मेघ मल्हार….

15 Jun 2022 11:39:14



megh mhalhar 

कसं आहे ना...मला काही तुला आळवता येणार नाही. म्हणजे तसा प्रयत्नही करणार नाहीये मी. म्हणून म्हटलं सरळ तुला पत्र लिहावं. मी खूप जणांकडून ऐकलं आहे, पुस्तकांमधून वाचलं आहे... पूर्वीच्या कसलेल्या गायक मंडळींनी तुला आळवलं की, लगेच मेघ दाटून यायचे आणि पाऊस बरसायला लागायचा. असं खरंच व्हायचं का रे?... म्हणजे मला कोणावरही अविश्वास दाखवायचा नाहीये, पण ऐकून आश्चर्य वाटतं म्हणून विचारलं फक्त. हल्ली कसं झालंय ना, वसंत आला आला म्हणेपर्यंत लगेच जातो आणि मग ग्रीष्माचा तडाखा त्रास द्यायला लागतो. होळी विझवायला पाऊस येतो म्हणतात. पण हल्ली त्याचाही काही भरवसा नसतो रे. लाही लाही करणारा उन्हाळा सुरु झाला की नको नको होऊन जातं. मग अशावेळी पाऊस पडायला हवा असं फार वाटतं. पण ते काय आपल्या हातात असतं का? तुला आळवलं आणि पाऊस आला असंही आता होऊ शकत नाही. पाऊस हवाय म्हणून तुला साकडं घालायला हे पत्र लिहित आहे. काही करु शकशील का रे तू? म्हणजे सहज जमलं तर हंउगाच जीवाचा आटापिटा करुन नको.

 

बरं... पण एक सांगू? मला, तुला जरी आळवता येत नसलं ना तरी दुसरं कोणी सुरात आळवत असेल तर, ते ऐकायला मात्र खूप आवडतं. काय जादू आहे रे तुझ्यात! भलेही पाऊस न पडो, पण तुझे सूर ऐकले की आत खोलवर कुठेतरी श्रावण सरींसारख्या हलक्या सरी अलवार बरसू लागतात आणि एक वेगळाच माहोल तयार होऊन जातो. त्यातून बाहेर पडावं वाटतंच नाही. तुझे सूर जरी गंभीर असले ना तरी त्यात मधुरताही आहे रे. त्यामुळं ते 'आनंदाचे डोही आनंद तरंग' अशा समाधी अवस्थेतच घेऊन जातात कायम. शास्त्रीय संगीतातला तू तर एकदम ऐसपैस. फुरसतीने सुरांची ओळख करुन देत देत जेव्हा मध्य लयीतून द्रुत लयीत पोहोचतोस ना, तेव्हाची मजा औरच! तानांची बरसात सुरु झाली की अंगावर अक्षरशः सर्रर्रर्रर्रकन् काटा येतो. दमदार आवाजातून जर या ताना ताकदीने निघत असतील ना तर मग बघायलाच नको. तुझ्या सुरांनी गुंफलेली बंदिश संपली तरी तू मात्र आसपासच रेंगाळतो आहेस असंच वाटतं. किती ताकद आहे सुरात! पण चित्रपट गीतात जेव्हा तू भेटतोस तेव्हा मात्र कायम घाईतच असल्यासारखा वाटतोस. तुझे सूर समोर येऊन पकड घेईपर्यंत कधी निघून जातात कळतही नाही. अगदी त्या मावळत्या सुर्यासारखा वाटतोस तेव्हा. तो पण नाही का….त्याचं इतकं लोभसवाणं रुप भरभरुन पाहू, मनात साठवू असं वाटतं असतं, तोवर मावळतीची कड धरुन हळूच कधी निसटून जातो समजत नाही. अगदी तस्सा भासतोस गाण्यांमधला तू! तुला खूप वेळ निरखायचं समाधान मिळत नाही ना तेव्हा, थोडी रुखरुख वाटते एवढंच...बाकी समाधी अवस्था तीच. पण जरा थोडक्यात...पॉवर नॅप घेतात तशी.

 

तुम्हां रागांना ऐकायला जसं मला आवडतं ना, तसं तुमच्याबद्दल जाणून घ्यायलाही आवडतं. म्हणजे तुमच्या सुरांमधून तुमची ओळख होतेच...तीच जास्त महत्त्वाची हे ही माहितेय, पण तरी...तुमच्याबद्दल काही वाचण्यातही वेगळी मजा असते रे. तसं तुझ्या आणि दीपक रागाबद्दल एक गोष्ट वाचनात आली होती बघ. पूर्वीच्या काळी म्हणे तानसेनाने दीपक राग आळवायला सुरुवात केली. अगदी तन्मयतेने, जीव ओतून गाऊन झाल्यावर म्हणे त्याच्या अंगाचा भयंकर दाह होऊ लागला. दीपक रागाचा प्रभाव होता तो. राजदरबारातील वैद्य झाले, कितीतरी उपचार झाले पण तो दाह काही शमेना. मग त्याच्याच शिष्येने तुझ्या सुरांना आळवल्यावर तुझ्या बरसण्याने तानसेनाच्या शरीराचा दाह विझून गेला. किती ताकद असेल रे तुमच्या सगळ्यांच्याच सुरात! ज्याच्या मुखातून तुमचे सूर अशा रीतीने बाहेर पडत असतील त्याची ताकदही मोठीच असणार हे ही खरंय. कमाल कमाल!

 

तुला कळलं असेलच...पण हल्ली ना आजारी रुग्णांना बरं करण्यासाठी तुमचा खूप उपयोग होतो हे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालंय. ग्रेट ना...प्रत्येक रागाचा कोणत्या ना कोणत्या आजारावर उपाय म्हणून उपयोग होतो. मानसिक आरोग्याशी जास्त संबंधित असेल हे. मन शांत तर तन शांत...आणि मन शांत करायला तर तुम्ही सगळे समर्थ आहातच. तुमचे सूर कानावर पडले की आनंद तर मिळतोच, पण त्याच बरोबर मानसिक, शारीरिक आरोग्यावरही ते नकळत परिणाम करत असतात. हे किती मोठं काम करताय रे तुम्ही!

 

बघ...असं होतं कधी कधी माझं...विषय कुठं सुरु केला आणि पोहोचला बघ कुठं. बाहेर इतकं तापायला लागलंय म्हणून तुझी आठवण आली. म्हणून तुला पत्र लिहायला बसले आणि बाहेरचं तापमान विसरुनच गेले. आत्ता भानावर आल्यावर जाणवायला लागलं बघ परत. मला ना आता या उष्म्याला हरवायचा उपाय सापडलाय. तुला फक्त पत्र लिहेपर्यंत जर त्याला मी विसरु शकत असेन, तर रोज रोज तुझे सूर ऐकायला लागले तर किती फरक पडेल ना! मला तुला आळवायला येत नसलं तरी काय झालं...तुझ्या सुरात चिंब चिंब भिजू तर शकतेच ना! पाऊस तर हवा आहेच, पण आता त्याचं येणं जरा मागे-पुढे झालं तरी हरकत नाही ना! चल... आता लिखाण थांबवते आणि तुझ्या सुरांच्या आसपास रेंगाळते.

…. सुरांची वेडी

 - जस्मिन जोगळेकर
 
Powered By Sangraha 9.0