म्हणजे मुलांना दोघांचीही गरज असते. बाबा आईच्या भूमिकेला पूर्णपणे न्याय देऊ शकेल असं नाही आणि आईही पूर्णपणे बाबा होऊ शकेल असं नाही. ते तसा पुरेपूर प्रयत्न करतीलही, पण त्याच्याआड मनात एखादी बोच असूच शकते. या सगळ्याचा एकत्रित परिणाम मुलांच्या सर्वांगीण विकासावर तर होतोच, त्याचवेळी तरुण मनाच्या, आयुष्याचे सगळे रंग न अनुभवलेल्या पालकांवरही होत असतो. यातून निर्माण होणारी चीडचीड, जोडीदारासोबतच्या वादांचा मुलांवर निघणारा राग, तो राग दडपायचा तर अंतरंगात होणारी घुसमट अशा अनेक टप्प्यांतून एकल पालक आणि त्यांची मुलं प्रवास करतात.

 

बऱ्याचदा महिलांना मुलांची पूर्णपणे आर्थिक जबाबदारीही घ्यावी लागते. तर बाबांजवळ मुलं राहणार असतील तर आईपणाची सर्व कर्तव्य त्यांना पार पाडावी लागतात. अशा वेळी मुलांना समजून घेणं, त्यांना होरपळू न देता वास्तवाची जाणीव करू देणं गरजेचं असतं. अनेकदा अशा वातावरणात मुलांच्या वर्तणुकीत फरक पडतो. मुलं अचानक अबोल होतात. काहीवेळा विनाकारण त्रागा करतात. अशावेळी त्यांची बाजू समजून घेणं आवश्यक असतं. अशा परिस्थितीत आपल्याला पाठिंबा देणाऱ्या, समजून घेणाऱ्या अन्य नातेवाईकांच्या संपर्कात राहाणं, त्यांना आपल्या कुटुंबात सामावून घेणं, आपल्या विवंचना दूर ठेवून मुलांना वेळ देणं, वयानुसार त्यांना समजतील अशा भाषेत आपल्या समस्या सांगणं, दुसऱ्या पालकाबद्दल मुलांच्या मनात किल्मिश निर्माण होऊ न देणं अशा अनेक गोष्टी एकल पालकाला कराव्या लागतात. किंबहुना ते करणं गरजेचं आहे. या पालकांनाही मानसिक आधाराची गरज असते, अशा वेळी कुटुंबीय, मित्रपरिवार यांनी त्यांना समजून घेणं आवश्यक असतं.

 

विभक्त होणं किंवा लग्न मोडणं एवढंच कारण एकल पालकत्वाला असतं असं अजिबात नाही. फक्त ज्याला आपण रिस्क फॅक्टर म्हणतो तो यात जास्त असतो. या पलिकडे पतीच्या पश्चात आपल्या चार चार मुलांना लोकांच्या घरी पोळ्या लाटून वाढवणाऱ्या, शिक्षण पूर्ण करून नोकरी करून शिकवणाऱ्या, पूर्णवेळ गृहिणी असताना नंतर करिअरिस्ट होऊन मुलांच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणाऱ्या महिला आपल्या आजूबाजूला आहेत, या आधीच्या पिढीनेही त्या अनुभवल्या आहेत. प्रत्यक्ष माझ्या आजीने वयाच्या पस्तिसाव्या वर्षापासून(कारण आजोबा त्यांच्या चाळिशीतच गेले) मुंबईत एकटीने पाच मुलांना वाढवलं, मोठं केलं. आपल्या बिघडलेल्या नात्यांचा परिणाम मुलीवर होऊ न देणाऱ्या नीना गुप्ता, ठरवून एकल पालकत्व स्वीकारणारी सुष्मिता सेन, करण जोहर आपल्याला माहिती आहेतच.

 

पाश्चात्य जग आज आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असलं तरी तेथील कुटुंब विभक्त होण्याचं परिणाम अधिक आहे. एकल पालकत्वाच्या आगीत आज दोन तीन जनरेशन होरपळली आहेत. त्यामुळेच कदाचित आज तिकडे DINK(डबल इन्कम नो किड्स) पॉलिसीचा प्रचार होतो आहे. आपल्याच नात्याबद्दल साशंक असणारी पिढी आज पुढच्या पिढीचं अस्तित्वच नाकारते आहे. अशा वेळी आपण भारतासारख्या देशात जन्माला आलो याबद्दल देवाचे आभार मानले पाहिजेत. अजूनही कुटुंब हा येथील संस्कृतीचा पाया आहे. त्यामुळे विभक्त होण्याऐवजी चर्चा करून मध्यममार्गाच्या आधारे एकमेकांशी जुळवून घेणं, परिस्थितीमुळे विभक्त झालो तरी कुटुंबाला पकडून राहाणं, समाजाशी जोडलेलं राहाणं, मुलांना कुटुंबाचा अनुभव मिळावा म्हणून द्वितीय विवाहाचा पर्याय सकारात्मकतेनं निवडणं व आपल्या पार्टनरच्या मुलांनाही खुल्या मनानं स्वीकारणं, आपली मुलं म्हणून त्याचा सांभाळ करणं, स्त्रियांनी आपल्या पायावर उभं राहाणं, पुरुषांनीही मुलांशी आईप्रमाणे सहृदयी संवाद साधणं, त्यांना समजून घेणं, कुटुंबानेही वेगळं होण्याची इच्छा असणाऱ्यांची समजूत काढणं किंवा परिस्थितीनुसार मोकळ्या मनाने विभक्त होण्याच्या निर्णयाचा स्वीकार करून पाठिंबा देणं या सगळ्याची एकल पालकत्वात मोलाची भूमिका आहे. एकल पालकत्वाची ही वाट सोपी नक्कीच नाही. पण ती चालणं अशक्यही नाही. काटे टोचले तरी ते झोळीत भरून पुढे चालत राहाणं आणि मुलांसाठी फुलाची वाट तयार करणं हेच आपल्या हातात आहे.

- मृदुला राजवाडे
Powered By Sangraha 9.0