मोबाईलच्या विळख्यात कोमेजतंय कोवळेपण

10 Jun 2022 10:15:59


mobile

 (फोटो सौजन्य  : गुगल)

पुण्यातील पिंपरीसारखं विकसित शहर. या शहराला नुकत्याच घडलेल्या एका घटनेने पार हादरवून टाकलंय. पिंपरीत एकाच दिवशी आठ वर्षे व सोळा वर्षे अशा दोन मुलांनी आत्महत्या केल्या. गेल्या काही वर्षांत विद्यार्थांनी आत्महत्या करण्याचं वय १२ पर्यंत खाली आलं होतं असं बातम्यांवरून दिसत आलंय. पिंपरीतील थेरगावच्या अवघ्या (किती वर्षांच्या मुलाने) वर्षांच्या मुलाने आत्महत्या करणं हे धक्कादायकच होतं. त्यापेक्षा धक्कादायक होतं त्यामागचं कारण, घटनेनंतर समजलेला तपशील. संबंधित मुलाने स्वतःला फास लावून घेण्यापूर्वी आपल्या बाहुलीला फास लावला होता. व त्यानंतर स्वतःला फाशी लावून घेतली होती.
 

पोलिसांच्या तपासात समजले की, मृत मुलाचे वडील हे सुरक्षारक्षक आहेत तर आई जवळपासच्या घरांत घरकाम करते. या मुलाला आपल्या मोबाईलवर भयपट पाहण्याचं वेड होतं. त्यावरील चित्रिकरण पाहूनच आपल्या बाहुलीला कैद्याप्रमाणे चेहऱ्यावर काळं कापड घालून त्याने फाशी दिली आणि नंतर स्वतःही फाशी लावून घेतली असावी अशी माहिती प्राथमिक तपशीलात होती. चित्रविचित्र भयपट पाहण्यावरून त्या मुलाला घरच्यांनी हटकलंही होतं. कदाचित वेगळी कृती म्हणून अंधानुकरणातून ही आत्महत्या झालेली असू शकतं, हेही लक्षात घेतलं पाहिजे.

 

आज मुलांच्या हातात पहिल्या दुसऱ्या वर्षापासून फोन येत आहेत. आईवडील, घरातली अन्य माणसे स्वतःच्याही नकळत मोबाईलच्या विविध अंगप्रत्यंगांचा परिचय मुलांना करून देत आहेत. आज माझ्या ओळखीतला तीन वर्षांचा मुलगा यूट्यूब वा डिस्ने हॉटस्टार उघडून त्याला हव्या त्या नर्सरी ऱ्हाईम्स पाहतो, याला नेमकं काय म्हणावं? शाळेच्याही आधी त्याचा पहिलीपर्यंतचा अभ्यास झालेला आहे. खरं तर, वेळेच्या आधी आणि गरजेपेक्षा अधिक भार ही मुलं सहन करू शकत नाहीत. त्यांची चित्रस्मृती अधिक बळकट होत चालली असून, सामान्य वाचनाच्या-पाठांतराच्या स्मरणशक्तीवर मात्र त्याचा नकारात्मक परिणाम होत आहे. मुळातच इतक्या लवकर मोबाईल मुलांच्या हातात देण्याची गरज आहे का असा प्रश्न प्रत्येक पालकाने स्वतःच्या मनाला विचारणं अत्यावश्यक आहे. असो हा वेगळा विषय आहे.

 

पिंपरीसारख्या घटनांपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी कोणत्या प्रकारची पावलं उचलता येतील याचा मोठ्यांनी विचार करणं आवश्यक आहे. आपणच मोबाईलचा वापर कामापुरता आणि मुलांच्या नकळत करू शकतो का, आपली मुलं मोबाईलवर काय पाहतात, आसपासच्या किंवा नात्यातल्या दुसऱ्या कोणी व्यक्ती आक्षेपार्ह कंटेंट दाखवून त्यांचं लैंगिक शोषण करत आहेत का यावर पालक म्हणून आपलं लक्ष असणं आवश्यक आहे. आपण स्वतः मोबाईलवर कोणत्या स्वरूपाचा कंटेंट पाहतो, आपण आपली सर्च हिस्ट्री डिलीट करतो आहोत का, मुलं आपल्या नकळत आपला मोबाईल उघडून पाहत आहेत का याबाबत सजग असणं गरजेचं आहे. आज अनेक पालक फार लवकर आपल्या मुलांना इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर इन्ट्रोड्यूस करतात. तसं करताना आपण काही बंधनं पाळणं आवश्यक आहे. ओटीटीवर जाऊन किंवा इन्टाग्रामवर जाऊन आपली मुलं कोणत्या स्वरूपाचे व्हिडिओज पाहात आहेत, त्यांना कोणत्या प्रकारचे व्हिडिओज आवडतात याबाबत मुलांशी चर्चा करून माहिती करून घेतली पाहिजे. आज ओटीटी माध्यमांवर अत्यंत प्रक्षोभक, उत्तान चित्रण, तसेच संवाद असणार कंटेंट उपलब्ध असतो. अशा वेळी या माध्यमासाठी चाईल्ड लॉक सुविधा वापरणं अत्यावश्यक असतं. इन्स्टा-फेसबुक-स्नॅपचॅटवर आपल्या मुलांचं अकाऊंट आहे का, असेल तर त्याचं नियंत्रण स्वतःकडे ठेवणं, त्यांना कोणता कंटेंट पाहावा/पाहू नये याबाबत मार्गदर्शन करणं, पिंपरीतील केस प्रमाणे ती जर भयपट वा क्राईम स्टोरीज पाहात असतील तर त्यांना त्यातील खोटेपणा पटवून देणं, त्यापासून दूर राहण्यास प्रवृत्त करणं, समाजातील चुकीच्या गोष्टींबाबत, गुन्ह्यांबाबतचा विवेक संस्कारांतून जागृत करणं अत्यावश्यक आहे.

 

आज अनेक मुलं असा कंटेंट पाहून हिंसक होत आहेत, आरडाओरड करणं, मित्रांना-लहान भावंडांना हानी पोहोचवणं, उलट उत्तरं देणं असे प्रकार वाढत आहेत. मोबाईलमुळे त्यांचा वेळही वाया जातोय, एकलकोंडेपणा वाढत चालला आहे, हिंसक खेळांमुळे त्यांच्या बालमनावर चुकीचा परिणाम होत आहे. लैंगिकतेबाबत आणि स्वतःच्या ओळखीबाबत त्यांच्या मनात वेळेच्या आधी आणि चुकीच्या संकल्पना तयार होत आहेत. घाबरवणारी दृश्यं त्यांच्या मनावर आघात करत असण्याचीही शक्यता आहे. आईवडील कामामुळे घराबाहेर राहणारे असतील तर याचं प्रमाण अधिक भयावह असू शकतं.

 

आज जगाच्या पाठीवर, विशेषतः पाश्चात्य जगात लहान मुलांच्या आत्महत्येचं प्रमाण ५ ते १२ वर्षं इतकं खाली आलं आहे. याला अनेक कारणं असली तरी डिजिटल माध्यमांचा उद्रेक हे त्यातील एक महत्त्वाचं अंग असल्याचं आपल्याला जाणवतं. अन्यथा आठ वर्षांच्या मुलाने अशा प्रकारे आधी बाहुलीला फास लावून स्वतःलाही फास लावण्याचं काही कारण नव्हतं. त्यातही त्याने बाहुलीच्या चेहऱ्यावर गुन्हेगाराप्रमाणे काळे कापड झाकून मग फाशी लावली. हे एखाद्या चित्रीकरणाचं अनुकरणही असू शकतं. अशा प्रकारचं चित्रीकरणं पाहून एखाद्या मुलाने त्याचं अनुकरण केलं असेल, तर मग मुलं अशा कोणत्याही कृतीचं अनुकरण करू शकतील. ही धोक्याची घंटा असू शकते.

 

मोबाईलच्या अवतीभवती आपण गुंफलेले असण्याच्या या काळात अशा घटनांपासून समाजाला वाचवण्यासाठी जाणीवपूर्वक पावलं उचलणं आवश्यक आहे. अन्यथा भविष्यकाळात तंत्रज्ञान हे माणसासाठी शाप ठरू शकतं, आणि त्याला कारणीभूत माणूसच असेल. कोमेजणाऱ्या कळ्यांना सावरायला आपलेच हात पुढे यायला हवेत.

 
- मृदुला राजवाडे 
Powered By Sangraha 9.0