आज केवळ भारतीयच नव्हे, तर मराठी लोकांनी बनवलेल्या, कित्येक लोकांच्या मनावर आणि पोटावर (पदार्थाची चव छान असेल तर मनही खुश होते) राज्य करणाऱ्या, मिसळ महाराणी बद्दल आज बोलणार आहे.
उसळ आपली साधी राणी आहे, पण मिसळ महाराणी! या पदार्थाचा जन्म नाशिक किंवा खान्देशमध्ये झाला असं म्हणतात. कारण नाशिकमध्ये भगवंतराव मिसळ आणि कमला विजय मिसळ ही दुकाने अनुक्रमे ७५ आणि १०० वर्षांहून जुनी आहेत. हे वाचून कोल्हापूरकर चिडतील आणि पुणेकर नेहमीप्रमाणे वाद घालतील पण इतका जुना पुरावा या दोन्ही शहरांकडे असल्यास त्यांनी बोलावे! दुर्दैवाने भगवंतराव यांची मिसळ १९८३ तर कमला विजय २०१६ मध्ये मिळणे बंद झाले. एकेकाळी मिसळीचा रस्सा/तर्री हवी तितकी मिळायची आणि कामगार लोक त्यासोबत भाकरी खायचे. काही काळाने भाकरीऐवजी सहज मिळणारा पाव खाणे सुरु झाले आणि एक प्लेट मिसळीसोबत चक्क १२ पाव खाण्याचे रेकॉर्ड बनायला सुरवात झाली. पोटभरीचा आणि सोयीचा पदार्थ म्हणून कामगारांनी मिसळीला स्वीकारले, पण आता तिने मोठमोठ्या हॉटेल्समध्ये स्थान मिळवले आहे.
मिसळीमध्ये मुख्यतः तीन भाग असतात. कडधान्यांचा रस्सा/तर्री/कट, चिवडा/फरसाण/कांदा वगैरे आणि पाव. याव्यतिरिक्त शहरानुसार रेसिपी, चव आणि सर्व्ह करायची पद्धत बदलते. नाशिक, कोल्हापूर, पुणे, मुंबई/ठाणे हे अतिशय लोकप्रिय आणि खान्देशी, नागपुरी या त्यात जरा कमी ग्लॅमर असलेले प्रकार. अक्खा महाराष्ट्र एकजूट करायची ताकद माझ्यामते दोन पदार्थांमध्ये आहे. एक मिसळ आणि दुसरी पुरणपोळी! पुणेरी मिसळ कमी मसालेदार, काहीशी आंबटगोड, शेव-चिवडा, बटाट्याचे काप/भाजी यांच्या थरांची असते. नाशिकच्या मिसळीचा रस्सा/कट काळ्या मिऱ्याचा आणि मिरचीचा सढळ हस्ताने वापर करून बनवतात आणि म्हणूनच तिखट चव बॅलन्स करायला सोबत दही, पापड देतात. मुंबईच्या मिसळमध्ये बटाटे नसतात आणि पुणेरी मिसळीहून अधिक तिखट, कोल्हापुरी मिसळपेक्षा कमी तिखट असते. कोल्हापुरी मिसळीत सर्वांत जास्त महत्त्व असते कांदा-लसूण मसाल्याला आणि सोबत पाव नसतात तर ब्रेड स्लाईसेस असतात. इतर कोल्हापुरी पदार्थांप्रमाणेच ही पण डोळ्यातून पाणी आणू शकते. खान्देशी प्रकारात खोबरे आणि काळा मसाला असतो, तिखट नसते पण मसालेदार असते. नागपुरी तर्री-पोहा संस्कृतीमध्ये साजेशी अशीच मिसळ आपल्या समोर येते. थोडक्यात काय तर प्रत्येक प्रदेशाने आपापल्या आवडीनुसार या पदार्थाला बदलले आणि स्वीकारले. आता मात्र लोकांनी पुढची पायरी गाठलीये, वाद घालतात सोशल मीडियावर "अस्सल मिसळ कोणती? चविष्ट कोणती?" या सगळ्या लोकांना दोन-चार महिने युरोपमध्ये पाठवायला हवे, तिकडून परत आले कि २-३ वर्षे असले फुकटचे वाद घालणार नाहीत. असे खुनशी आणि महागडे विचार माझ्या मनात येतात, शिक्षा म्हणून युरोपला पाठवणं महागच!
"अपोझिट अट्रॅक्टस" या उक्तीला साजेशा हा पदार्थ. म्हणजे पहा, मोड आलेली कडधान्ये अतिशय पौष्टिक पण साथीला तेलाचा तवंग, मसाले, फरसाण आणि चक्क पाव! कमी तेल वापरून बनवल्यास आणि फरसाण कोथिंबिरीइतके शिंपडल्यास हेल्थी फूड म्हणून सहज खपून जाईल पण आपल्या मनाचे, जिभेचे लाड पुरवले जाणार नाहीत. बऱ्याच ब्रॅंड्सनी इन्स्टंट मिसळ बाजारात आणली आहे, महाराष्ट्रात तर जागोजागी मिळते पण इडली-डोसा जसा जगभर प्रसिद्ध आहे तशी ही महाराणी नाहीये हो. अजूनही एखाद्या लहानश्या संस्थानाची महाराणी आहे पण पोटेंशिअल जगभर राज्य करण्याचे आहे बरं! आपण मराठी लोकांनी मनावर घ्यायला हवे, तसं पाहता मराठी पदार्थ अजून फार भारतभर पोहोचलेच नाही आहेत.
किती गम्मत आहे बघा, मुंबई-पुण्यात जगभरातून लोक येतात पण कांदेपोहे (यावर पण इंदोरचे लोक हक्क सांगतात), वडापाव आणि फारतर पुरणपोळी, मोदक याव्यतिरिक्त पदार्थ परप्रांतीयांना सांगता येणार नाहीत.
या पदार्थासाठी काही विशिष्ट ऋतू, वातावरण लागत नाही. टळटळीत उन्हाळ्यात लोकांना तिखटजाळ मिसळ खातांना, ज्यूस असल्यागत घटाघटा तर्री पितांना पाहिलेय मी! निरपेक्ष प्रेम असते ते हेच असावे. हा काही घरी बनणारा पदार्थ नव्हे. कारण महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात एकतरी असे हॉटेल असते, जिथली केवळ मिसळ खायला लोक येतात. मिसळीसोबत गोड म्हणून जिलेबी मिळते. मागे एकदा जिलेबीच्या लेखात मी मिसळीचा किस्सा लिहिला होता. रोज साधं-वरण, भात, तूप खाणाऱ्या लोकांनी कोल्हापूर अभी बहोत दूर है म्हणत सुरवात पुणेरी मिसळ खाण्यापासून करावी. तुम्ही तिखट खाणारे नसलात तरी हा पदार्थ तुमचे मन जिंकून घेतो. शेवटी इतकेच म्हणेन की, आता "मिसळ चळवळ" उभी राहायला हवी. फूड प्रोसेसिंग मधील लोक अजून संशोधन करतीलच पण इतर तोपर्यंत महाराष्ट्रा बाहेरही मिसळ-कॅफे, चेन्स सुरु व्हायला हव्यात. ब्रॅण्डिंग, मार्केटिंग केले की, तेज तर्रार मिसळ नक्कीच जगभर नाव कमावेल, नाहीच तर किमान लोकांच्या डोळ्याच्या डोळ्यात पाणी आणू शकेल.