खिचडी

19 May 2022 09:45:00


khichadi

नव्वदच्या दशकात खिचडी नावाची एक सिरीयल होती, आता जशी 'तारक मेहता का उलटा चष्मा' आहे ना तशीच. अजूनही त्या सिरियलमधील पात्रे, त्यांचे डायलॉग्ज यावर मिम्स बनतात. सर्वांना आवडणारी, सगळी अतरंगी पात्रे असणारी, आपलीशी वाटणारी खिचडी, अगदी समर्पक नाव. हा पदार्थही असाच आहे, सर्वांच्या मनाच्या जवळचा. बिर्याणी, पुलाव या श्रीमंत पदार्थांसारखी खिचडी नाही. खिचडी मध्यमवर्गीय आहे, अस्सल भारतीय! खिचडीचा उल्लेख अगदी महाभारतातही आहे म्हणजे, सन ३०३ मध्येही आढळतो. तेराव्या शतकात भारतात आलेल्या इब्न बतूता या मोरोक्कन प्रवाशाने 'किश्री' या तांदूळ आणि मुगाच्या डाळीच्या पदार्थाबद्दल लिहून ठेवले आहे. (इश्कियामधील 'इब्न बतूता, बगलमे जुता' गाणे आठवले ना?) तर सांगायचा मुद्दा असा की, इतका जुना आणि भारतीयांच्या जिव्हाळ्याचा पदार्थ आहे, खरे 'कम्फर्ट फूड' हेच तर असते.

खिचडीला एरवी फार तर रात्रीच्या जेवणात जागा मिळते; पण मकर संक्रांतीला मान मिळतो. संक्रांतीला तसं पाहिल्यास एरवी दुर्लक्षलेल्या सगळ्या गोष्टींची कॉलर ताठ असते. म्हणजे बघा, काळ्या रंगाचे कपडे सणावारी आपण घालत नाही, खिचडीला पक्वान्न मानत नाही आणि पतंगाला महत्वाच्या खेळांमध्ये स्थान नाही! संक्रांतीला मात्र खिचडी तिळगुळाच्या पोळीशेजारी ऐटीत बसलेली असते. खिचडीतही बरेच प्रकार आहेत. विदर्भात तांदूळ, डाळ, मीठ, हळद एकत्र शिजवतात आणि वरून फोडणी घालून खातात. खान्देशात भाज्या असलेली, बहुदा तुरीच्या डाळीची मसालेदार खिचडी बनवतात. आजारी माणसांसाठी मुगाच्या डाळीची, तूप घातलेली साधी खिचडी केली जाते. कित्येक घरांमध्ये रात्रीच्या जेवणात हाच सोयीचा मेनू असतो, सोबत लोणचे, पापड, सांडगे, ताक/कढी वगैरे असले, तरी पुरेसे असते. आपण मराठी लोकांनी खिचडीला फार डोक्यावर घेतले नाही; पण गुजराती लोकांनी या साध्या पदार्थाला गुजराती थाळीत मानाचे स्थान दिले आहे. ते लोक आवडीने खातात. हॉटेलमध्ये मिळणारी, लांब तांदूळ असलेली, तडका आणि लाल मिरचीची लिपस्टिक लावून आलेली 'डाळ खिचडी'ची चव या सगळ्यांहून अजून वेगळी! आता तर पालक, पनीर, किनोआ, मिलेट्स असे बरेच प्रकार मिळतात, काही चेन्स रेस्टारंटही आहेत. बऱ्याच ब्रँडनी इन्स्टंट ब्रेकफास्टमध्ये इन्स्टंट खिचडी लॉन्च केली आहे. फॉरचून आणि काही ब्रॅंड्सनी खिचडी मिक्स मार्केटमध्ये आणले आहे. कार्ब्स आणि प्रोटीन असलेला हा पदार्थ, वन डिश मिल आहेच शिवाय बऱ्याच भारतीयांचे कम्फर्ट फूड.

मराठी लोक साबुदाण्याची खिचडी करतात; पण काही लोक त्याला उसळ म्हणतात. याशिवाय ती उपवासाचे पदार्थ गटात मोडते, त्या पदार्थासाठीच्या भावना वेगळ्या म्हणून इथे काही लिहीत नाही. बाजरीची खिचडी खान्देशात करतात, विशेषतः हिवाळ्यात. भरपूर लसूण घालून केलेली बाजरीची खिचडी अतिशय पौष्टिक आणि हिवाळ्यात ऊर्जा देणारी असते. हा साधा, सोज्वळ पदार्थ वर्षभर केव्हाही खाऊ शकतो. हिवाळ्यात गरमागरम पातळसर खिचडी सोबत तुपाची धार, पावसाळ्यात किंचित मसालेदार खिचडी आणि लवंग घातलेली गरम कढी, उन्हाळ्यात सर्व भावंडांसोबत दिवसभर भटकून झाल्यावर एकत्र बसून खाल्लेली खिचडी, सोबत न मुरलेले कैरीचे लोणचे! इतक्या आठवणी आहेत आणि सगळ्या तितक्याच जवळच्या, ठरवले तरी एक आठवण निवडता येणार नाही! सुमुखी सुरेश या कॉमेडीयनच्या 'डोन्ट टेल अम्मा' या कार्यक्रमात तिने खिचडीगर्ल आणि न्यूतेला गर्ल असे मुलींचे दोन प्रकार सांगितले आहेत. खिचडीगर्ल साधीभोळी, भावनिक आणि न्यूटेला गर्ल मात्र नखरेल, मानसिक स्वास्थ्यासाठी काहीशी हानिकारक. छान उदाहरण दिले आहे, हसू येते आणि पटतेही. साध्या, सोज्वळ मुली जशा स्मार्टही असतात तशीच आपली खिचडी व्हायला हवी. बिर्याणी या तिच्या बहिणीकडून मार्केटिंगचे धडे घेऊन जगभर दिमाखात मिरवायला हवे, हवं तर सोबत कढीलाही घेऊन जावे अशी माझी आपली शाकाहारी आणि मराठमोळी इच्छा आहे!

- सावनी

Powered By Sangraha 9.0