नमामि देवी नर्मदे !

09 May 2022 09:58:38


narmada river

आपल्या भारतीय संस्कृतीत निसर्गाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपले सण-वार, रूढी- परंपरा हे त्या निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करतात किंवा निसर्गातील बदलांबाबत सांगतात. अगदी गगनचुंबी गिरीराजांपासून वृक्ष-वेलींपर्यंत सगळ्या जीवनदायी घटकांची आपल्याकडे पूजा केली जाते. त्यात खरोखर 'जीवन'दायी अशा सरितांना आपले पूर्वज कसे विसरतील ? 'सुजलाम्' अशा नद्यांना आपल्या पुर्वजांनी देवीचे स्वरूप मानले आहे. गंगा, यमुना, गोदावरी, सिंधू, सरस्वती, कावेरी आणि नर्मदा या नद्या तर प्रत्येक भारतीयासाठी वंदनीय आहेत. आध्यात्मिक आणि भौगोलिकदृष्ट्यादेखील यांचे अतिशय महत्त्वपूर्ण स्थान आहे.

 

अनादि काळापासून जलाशयाच्या काठावर जीवसृष्टीची वस्ती पहावयास मिळते; तसेच जवळजवळ प्रत्येक तीर्थक्षेत्राच्या बाजूने एक तरी नदी वाहताना दिसते. ओंकारेश्वरासारख्या जागृत देवस्थानाला नर्मदेची साथ लाभली आहे. 'नर्मदा' आपल्याला आद्य शंकराचार्यांच्या काव्यातून भेटते, दत्त संप्रदायातील टेंबे स्वामींच्या चरित्रातून भेटीला येते, गो.नि.दांच्या लेखणीतून भेटीला येते तसेच अनेक परिक्रमावासियांच्या अनुभवकथनातूनसुद्धा आपल्या भेटीला येते. तिला केवळ नर्मदा म्हणणे म्हणजे आपल्या घरातील एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीस नावाने हाक मारण्यासारखे आहे. त्यात अवहेलना नाही; पण कोरडेपणा जाणवतो; पण तिला 'मैय्या' म्हणण्यात जो आपलेपणा आहे, जो आनंद आहे तो कशातच‌ नाही !

 

मूळात नर्मदा ही अमरकंटक येथे उगम पावून अनेक गावांना 'सुफलाम्' करत करत खंबातच्या अरबी समुद्राला जाऊन मिळते.१३१२ कि.मी.एवढी लांबी, ९८८०० चौरस कि.मी. पसरलेलं तिचं पात्र गुजराथ, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या तीन राज्यातून प्रवाहित होत असतं. म्हणून ती भारतील पाच मुख्य नद्यांमध्ये गणली जातेच, पण भारतातील पाचव्या क्रमांकाची मोठी नदी म्हणूनही प्रसिद्ध आहे.आता भुगोलात शिरलोच आहोत, तर तिचे इतर नद्यांपासून वेगळेपण नको का अधोरेखित करायला ? अर्थातच ! तिचे सगळ्यात मोठे वेगळेपण हे आहे, की नर्मदा ही एकमेव नदी अशी आहे की, जिला आपण प्रदक्षिणा घालू शकतो. भारतातील इतर कुठल्याही नदीची अशी प्रदक्षिणा घालणे शक्य नाही. हे आध्यात्मिक आणि भौगोलिकदृष्ट्या असलेले तिचे वेगळेपण आहे.

'रेवाः तटे जप कुर्यात | मरणं जान्हवी तटे |' असे म्हटले जाते.म्हणजे नर्मदा ही तपस्वीनी आहे. तिचा किनाराही तपोभूमी आहे व म्हणूनच श्रीमद् आदि शंकराचार्य, श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज यांच्यासारख्या विभुतींचे तपाचरण तिच्या साक्षीने झाले. त्यांच्या येथील वास्तव्यामुळे तिचे आध्यात्मिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. अनेक ऋषी-मुनी, तसेच भाविक-भक्त तिच्या तटावर यज्ञ, दान, आणि तप करायला येतात. ती अत्यंत पवित्र मानली जाते याचे कारण म्हणजे पद्म पुराणातील हा श्लोक,

 

"त्रिभिः सारस्वतं पुण्यं सप्ताहेन तु यामुनम् |

सद्यः पुनाति गांगेयं दर्शनादेव नार्मदम् ||"

 

अर्थात सरस्वती मधे तीन दिवस स्नान केल्याने,‌यमुना नदीत सात दिवस स्नान केल्याने व गंगा नदीत एकदा स्नान केल्याने जे पुण्य मिळते किंवा जी पापं नष्ट होतात ते नर्मदेच्या केवळ दर्शनानेच साध्य होते. त्यामुळे तिच्या पात्रात आढळणारे दगडसुद्धा अनेक ठिकाणी पूजले जातात.

 

मैय्याला अनेक नावांनी ओळखले जाते. त्यातील 'नर्मदा' या शब्दाचा अर्थ होतो आनंद देणारी, तर 'रेवा' म्हणजे अल्लड, अवखळ. हे नाव पडण्यामागचे कारण म्हणजे अमरकंटक पासून साधारण नेमावरपर्यंत नर्मदेचा प्रवाह हा अत्यंत खळाळणारा, उड्या मारणारा आहे; पण नेमावरपासून मात्र ती शांत आहे. तिथे ती खऱ्या अर्थाने 'नर्मदा' आहे. या व्यतिरिक्त तिची दोन नावे आहेत ती म्हणजे 'सोमोद्भवा' आणि 'मेकलकन्या'.

 

परिक्रमा हे तिचे वैशिष्ट्य आहे; पण सर्वप्रथम ही परिक्रमा कोणी केली असावी ? असा प्रश्न पडतो. तर, सर्वप्रथम नर्मदा परिक्रमा ही मार्कंडेय ऋषींनी केली होती असे म्हणतात. नर्मदा व तिला येऊन मिळणाऱ्या ९९९ उपनद्या न ओलांडता केलेली ही परिक्रमा जवळपास २६-२७ वर्ष चालली. आज अनेक परिक्रमावासी या परिक्रमेचा संकल्प सोडतात. स्वतः कठीण नियम घातले नसूनही त्यांची ही परिक्रमा अपूर्ण राहते याचे कारण म्हणजे शरीर आणि मनाचा न जुळलेला मेळ तसेच मय्यैची इच्छा ! परिक्रमावासियांची मय्यावर प्रगाढ श्रद्धा असते, की ती कुठल्याही परिस्थितीत आपल्याला एकटं नाही सोडणार. ओंकारेश्वरपासून सुरू होणारी ही परिक्रमा पुढे प्रकाशा, कटपोर, अरबी समुद्र, नारेश्वर, गरूडेश्वर, नेमावर, बुधनी, जबलपूर, अमरकंटक, हरदा अशी ३२०० कि.मी.ची ढोबळ वाट तुडवत पुन्हा ओंकारेश्वर येथे येऊन थांबते. यात शरिराचा तसेच मनाचा कस लागतो म्हणून ही परिक्रमा अतिशय खडतर मानली जाते; पण नर्मदेच्या भोवतालचा निसर्ग अनुभवू इच्छिणाऱ्या तसेच परिक्रमेचे पुण्य मिळवू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी बसने परिक्रमा करण्याचा, अर्धे तटावरून तर अर्धे अंतर बसने परिक्रमा करण्याचा, उत्तरवाहिनी परिक्रमा असे पर्याय आहेत. खरं तर परिक्रमावासियांचे अनुभव ऐकणे हा एक अतिशय चित्तथरारक अनुभव असतो; पण ते अनुभव ऐकून परिक्रमा करण्याची इच्छा मनात अधिक प्रबळ होत जाते.

 

नर्मदेवर अनेक काव्य, श्लोक लिहिले गेले आहेत.'नर्मदा लहरी' आहे, 'नर्मदाष्टकम्' आहे, नर्मदा श्रीनर्मदा निरांजनम् आहे....अनेक‌ आहेत; पण या काव्याचा अर्थ तेव्हाच कळेल जेव्हा आपण स्वतः तिचे दर्शन घेऊ. स्वतः तिचा निसर्ग अनुभवू. मात्र, हे करताना तिच्या पावित्र्याचा, आजच्या भाषेत तिच्या स्वच्छतेला चुकूनही धक्का लागू न देण्याला प्रयत्न करू या.

नर्मदे हर !

- मृण्मयी गालफाडे

Powered By Sangraha 9.0